बोलीभाषेला त्या मातीचा गंध असतो

129

मातृभाषा हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आपली भाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख असते. केवळ एक संपर्काचे माध्यम इतकाच भाषेचा उपयोग आणि व्याप्ती नाही तर मातृभाषेला सामाजिक,सांस्कृतिक, राष्ट्रीय तसेच वैचारिक असे अनेक पदर आहेत. म्हणून भाषा मानवी जीवनाचे महत्त्वाचे अंग बनले आहे. मातृभाषेतून सहजता, आपलेपणा जाणवते. म्हणून मातृभाषा हा भावनिक पातळीवरचा विषय आहे.संपूर्ण जगात बोलल्या जाणाऱ्या विविध मातृभाषांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्या भाषा टिकल्या पाहिजे, त्यांचे संवर्धन झाले पाहिजे असे प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे.बोलीभाषांना प्रोत्साहित करण्यासाठी, बहुभाषिकता आणि बहुसंस्कृतीकरणाद्वारे विविधता आणि आंतरराष्ट्रीय समजूतदारपणा त्याचबरोबर एकता वाढवण्यासाठी २१ फेब्रुवारी १९५२ मध्ये बांगलादेशात विद्यार्थ्यांनी उर्दू सोबत बांग्ला भाषेलाही राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा म्हणून महाविद्यालयात,रस्त्यावर निदर्शने केली होती. त्यावेळी पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्या स्मृतीची आठवण म्हणून दरवर्षी बांगलादेशात २१ फेब्रुवारी हा दिवस मातृभाषा दिन म्हणून उत्सव साजरा केला जातो.

रझाकुल इस्लाम, कॅनडातील व्हॅंकुव्हरमध्ये राहणारी बंगाली भाषिक लोकांनी ९ जानेवारी १९९८ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाचे कोफी अन्नान यांना पत्र लिहिले की त्यांनी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस घोषित करून जगातील बोलीभाषा वाचविण्याकरीता एक पाऊल पुढे टाकावे. नोव्हेंबर १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (यूनेस्को) च्या जनरल कॉन्फरन्सने हा दिवस राष्ट्रभाषा दिन म्हणून जाहीर केला आणि त्यानंतर लागलीच २००० पासून आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस जगभरात साजरा केला जाऊ लागला.मातृभाषा म्हणजे अशी भाषा जी मुलं सर्वप्रथम आपल्या घरात बोलायला शिकतात, ही भाषा त्याला शिकण्यासाठी त्याची पहिली गुरु म्हणजे त्याची आई असते. म्हणून या भाषेला मातृभाषा म्हटले जाते.भाषा विचारांची देवाण-घेवाण करण्याचा एक माध्यम आहे. भारतात अनेक धर्म आणि जातीचे लोक राहतात. प्रत्येकाची भाषा वेग-वेगळी आहे. महाराष्ट्रात सुद्धा बहुभाषिक लोक राहतात. आपल्या भाषेत बोलली जाणारी भाषा त्या भाषेची मायबोली म्हटली जाते.

कोल्हापुरी, कारवारी, अहिराणी, मराठवाडी, नागपुरी, कोकणी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, जामनेरी, खानदेशी असे बोलींचे विविध उपप्रकार आहेत.सोबतच आदिवासी जमातीमध्ये गोंडी, भिल्ल, वारली, पावरी, मावची, कोरकू, कोलामी, कातकरी, माडिया आदी बोलीभाषा प्रमुख आहेत. यापैकी गोंडी व भिल्ली या पोटभाषा अतिप्राचीन आहेत. महाराष्ट्रातील आदिवासी बोलींमध्ये गोंडी बोली सर्वाधिक बोलली जाते.पश्चिम विदर्भातील वऱ्हाडी आणि पूर्व विदर्भात बोलली जाणारी झाडीबोली यांची स्वतंत्र ओळख आहे. वऱ्हाडी आणि झाडीबोलीत काही सूक्ष्म फरक जाणवतो .प्रत्येक बोलीभाषेला त्या मातीचा गंध असतो.त्यात प्राचीन संस्कृतीच्या संस्काराची खूण आढळते. बोलीभाषा आपल्या मूर्त आणि अमूर्त वारसाचे जतन आणि विकास करण्याचे सर्वात शक्तिशाली साधन आहेत.१६ मे ००७ रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने आपल्या ठरावामध्ये सदस्य राष्ट्रांना “जगातील लोक वापरत असलेल्या सर्व भाषांच्या जतन आणि संरक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी” आवाहन केले. त्याच ठरावानुसार, बहुभाषिकता आणि बहुसांस्कृतिकतेच्या माध्यमातून विविधतेत एकता आणि आंतरराष्ट्रीय समज वाढवण्यासाठी २००८ हे भाषा आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून सर्वसाधारण सभेने घोषित केले.

प्रत्येक प्रांतातील लोकांची मातृभाषा, त्यांची संस्कृती, त्यांची ओळख, संप्रेषण, सामाजिक एकीकरण, शिक्षण आणि विकासासाठी मातृभाषा परिणामांसह महत्त्वाची आहे. सध्याच्या झपाट्याने होत असलेल्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे, ते अधिकाधिक धोक्यात येत आहे किंवा पूर्णपणे नाहीसे होत आहे. जेव्हा भाषा क्षीण होतात, तेव्हा जगातील सांस्कृतिक विविधतेची समृद्ध संस्कृती देखील कमी होते. याच मातृभाषांमुळे त्या प्रदेशातील संस्कृती, संधी, परंपरा, स्मृती, विचार आणि अभिव्यक्तीच्या अनन्य पद्धती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक समाज त्यांच्या भाषांमधून अस्तित्वात आहेत जे पारंपारिक ज्ञान आणि संस्कृतींचे शाश्वत मार्गाने प्रसार आणि जतन करतात.भाषेला चांगले भविष्य सुनिश्चित करण्यासाठी मौल्यवान संसाधने निर्माण करणे आवश्यक आहे. दर दोन आठवड्यांनी एक भाषा संपूर्ण सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा घेऊन नाहीशी होताना दिसून येते. जगात बोलल्या जाणाऱ्या अंदाजे ६००० भाषांपैकी किमान ४३% भाषा धोक्यात आहेत. केवळ काही शेकडो भाषांना खऱ्या अर्थाने शिक्षण प्रणाली आणि सार्वजनिक ठिकाणी स्थान दिले गेले आहे.आता यांत्रिक युगात शंभरहून कमी भाषा वापरल्या जातात.भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो.

महाराष्ट्रात मातृभाषा संवर्धनाचा विषय पुढे येतो तेव्हा फक्त प्रमाणभाषाच गृहित धरली जाते. प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या असंख्य बोली भाषेचे संवर्धन, तिचे जतन किंवा त्यात बोलीभाषेतून लेखन करून संस्कृती संवर्धनासाठी विविध विषयावर साहित्यनिर्मिती व्हावी, अशी मागणी करताना फारसे कुणी दिसत नाही. जिल्ह्यागणिक मराठीचा वेगळा ठसा आहे. त्या त्या ठिकाणी वेगवेगळे स्थानिक शब्द तिच्या वैभवात भर घालतात. पण इंग्रजीच्या आक्रमणामुळे बोलीभाषेतील हे शब्द नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या शब्दांची कुठे नोंदच झाली नाही, तर स्थानिक भाषा जतन कशी होणार, याचाही विचार शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांबरोबरच सरकारनेही करणे गरजेचे आहे.

✒️अरूण झगडकर(चंद्रपूर,कवी,लेखक,समिक्षक)मो:-9405266915