वेकोलिने केली साखरी येथील शेतकर्‍यांची फसवणूक – आरोप

38

🔹न्याय न मिळाल्यास २३ मार्च पासुन बेमुदत उपोषणाचा इशारा 

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.13मार्च):- राजुरा तालुक्यातील साखरी वाघोबा येथील शेतजमीन वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या पोवनी ओपन कास्ट कोळसा खाणी क्रमांक दोन व तीन करिता अधिग्रहित करण्यात आली. मात्र शेतकर्‍यांना प्रती सातबारा नोकरी व पडीत, कोरडवाहू, सिंचन जमिनीप्रमाणे सहा,आठ, दहा लाख रुपये मोबदला देण्याचे ठरले असतांना व करारपत्र केले त्यावेळे पासून अनेक शेतकर्‍यांना मोबदला व नोकरी काहीच मिळाले नाही. एवढेच नव्हे तर याविषयी विचारणा करण्यासाठी गेल्यावर वेकोलिचे अधिकारी माहिती न देता अपमानास्पद वागणूक देऊन परत पाठवितात. यामुळे गावातील एका प्रकल्पग्रस्त मुलीने आत्महत्या केली होती.

वेकोलि नियमानुसार वेळेवर मोबदला व नौकरी देत नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे. कंपनीच्या या शेतकरी विरोधी धोरणामुळे २५० पेक्षा अधिक प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना गेल्या पाच वर्षापासून नोकरी व मोबदला मिळाला नसून प्रत्येकी सुमारे सात लाखाचे नुकसान झाले आहे. आता वेकोलि अधिकारांचा हा जाच असह्य झाला असून दहा दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास कंपनीच्या या शेतकरी विरोधी आणि अमानवीय धोरणाच्या विरोधात दिनांक २३ मार्च २०२२, रोज बुधवार पासून वेकोलिच्या बल्लारपुर क्षेत्रीय मुख्य महाप्रबंधक कार्यालयापुढे बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा साखरी येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व प्रकल्पग्रस्त शेतकरी पंढरी पाटील घटे यांनी दिला आहे.
 वेकोलिने सन २०१६ पासून कोल बेअरींग सेक्शन ९ लागु केल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयाच्या फेर्‍या मारूनही अनेक शेतकर्‍यांना नोकरी व मोबदला दिला नाही. मग अर्धा लोकांना नोकरी देऊन इतरांना मात्र ताटकळत ठेवले. काही शेतकर्‍यांचे करारपत्र न करता या काळात जबरीने कोळसा खाण सुरू केली.

यामुळे आमच्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. यानंतर आम्हाला कागदपत्रे गोळा करणे, वैद्यकिय तपासणी यासाठी मोठा वेळ लावून हेतुपुरस्सर विलंब केला. गेल्या पाच-सहा वर्षापासून आमच्या मालकीची जमीन असतांना वेकोलि अधिकारी आमच्याशी तुच्छतेने वागत असून अनेकदा अपमानित करीत आहेत. यामुळे आमच्या गावातील एका प्रकल्पग्रस्त मुलीने विष पिऊन आत्महत्या केली. अद्यापही वेकोलि अधिकाऱ्यांची मानसिकता बदलली नसून प्रकल्पग्रस्त शेतकरी पूर्वीप्रमाणेच नोकरी व मोबदल्या विषयी विचारणा करायला गेल्यावर अधिकारी वारंवार बोलावून अपमानित करीत आहेत.   या सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या वतीने सात – आठ वर्षापूर्वी करारनामा करूनही अद्याप नोकरी व मोबदला न दिल्याने या आर्थिक नुकसानीपोटी प्रत्येक शेतकर्‍याला सात लाख रुपये देण्यात यावे, प्रती सातबारा एक नोकरी ताबडतोब द्यावी, शेतजमीन ज्या कोळसा खाणी करिता अधिग्रहित केली असेल त्याच प्रकल्पात नोकरी द्यावी अथवा प्रकल्पग्रस्ताच्या मागणी नुसार नोकरीचे ठिकाण द्यावे.

साखरी गावातील शेतीव्यवसाय बंद झाल्याने गावातील बेरोजगारांना काम द्यावे, गावात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून पाणी मारून व अन्य उपाय करून ते कमी करावे आणि साखरी गावात रस्ते, नाल्या करून विकास करावा तसेच गाव विकासाचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे, वारंवार शेतकर्‍यांना अपमानित करणे थांबवावे आणि प्रकल्पग्रस्त कामगारांना शिक्षणानुसार काम देऊन अधिकाऱ्यांनी दबाव आणू नये, यापुर्वी प्रकल्पग्रस्त मुलीने वेकोलि अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती, त्या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करावे, सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कसलाही भेदभाव न करता सारखा न्याय द्यावा या मागण्या करण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात केंद्रीय कोळसा मंत्री, सीएमडी नागपूर, चंद्रपूर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून पूर्तता न झाल्यास दिनांक २३ मार्च २०२२ पासून धोपटाला  येथील बल्लारपूर मुख्य महाप्रबंधक कार्यालयापुढे बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा साखरी येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व  प्रकल्पग्रस्त शेतकरी पंढरी पाटील घटे, शेषराव बोंडे, बळीराम खुजे, मारोती गोसावी उरकुडे, मारोती श्रावण उरकुडे, सुंदरलाल कावळे, वासुदेव पिंपळकर,धनराज लांडे, विजय निमकर, आतिश पिदूरकर, प्रमोद पिंपळकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.