अगर काँग्रेस ना होती…

110

नुकतेच पंतप्रधानांनी संसदेत भाषण दिले. त्यात काँगेस आणि नेहरूंचा असंख्य वेळा उद्धार केला. 70 वर्षात देशाचा विकास झाला नाही तो आता आम्ही करू या आवेशात हे सरकार सत्तेत आलं. मात्र विकासाच्या सर्व मुद्द्यांवर सपशेल फेल ठरलेले हे सरकार स्वतः काय केलं हे बोलण्याऐवजी मागच्या सरकारला कोसण्यातच संपूर्ण ऊर्जा खर्च करत आहे. काँग्रेस नसती तर ंंआपल्या घोर अपयशाचे खापर कुणाच्या माथी फोडले असते? हा पण विचार त्यांनी केला पाहिजे.

परवा झालेले भाषण म्हणजे पंतप्रधानांनी संसदेत कसे बोलू नये याचा उत्तम नमुना होता.एखाद्या प्रचार सभेप्रमाणे त्यांनी आपण काय केले हे न सांगता फक्त काँग्रेसच्या नावाने खडे फोडण्याचे काम केले. अगर काँग्रेस ना होती तो काश्मिरी पंडितो को कश्मीर छोडने की नौबत ना आती, अहो, काँग्रेस नसती तर आज जम्मू-काश्मीर भारतातच नसते हे तुम्ही विसरलात काय? आज जो काश्मीर भारतात आहे तोसुद्धा पंडित नेहरूंमुळे हेसुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काश्मीर मध्ये जनमत घेतले गेले नव्हते. काश्मीर स्वतंत्र्य राष्ट्र होते. काश्मीरप्रश्नावर सरदार पटेलांना नेहरू आणि माउंट बॅटन यांना पत्र लिहिले. ’सिलेक्टेड वर्कस ऑफ सरदार पटेल’ यात हे दोन्ही पत्र दिलेले आहेत. ह्या पत्रात पटेल लिहितात की, भारताने काश्मीरच्या भानगडीत पडू नये. कारण आपण तिथे जनमत घेतलेले नाही. त्यावर नेहरू असे म्हणाले की, काश्मीर भारतात असायलाच हवा कारण ती माझी (नेहरूंची)जन्मभूमी आहे. आणि म्हणून काश्मीरमध्ये हस्तक्षेप करणे भारताला भाग पडले. तेथील बहुसंख्य लोक आणि त्यांचा सर्वात मोठा लोकमान्य नेता शेख अब्दुल्ला यांची अशी मागणी होती की आम्हाला भारतातच राहायचे आहे.

ज्यावेळी पाकिस्तान ने आक्रमण केलं. पाकिस्तानचे सैन्य ज्यावेळी श्रीनगरपर्यंत पोचले त्यावेळी काश्मीर चे राजे हरिसिंह यांनी भारत सरकारकडे, पंतप्रधानांकडे आणि गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन यांच्याकडे मदतीची मागणी केली आणि मग या अटीवर की भारतात सामील व्हावं लागेल असा करार लिहून दिल्यानंतर भारतीय लष्कराने कारवाई केली आणि काश्मीर भारतात आला. संसदेत एका प्रश्नाला उत्तर देतांना खुद्द मोदी सरकारनेच हे उत्तर दिलंय की कलम 370 हटविल्यापासून केवळ 2 लोकांनी जम्मू-काश्मिरात जागा विकत घेतली आहे.आता काँग्रेसमुळे जर कश्मिरी पंडित कश्मीर सोडून गेलेत तर 2014 पासून 7-8 वर्षात तुमचं सरकार असून किती कश्मिरी पंडित काश्मिरात परत राहायला गेलेत?ते पण सांगा कि…
काँग्रेस ना होती तो शिखो का संहार ना होता. अहो, तुमच्यामुळे पंजाब-हरियाणाचे 700 पेक्षा अधिक शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेत त्याबद्दल दोन शब्दाने तर श्रद्धांजली अर्पण करा. त्यात बहुतांश शीख होते. 700 लोक मारणे हा त्याहून मोठा नरसंहार आहे. आज पंजाबात काँग्रेसचेच सरकार आहे हे विसरलात का? आपल्याला रॅलीत गर्दी नाही म्हणून रॅली सोडून परत जावं लागलं, वरून जीवाला धोका आहे असे म्हणून खापर पंजाबच्या शेतकर्‍यांवर फोडावं लागलं त्याच पंजाबचा आणि शिखांचा आज इतका कळवळा येतोय?

अगर काँग्रेस ना होती तो देश विदेशी चष्मे की बजाय स्वदेशी संकल्पो के रास्ते पे चलता.. हा कहरच झाला म्हणायचा. 2014 पासून सगळे मोठं-मोठे कॉन्ट्रॅक्ट चीनला देणारे पंतप्रधान स्वदेशीचा जयघोष करीत आहेत. ’स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या सरदार पटेलांच्या पुतळ्याचा 3000 कोटींचा ठेका चिनी कंपनीला नेणारे हे सरकार, ’बँक ऑफ चायना’ ला आपल्या देशात मान्यता देणारे हे सरकार, नुकताच तेलंगणाच्या शामशाबाद येथे लावण्यात आलेला रामानुजाचार्यांचा सोन्याचा पुतळा बनविण्याचे 400 कोटींचे कंत्राट चीनला देणारे हे सरकार स्वदेशी चा आग्रह धरते तेव्हा रडावं की हसावं कळत नाही. एल. आय. सी मधील विदेशी कंपन्यांचा हिस्सा 49% वरून 74% करण्यात आला आहे. मुंबई-आमदाबाद बुलेट ट्रेन चे कंत्राट सुद्धा ह्या सरकरने चिनी कंपनीलाच दिले होते. चीनचा निषेध म्हणून चीन च्या कंपन्यांना दिलेले सर्वच ठेके रद्द करायला पाहिजे होते. परंतु तितकीसुद्धा हिम्मत या सरकारने दाखविली नाही कारण पी. एम. केअर्स मध्ये अनेक चिनी कंपन्यांकडून यांनी करोडोंच्या देणग्या स्वीकारल्या आहेत. गुजरात मध्ये सर्वाधिक चिनी गुंतवणूक झालेली आहे आणि हे आपल्याला स्वदेशी चे फायदे समजावून सांगत आहेत.
अगर काँग्रेस ना होती तो बेटीयो को तंदूर में जलाया ना जाता… हाथरस ची घटना विसरले वाटत देशाचे पंतप्रधान. पीडितेच्या घरच्यांना घरात कोंडून रात्री अडीच वाजता त्या बिचारीचं शव पोलिसांकडून जाळून टाकण्यात आलं. पीडितेच्या कुटुंबियांना सरकारी अधिकार्‍यांकडून उघड धमक्या देण्यात आल्या. उन्नाव बलात्कार प्रकरणात पीडितेला आणि तिच्या कुटुंबियावरच गुन्हे दाखल केले गेले होते. पीडितेच्या वडिलांना कारागृहातच मारून टाकण्यात आलं.

त्यानंतर पीडितेचा अपघात करण्यात आला त्यात तिची काकू, मावशी आणि ड्रायव्हर जागेवरच मरण पावले. इतकं सगळं होत असतांना या प्रकरणातील आरोपी व भाजप चे आमदार कुलदीपसिंग सेंगरच्या पाठीमागे उत्तर प्रदेश सरकार भक्कमपणे उभं होतं. कठुवामध्ये 10 जानेवारी 2018 ला 8 वर्षीय आसिफा च अपहरण झालं आणि 17 जानेवारीला तीचं शव पोलिसांना सापडलं. तीन महिन्यांनंतर 11 एप्रिल ला हे प्रकरण देशभर माहीत झालं कारण 10 एप्रिल ला पोलीस या केस मधील आठही आरोपींविरोधात कोर्टात आरोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यासाठी कोर्टात आले असताना स्थानिक बार असोसिएशन चे अध्यक्ष व सदस्यांनी व सत्ताधारी आमदार-मंत्र्यांसह तिरंगा हातात घेऊन रस्त्यावर उतरून भारतमाता की जय म्हणत बलात्कार्‍यांना पाठिंबा जाहीर केला. हे का विसरता मोदीजी?
काँग्रेस ना होती तो भ्रष्टाचार ना बढता… 570 कोटींचं विमान 1670 कोटींना का विकत घेतलं गेलं? 58000 कोटी रुपयांच्या ह्या घोटाळ्याची चौकशी का थांबविण्यात आली? हा राफेल खरेदीचा करार करतांना हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. (एच ए एल) या अत्यंत अनुभवी व सरकारी कंपनीला डावलून फक्त 13 दिवस अगोदर स्थापन झालेल्या, संरक्षण क्षेत्रातील कोणताही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेंस लि. ला या करारात सामील का करून घेण्यात आले? हेसुद्धा सांगा मा. मोदीजी. नोटबंदी हा देशातला सर्वात मोठा घोटाळा ठरलाय. खुद्द रिझर्व्ह बँकेने जाहीर केलंय की, 99% पैसा जमा झाला आहे. अमितजी शहा ज्या बँकेचे संचालक आहेत त्या गुजरातच्या बँकेत नोटबंदी काळात सर्वात जास्त नोटा बदलल्या गेल्यात. देशाच्या पंतप्रधानाने इतिहासात पहिल्यांदा खाजगी पी.एम. केअर्स फंड स्थापन केला, तो सरकारी फंड आहे अशी जाहिरात केली आणि जेव्हा माहितीच्या अधिकारात माहिती मागितली गेली तर तो खासगी फंड असल्याने त्याची माहिती देऊ शकत नाही म्हणून इतका मोठा घोटाळा झाकला. कोरोनाच्या कठीण काळात पैसे नाहीत सांगून 8400 कोटींचे विमान घेतले. 20 हजार कोटी खर्चून नवीन संसद भवन बांधण्याचा घाट घातला जातोय. हे सर्व घोटाळे आणि भ्रष्टाचार नाही तर दुसरं काय आहे मोदीजी? हे जनतेच्या पैशातून 8400 कोटींचे विमान वगैरे ऐकून प्रकर्षाने आठवते मोदीजी की पंडित नेहरूंनी आपल्या एकूण 196 कोटी रुपयांच्या संपत्तीमधून 186 कोटी रुपयांची संपत्ती देशासाठी स्वातंत्र्यलढ्यात दान केली होती. 11 वर्ष तुरुंगात काढली होती. 186 कोटी संपत्ती त्या काळात ज्या काळात कलेक्टर ला 50 रुपये पगार होता. तुम्ही देऊ नका निदान आहे ती विकू तरी नका.

या संसदेतील भाषणात तुम्ही जे बोलायला पाहिजे होत ते तर तुम्ही बोललाच नाहीत मोदीजी. अगर काँग्रेस ना होती तो मैं किसकी कम्पनिया बेचता? असं एक महत्वाचं वाक्य तुम्ही सोडून दिलंत. स्वातंत्र्यानंतर 70 वर्षात असा पंतप्रधान झाला नाही ज्याने 24 पेक्षा जास्त सरकारी कंपन्या विकल्यात. त्यातली एकही कंपनी मोदी सरकारने स्वतः बनविलेली नव्हती हे विशेष. सर्व कंपन्या काँग्रेस काळात बनविलेल्या होत्या. त्यांनी त्या कम्पन्या बनविल्या नसत्या तर तुम्ही काय विकलं असत मोदीजी? काहीही गरज नसतांना रिझर्व्ह बँकेतील जो दीड लाख कोटी रुपयांचा फंड आपण काढलात तो आपत्कालीन फंड काँग्रेसच्याच काळात रिझर्व्ह बँकेत जमा झालेला होता मोदीजी. काँग्रेस नसती तर तो फंडच नसता, त्यामुळे तुम्हाला तो काढताच आला नसता.जर काँग्रेस नसती तर तुम्ही काँग्रेसचे मोठे नेते सरदार वल्लभभाई पटेल आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुभाषचंद्र बोस यांचे पुतळे बसवुच शकले नसते मोदीजी. तुम्हाला विदेशात सुद्धा काँग्रेसचेच नेते असलेल्या गांधींचे नाव घ्यावे लागते मोदीजी कारण तुमच्याकडे स्वातंत्र्यलढ्यात लढलेला एकही नेता नाही ज्याचे तुम्ही विदेशात नाव घेऊ शकता.

जेव्हा काँग्रेसच्या हातात सत्ता आली त्यावेळी या देशात एक सुई सुद्धा बनत नव्हती. इंग्रजांनी लुटून देश खिळखिळा करून टाकला होता. मग नेहरूंनी सुद्धा म्हणायला पाहिजे होत की, इंग्रजांनी हा देश लुटून बरबाद केला, काहीच शिल्लक ठेवलं नाही. 150 वर्षात सर्व लुटून नेलं. मी देश कसा चालवू? मी कसा विकास करू? पण नेहरूंनी सुई न बनणार्‍या ह्या देशात आयआयटी, मेडिकल कॉलेज, रिसर्च सेंटर, विद्यापीठे, विमानतळे, सरकारी कंपन्या बनविल्या. मोदी सरकार ज्या सोशल मीडियाच्या आधाराने देशात सत्तेवर बसलं तो सोशल मीडिया ज्याद्वारे हाताळला जातो ते कम्प्युटर, मोबाईल सुद्धा काँग्रेस काळातच देशात आलेत हे विसरू नका मा. मोदीजी. त्याच मोबाईल आणि कम्प्युटर चा वापर करून , खोटा प्रचार करून आज तुम्ही सत्तेत आहात मा.मोदीजी. इंग्रजांच्या हातून ज्यावेळी काँग्रेसने हा देश हाती घेतला त्याकाळी देशाची जी स्थिती होती त्या स्थितीपेक्षा 2014 सालची देशाची स्थिती लाख पटीने चांगली होती. ती तुम्ही बिकट करून ठेवली आहे. देशावर गेल्या 70 वर्षात झालेले 54 लाख कोटींचे कर्ज तुम्ही 2014 पासून फक्त 7 वर्षात 101 कोटींच्या पार घेऊन गेले आहात. बोलतांना कधीच आपण या देशाचे पंतप्रधान वाटत नाही. कायम भाजपचे प्रवक्ते वाटता. पाकिस्तान, मुस्लिम, काँग्रेस-नेहरू यावरच आयुष्यभर बोलणार आहात की कधी रोजगार, विकास, महागाई, चीनवर सुद्धा बोलाल मोदीजी? इथे दुधाने धुतलेला कुणीच नाही. मी हे लिहितोय म्हणजे काँग्रेस खूपच चांगली आहे असे अजिबात नाही परंतु तुमच्यापेक्षा निश्चितच लाख पट चांगली आहे. आज जिथे विरोधकांना पाकिस्तानी-देशद्रोही म्हणण्याचा प्रघात पडलाय तिथे स्वातंत्र्यानंतरच्या काँग्रेसच्या पहिल्या मंत्रिमंडळात काँग्रेसने विरोधी पक्षाच्या 7 लोकांना मंत्री म्हणून घेतले होते ज्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा समावेश होता. कारण त्यांना देशाचे मंत्रिमंडळ हवे होते पक्षाचे नाही. अटलबिहारी वाजपेयी यांना किडनीचा त्रास होता. आपल्या देशात उपचार शक्य नव्हते, विदेशात उपचार करण्यासाठी आर्थिक तरतूद नव्हती. वाजपेयी यांचे विदेशात किडनीचे ऑपरेशन व्हावे म्हणून राजीव गांधींनी भारताच्या प्रतिनिधी मंडळासोबत वाजपेयींना संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीसाठी पाठविले व सांगितले की तिथे तुम्हाला उपचार घेत येतील. खुद्द अटलबिहारी यांनी म्हंटल होते की मी आज केवळ राजीव गांधींमुळेच जिवंत आहे. काँग्रेस नसती तर इतके प्रगल्भ राजकारण या देशाने कधी पाहिलेच नसते मोदीजी.

आणि हो सर्वात महत्वाचे हे की, जर काँग्रेस नसती तर आपला देशच स्वतंत्र झाला नसता मोदीजी. त्यामुळे देशात राज्यघटना लिहिल्या गेली नसती. आणि तुम्ही ओबीसी असून या देशाचे पंतप्रधान कधीच बनू शकले नसते. आणि तुम्ही पंतप्रधान बनले नसते तर आम्हा जनतेला सुध्दा कळले नसते की काँग्रेस तुमच्यापेक्षा कीतीतरी चांगली होती..

✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-९८२२९९२६६६