नावाजलेले जगविख्यात संतसमागम!

31

(जगविख्यात निरंकारी संतसमागम विशेष)

यंदाचा महाराष्ट्रातील प्रादेशिक निरंकारी संतसमागम मागील वर्षीप्रमाणे व्हर्चुअल- आभासी स्वरूपात दि.११, १२ व १३ फेब्रुवारी २०२२ रोजी होत आहे. त्याचे तीनही दिवसाचे प्रसारण साधना टिव्हीवर दररोज सायंकाळी ६ ते रात्री ९-३० वा. दरम्यान होणार आहे. जिज्ञासूंनी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांच्या आशीर्वचनांचा लाभ घ्यावा व पुरेपूर ब्रह्मानंदात न्हाऊन निघावे. यास्तव ‘बापू’- श्रीकृष्णदास निरंकारीजींचे नम्र निवेदन… जगाच्या पाठीवर सर्वोत्तम आध्यात्मिक मिशन म्हणून संत निरंकारी मिशनची स्तुती केली जाते. मिशनचे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व प्रादेशिक संतसमागम तसेच गावोगावीचे दैनिक, साप्ताहिक आदी सत्संग जनमानसात आपली वेगळी छाप उमटवत असतात. ते सर्व जाती-धर्मांच्या लोकांना प्रेमाच्या एका धाग्याने घट्ट बांधून घेत आहे. विश्वबंधुत्वाचे मिशन, विश्वमानवतेचे मिशन, मानव एकता साधक मिशन, विश्वशांती प्रस्थापक मिशन, विश्व रक्तदाता मिशन आदी विशेषणांनी मिशनची ख्याती सर्वदूर जगाच्या कानाकोपर्‍यात पसरली आहे. या सर्व विशेषणांची एकत्रित प्रचिती घ्यावी, असे जिज्ञासूंना वाटत असल्यास त्यांनी भव्यदिव्य निरंकारी संतसमागमास अवश्यच भेट द्यावी. सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांच्या आशीर्वादास पात्र ठरावे आणि ब्रह्मानंद काय असतो? याचाही लागलीच प्रत्यय घ्यावा. जगातील एक नाविन्यपूर्ण अलोट जनसागर व आश्चर्य म्हणून याकडे लोक आकर्षित होतात. भले भले वैज्ञानिक, डॉक्टर, संशोधक, अभ्यासक आदी महाशय अवश्य भेट देऊन स्तंभित होत असतात.

येथे आलेला प्रत्येक जिज्ञासू देहभान विसरतो आणि सानथोरांच्या चरणांना स्पर्शून “धन निरंकारीजीं!” म्हणतो. जसे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी म्हटले- “पंढरीच्या लोकां नाही अभिमान| एकमेका पडती पाया होऊनि लहान||” असे हे संतसमागम पुढील सुविधा व उपक्रमांनी भरपूर असते-

आवागमन: भक्तमंडळींना संतसमागम स्थळी पोहोचविण्यासाठी शासकीय, सामाजिक, सेवाभावी संस्था आदी वाहनांची सोय लावून असतात. मिशनचे सेवादार बंधुभगिनीं अंतराअंतरावर उभे राहून समागम स्थळाबाबत दिशानिर्देश करीत असतात. भक्तांच्या अवजड बॅगा- पिशव्या ते स्वतः गाडीत चढवून व उतरवून देतात. मात्र आपण शांत व निर्धोकपणे त्यांना सहकार्य केले पाहिजे. सर्वप्रकारच्या वाहनांच्या आवागमनाचे वेळा व तिकीटे येथे मिळतात. स्वागत कक्ष- बाहेरगावून आलेल्या संत महापुरुषांचे यात हसत हसत सेवादलच्या जवानांमार्फत स्वागत केले जाते. तेथे स्फोटक, मादक आदी पदार्थ कुणाकडे असू नयेत. त्यापासून स्वतःसह इतरांनाही धोका होता कामा नये, म्हणून कसून चाचपणी केली जाते. त्यानंतर निवासी तंबूकडे पाठविले जाते. यातून ईश्वराविषयींची निष्ठा अधिक दृढ होत असते. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात- “दुरितांचे तिमिर जावो| विश्व स्वधर्मसूर्यें पाहो| जो जें वांछील तो ते लाहो| प्राणीजात|| वर्षते सकळमंगळी| ईश्वरनिष्ठांची मांदियाळी| अनवरत भूतळी| भेटो तयां भूतां|| चलां कल्पतरूंचे अरव| चेतनाचिंतामणीचे गांव| बोलते जे अर्णव| पीयूषाचे||” [पवित्र सार्थ ज्ञानेश्वरी: अध्याय १८वा:

पसायदान: ओवी क्र.१७९५ ते १७९७.] अर्थ- हे विश्वेश्वरा! अज्ञानाचा अंधःकार दूर सारून जगाला चकचकीत आत्मज्ञान- स्वधर्माची जाणीव होवो. सर्व प्राणीमात्रांना पाहिजे ते सर्व मिळो. समस्त मांगल्यांचा वर्षाव कर्त्या संतसज्जनाचे समुदाय, त्यांची भेट- संतसंग या भूतलावर सर्व प्राणीमात्राला अखंड लाभो. संतमहात्मा म्हणजे चालत्या कल्पवृक्षांचे अंकुर आहेत, ते चैतन्यमय चिंतामणी रत्नाचे गांव आणि वचनामृताचे सागर ठरोत, असे पसायदान द्यावे.

सत्संग मंडप: संतसमागम स्थळी मध्यवर्ती भागात सत्संग मंडप असतो. त्यात सत्संगी मंडळींना बसण्याची खुप मोठी व्यवस्था केलेली असते. महापुरुषांना विचार प्रकटीकरण, भक्तीगीत, कविता गायन करणे व वाद्यवृंदांना बसण्यासाठी एक भव्य स्टेज- मंचक असतो. बाजूला दुसरे एक स्टेज ज्यावर सद्गुरू माऊली विराजमान झालेली असते. त्यावर सत्संग निर्धारित वेळेवर सर्वप्रथम ईशस्तवन करून सुरू होतो- “परमपिता परमात्मा, कण कण तेरा वास। करण करावण हार तू, सब कुछ तेरे पास। इक तुही निरंकारीजीं।।१।। अंगसंग तुझको देखके, अवतार करे अरदास। तू राजा अधिराज है, मैं दासन का दास। इक तुही निरंकार।।२।।”

एक भक्तीगीत वा कविता गायनानंतर एका आध्यात्मिक विचाराचे प्रकटीकरण वेगवेगळे संत्संगी संत करतात. वेगवेगळ्या भाषेतील गीत व विचार झाल्याने मन प्रसन्न होते. कवी दरबार- दिलेला शिर्षक योजून संतकवींना आपल्या नवीनतम रचना सादर करण्यास काही अवधी देण्यात येतो. त्यात जगातील विभिन्न भाषिक कविवर्य सहभागी हातात. संतसमागम विशेषांक सुद्धा याच शीर्षकाखाली प्रकाशित करण्यात आलेला असतो. यावर्षीचा शीर्षक ‘विश्वास भक्ति आनंद’ हा आहे. नमस्कारी रांग- महापरुषांचे मार्गदर्शक विचारप्रवाह व भक्तिगीते चालू असतानाच भगिनींच्या बाजूने भगिनीं व महापुरुषांच्या बाजूने महापुरुष यांना सद्गुरू माऊलीस वंदन करण्यासाठी नमस्कारी रांगा असतात. रांगेने शांतपणे चालत जाऊन गुरुमाऊलीचे दर्शन घेण्याची संधी दिली जाते. हे दृश्य सर्वांचे लक्ष वेधून घेणारे असते.

गुरूवंदना- संतसमागमाचा अगदी शेवटचा दिवस हा गुरुवंदना करण्याचा दिवस असतो. सद्गुरू माऊलीला प्रसन्न करण्यासाठी नाना प्रकारचे कार्यक्रम भक्तमंडळी करतात. त्यात वैज्ञानिक प्रयोग, हास्य नाटिका, नृत्य, करामती आदींचा समावेश असतो. गुरू प्रसन्न झाला तर देव प्रसन्न होतो व भक्ती सफल होते, हे संताचे अनुभूतीपूर्ण शब्द आहेत. ठरल्या वेळेनुसार तीन-चारही दिवस मुख्यविचार रुपात सद्गुरू मुखारविंदातून अमृतवचने श्रवण करण्यास मिळतात. तत्पूर्वी जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना- मंगलाचरण होते- “हे समरथ परमात्मा, हे निर्गुण निरंकार। तू कर्ता है जगत का, तू सब का आधार। परमपिता परमात्मा, सब तेरी सन्तान। भला करो सब का, सब का हो कल्याण।” यावेळी सर्व सोयी-उपक्रम थांबवून शांतचित्ताने गुरूवचनांना श्रवण केले जाते. संपूर्ण परिसरात ध्वनीक्षेपक व जागोजागी टिव्हीवर ते प्रक्षेपित केले जाते. त्यातून जगातील अखिल मानवमात्रांनी वैरविरोध त्यागून एकत्वाने व बंधुभावाने वागण्याचा विश्वात्मक संदेश प्रसारीत होतो.

सद्गुरू माऊलींच्या अमृतधारेनंतर धुनी होते- “तेरी ओट सहारा तेरा तन-मन घोल घुमावा। कहें अवतार तेरे ही दाता दिन राती गुण गावाँ। इक तुही निरंकार, इक तुही निरंकार।।”

सेवादल रॅली: दुसर्‍या दिवशी सकाळी सेवादलचे जवान पिटी परेड करून दाखवितात. तत्पूर्वी सद्गुरूला प्रार्थना केली. सोबतच मार्चिंग गीत तालासुरात व कृतियुक्त म्हटले जाते- “ना हिन्दू ना सिक्ख ईसाई ना हम मुसलमान हैं। मानवता हैं धर्म हमारा हम केवल इन्सान हैं। हम हैं सेवादार, हम हैं सेवादार…!” भिन्न भिन्न देश, राज्य, विभाग, क्षेत्र, जिल्हे यांच्या मार्फत शोभा यात्रा काढली जाते. त्यात विविध संस्कृतीं, जनजीवन, रुढी-परंपरा दर्शक झांकी सादर करण्यात येतात.निवासी तंबू: यात राज्य-भाषापरत्वे राहण्याची सोय केलेली असते. भक्तसंख्या विचारात घेऊन विभाग व क्षेत्रानुसारही तंबू उभारले जातात. ते क्षेत्राप्रमाणे सेवादल बंधुभगिनींसाठी वेगळाले असतात. नान्हीघर, मुत्रीघर, शौचालय, प्याऊची सोय, लंगरदान मंडप, प्रकाशन स्टॉल, कॅन्टीन, चौकशी, खोया-पाया कक्ष, प्रथमोपचार दवाखाना आदी योग्य जागी उभारलेले असतात. मात्र सर्वच ठिकाणी रांगेने शिस्तबद्ध चालावे लागते. तेथे सेवादलाचे जवान अहोरात्र सेवेत तत्पर असतात. लंगर पंगतीत बसून घ्यावे लागते. संत महापुरुष एकमेकांना घास भरवून सन्मान देत नंतर स्वतः घास घेतात. गोंधळ, गडबड, चेंगराचेंगरी असले प्रकार उद्भवत नाहीत. कारण भक्तमंडळी इतरांच्या भावना जाणून तातडी असणाऱ्या महात्म्यास आपल्या पुढ्यात घेतात. स्वयंपाक घर हे संपूर्ण लंगर तंबूस भोजन पुरवठा करते. प्रदर्शनी- बाल आनंद प्रदर्शनी व आध्यात्मिक व मिशनचा इतिहास दर्शक प्रदर्शनी अशा दोन प्रकारच्या प्रदर्शनी असतात. ज्ञानदान कक्ष- भाषेनुसार ज्ञानदान कक्षांची संख्या असते. ते नव्याने ब्रह्मज्ञान घेऊ इच्छिणाऱ्या जिज्ञासू बांधवांसाठी असते. ते चहुबाजूने बंदिस्त केलेले असते. सामुदायिक साधा विवाह सोहळा सुद्धा होतो. खोया-पाया कक्षात किंमती वस्तू, मुले, व्यक्ती आदी हरवल्या किंवा सापडल्यास माहिती नोंदविली जाते, परत काले जाते. सहसा अशी परिस्थिती येल नये म्हणून सजग राहणेच योग्य.

विश्वास बसणार नाही, परंतु हे सत्य आहे, की संतसमागम स्थळ हे हजारो एकरच्या जागेत सुसज्ज केलेले असते. ते तयार करण्यात तीनचार महिन्यांचा कालावधी खर्ची पडत असतो. या संपूर्ण परिसरात विजेच्या दिव्यांचा झगमगाट असतो. येथे पदोपदी संयम, सेवा, सहनशीलता, प्रेम, विश्वास, संवेदनशीलता, शांती, नम्रता आदी दिव्य गुणांची आपल्यात सहजच रूजवण होते. ती व्यवस्था मिशनने स्वतः केली असते. निरंकारी संतसमागम हा स्वर्ग व मृत्युलोकाची प्रचितीदायक असतो. सत्संग मंडप म्हणजे स्वर्गलोकाचे प्रतिरूप तर निवासी मंडपासह सर्व सुखसोयी या मृत्युलोकाची जाणीव करून देतात. मात्र येथे सेवाधर्म बजावणारे संत सेवादार सर्वांच्या भल्यासाठी कष्ट उपसत असतात. जसे संत कबीर महाराज म्हणतात- “कबीरा खडा बजार में, सब की माँगे खैर। नाही कहुं से दोस्ती, नाही कहुं से बैर।।” सत्कारयोग्य साध संगतजी! मोठ्या प्रेमाने बोलुयाजी, धन निरंकारजी!!

!! पुरोगामी संदेश परिवारितर्फे सर्वांना ५५व्या महाराष्ट्र निरंकारी संतसमागमाच्या हार्दिक शुभेच्छा!!

✒️चरणधूळ:-‘बापू’- श्रीकृष्णदास निरंकारी.द्वारा- प. पू. गुरूदेव हरदेव कृपानिवास.मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.पो. ता. जि. गडचिरोली (पिन-४४२६०५)फक्त व्हा. नं. ९४२३७१४८८३.
इमेल- krishnadas.nirankari@gmail.com