असा असावा प्रपोज डे

36

हल्लीच्या सो कॉल्ड आधुनिक काळात प्रत्येक दिवस साजऱ्या करण्याच्या वेगळ्याच परंपरा नित्य नव्याने रूढ होत चालल्या आहेत. यात पाश्चिमात्य संस्कृतीचे फार मोठ्या प्रमाणात अंध:अनुकरण होताना दिसत आहे. याचा अर्थ हे वेगवेगळ्या कारणाने दिवस साजरे करणे पूर्णतः चुकीचे आहे असे मला म्हणायचे नाही. परंतु खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी पासून सकारात्मक ऊर्जा घेता येईल का….? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

14 फेब्रुवारी हा दिवस जगभरात प्रेमाचा दिवस अर्थात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. मागच्या काही वर्षात व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्याची पद्धत सुद्धा सुरू झाली आहे. यामध्ये रोज डे, प्रपोज डे अशा प्रकारचे निरनिराळे डे येतात. आज म्हणे प्रपोज डे आहे. मग ही सर्व तरुण पिढी हा दिवस अगदी आनंदाने साजरा करत आहे. हा तरूणांचा उत्साह पाहून आजच्या काळातील प्रगल्भ आणि प्रौढ असणाऱ्या दांपत्यांना सुद्धा हा व्हॅलेंटाईन वीक भुरळ घालताना दिसत आहे. मग ही प्रेमाच्या राज्यात प्रचंड अनुभव संपन्न असणारी प्रौढ माणसे सुद्धा तरुणांप्रमाणे हे दिखावे गिरी करणारे प्रेमाचे प्रकार करताना दिसून येत आहेत.

मग यात वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटस ठेवणे. वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट्स आणि इव्हेंट्स करणे. याचा प्रत्यक्षात समाजावर, आपल्या कुटुंबावर आणि आपल्या मुलांवर काय परिणाम होईल…? याचासुद्धा विचार करताना ही माणसे दिसत नाहीत. या मोकळ्या वातावरणात दिखावे गिरी करून केल्या जाणाऱ्या प्रेमाचे काही चांगले परिणाम असतील पण त्याचबरोबर त्याचे काही विपरीत परिणाम सुद्धा आहेत हे विसरून चालणार नाही. मग हे दिवस साजरे करायचे नाहीत का….? तर असेही नाही. हे दिवस सुद्धा साजरे करा…. परंतु त्या दिवसा पाठीमागील केवळ वरवरचा थातूरमातूर अर्थ घेऊन तो दिवस दिखावे गिरी ने साजरा करण्यात काहीच अर्थ नाही. याउलट या दिवसा मागील नेमकी उदात्त संकल्पना काय असली पाहिजे..‌? हे सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे.

उदाहरणच घ्यायचे झाले तर आजच्या “प्रपोज डे” चे घ्या. आता प्रौढ दाम्पत्यांनी संसार थाटून कित्येक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा प्रपोज डे साजरा करण्याचा नेमका अर्थ काय…? “उगाच तु माझं सर्वस्व आहेस…. जीव आहेस… तुझ्यासाठी मी काहीही करेन… जगातले सर्व सुख तुझ्या पायाशी आणून ठेवेन… माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे…” असे म्हणायचे… आणि प्रत्यक्षात एकमेकांना समजून सुद्धा घ्यायचे नाही. एकमेकांची काळजी घ्यायची नाही. खऱ्या अर्थाने एकमेकांचा विचार करायचा नाही. एकमेकांच्या भाव-भावना, इच्छा-आकांक्षा समजून घ्यायच्या नाहीत. असे असल्यास अशा प्रकारचे डे साजरे करण्यात काय अर्थ आहे. खऱ्या अर्थाने मोकळे जीवन जगायला शिका.

तुम्ही संसार थाटून कित्येक वर्षे झाली आहेत. तुमची लेकर आता मोठी व्हायला लागली आहेत. त्यांना खर्‍या अर्थाने संस्कारांची गरज आहे. मुल ही अनुकरणप्रिय असतात. मग त्या दृष्टीने आपले वागणे सुद्धा आदर्श असले पाहिजे. आपण आपल्या स्वतः बरोबर आपल्या जीवनसाथी असणाऱ्या व्यक्ती आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर निखळ आणि निरपेक्ष प्रेम केले पाहिजे. त्याच्या भाव-भावना, इच्छा-आकांक्षा समजून घ्यायला हव्यात. एकमेकांचा आधार व्हायला हवा. न सांगता एकमेकांच्या सुख-दुःख कळले पाहिजेत. एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. एकमेकांची स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. एकमेकांसाठी जगायला शिकले पाहिजे. तू कशाची काळजी करू नको….? माझ्या देहात शेवटचा श्वास असेपर्यंत मी तुझा कायम सोबत आहे. हा विश्वास एकमेकांना वाटला पाहिजे. आता प्रपोज करण्याची गरज नाही. आता सगळं न सांगता कळलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने त्या संसाराला अर्थ आहे. म्हणून आजचा प्रपोज डे साजरा करायचा असेल तर तो असा करा.

प्रपोज डे…..

आत्ता पुन्हा प्रपोज करायचे आहे
संपत चाललेल्या आत्मविश्वासाला
पुन्हा परस्परांचा हात हातात घेऊन
बळकटी द्यायची आहे विश्वासाला….

पुन्हा वाढवायची आहे निष्ठा
एकमेकांची एकमेकांवर
पुन्हा द्यायचा आहे आधार
विश्वासाने डोके ठेवून खांद्यावर……

पुन्हा नजर द्यायची नजरेला
हरवून जायचे आहे स्वतःला
तीच मृदुता आणि प्रेमळता
जपायची आहे दोघांच्या मनाला…..

आता दोघांपैकी कोणाचेही स्वप्न
असणार नाही एकट्याचे
वेदना झाल्या कुणालाही
तरी डोळ ओले होतील दोघांचे…..

आता एवढं सामंजस्य वाढलं आहे
समजावण्यासाठी गरज नाही शब्दांची
आता प्रेम वाढतच जाणार
गरज नाही कुणाच्या होकाराची…..

✒️मयुर मधुकरराव जोशी(लेखक/कवी,विठ्ठल-रुक्मिणी नगर,जिंतूर)मो:-9767733560,7972344128