डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता

36

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हंटले की सर्वांना आठवते ती राज्यघटना. बाबासाहेबांच्या आयुष्यातील अनेक पैलूंवर लेखांमधून चर्चा झाली आणि होत असते, परंतु त्यांच्या रोखठोक पत्रकारितेबद्दल फारशी चर्चा होत नाही. आज त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या पत्रकारितेबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात १९२० साली ‘मूकनायक’ पाक्षिक सुरू करून केली. या ‘मूकनायक’ चे संपादक बाबासाहेबांनी पांडुरंग भटकर यांना केले. बाबासाहेबांची प्रवाही वाक्यरचना आणि थेट मनाला भिडणारे रोखठोक लेखन यामुळे ‘मूकनायक’ अगदी कमी वेळात प्रसिद्ध झाले. काय करूं आता धरूनिया भीड | नि:शंक हे तोंड वाजविले | नव्हे जगीं कोणी मुकीयांचा जाण | सार्थक लाजून नव्हें हित | ह्या ‘मूकनायक’च्या सुरुवातीलाच दिलेल्या अभंगातून बाबासाहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. पण बाबासाहेब पुढील शिक्षणसासाठी विदेशात गेल्यानंतर आर्थिक परिस्थितीमुळे ‘मूकनायक’ बंद पडले. ४ नोव्हेम्बर १९२७ मध्ये बाबासाहेबांनी दुसरे पाक्षिक ‘बहिष्कृत भारत’ काढले. त्यानंतर २९ जून १९२८ मध्ये ‘समता’, २४ नोव्हेंबर १९३० ला ‘जनता’ व पुढे ‘प्रबुद्ध भारत’ अशी वृत्तपत्रे काढली. बाबासाहेबांचा बिनतोड युक्तिवाद, बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर या धाटणीची मांडणी यामुळे त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात अतुलनीय कार्य करून ठेवले आहे. परंतु जाणूनबुजून म्हणा किंवा अजाणतेपणाने बाबासाहेबांना आपल्या सर्वांकडून पत्रकार म्हणून दुर्लक्षितच ठेवण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अत्यंत निर्भीड, दर्जेदार, रोखठोक व निस्पृह पत्रकार होते. सत्याची बाजू घेतांना त्यांनी कधीच जात-धर्म बघितला नाही. जितक्या ताकदीने ते अस्पृश्यांसाठी लढले, तेव्हढ्याच ताकदीने त्यांनी अन्यायग्रस्त सवर्णांचीसुद्धा बाजू घेतली आहे. त्यावेळी मालिनी पाणंदीकर नावाच्या हिंदू युवतीने एका खान आडनावाच्या मुस्लिम व्यक्तीशी विवाह केला. त्यावर अनेक वर्तमानपत्रांनी गदारोळ उठवला. या प्रकरणावर लांबच लांब लेख छापून येऊ लागले. जाहीर सभांमधून त्यावर लोक भाषणे देऊ लागले. देशात अनेक मोठं-मोठे प्रश्न असतांना ह्या प्रकरणाला सतत दोन महिन्यांपर्यंत वर्तमानपत्रांकडून डोक्यावर घेण्यात आले. त्यावर अस्वस्थ होऊन बाबाबासाहेबांनी लिहिले की, “हिंदू समाजावर गेल्या ५-१० वर्षांतच किती तरी मोठे आघात झाले असतील, परंतु मालिनी-खान विवाहामुळे जेव्हढी खळबळ उडाली, तेव्हढी खळबळ आतापर्यंत कशानेच उडाली नव्हती. स्वामी श्रद्धाणंदच्या खुणावर मराठी वर्तमानपत्रात जेव्हढे आणि जितके लांबलचक लेख आले नाहीत तेव्हढे व तितके लांबच लांब लेख या एका विवाहावर प्रसिद्ध झाले. ह्या धर्माच्या ठेकेदारांना इकडे रोज शेकडो लोक हिंदू धर्म सोडून इतर धर्मात प्रवेश करत असतांना त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही परंतु एका विवाहाने ह्यांचा धर्म बुडतो ह्याला काय म्हणावे?” म्हणजेच फक्त अस्पृश्यच नाही तर माणूस/व्यक्ती मग ती कोणत्याही जाती-धर्माची असो बाबासाहेबांमधील जागृत पत्रकार त्या अन्यायग्रस्त व्यक्तीची बाजू घ्यायचा.

पत्रकारिता करतांना त्यांनी कुण्याही व्यक्ती, समाज किंवा शासनाची भीड-भाड ठेवली नाही. बाबासाहेब जरी मोठे पत्रकार होते परंतु तरी त्यांनी वर्तमानपत्रांना सुद्धा चुकीच्या बाबींसाठी कायम धारेवर धरले. बाबासाहेबांचे त्यावेळी लिहिलेले लेख, अग्रलेख वाचले की त्यांचे विचार आजच्या काळातसुद्धा कालसुसंगत वाटतात. आज ज्याप्रमाणे देशातील गरिबी, बेरोजगारी, महागाई, ढासळलेली अर्थव्यवस्था हे कळीचे मुद्दे बाजूला सारून फक्त नाही फक्त धर्माला महत्व देऊन प्रसारमाध्यमे जनतेची दिशाभूल करीत आहेत त्याबद्दल बाबासाहेबांनी त्यावेळीच लिहून ठेवले आहे. बहिष्कृत भारत मधील अग्रलेखात बाबासाहेब लिहितात की, “महाराष्ट्रातील बरीचशी वर्तमानपत्रे म्हणजे अज्ञ लोकांना मूर्ख बनविण्याचे कारखाने आहेत. लोकांना कोणत्या मुद्यावर मूर्ख बनवून आपल्या पत्राचा खप वाढवीत येईल याचे या धूर्त पत्रकारांनी एक शास्त्रच बनविले आहे आणि आपल्या लेखनकलेचा त्याच कामी ते उपयोग करीत असतात. हे लेखक मोठे धार्मिक वृत्तीचे, प्रामाणिकपणे जुन्या समजुतीचे आहेत, असे मुळींच नाही. त्यांच्या काळजाला हिंदू पुरुषांनी युरोपियन स्त्रियांशी लग्ने केल्यास मुळीच धक्का बसत नाही. मद्यमांसाची तरफदारी करणाऱ्या लोकांनाही ते सत्पात्र ब्राम्हण आणि हिंदू समाजाचे पुढारी समजतात. धर्माच्या नावावर होणारे अनाचार, अत्याचार त्यांना बिनदिक्कत खपतात. हिंदू समाजाविषयी यांना खरोखरीच कळवळ असती तर हिंदुसमाजच्या इमारतीला जी भगदाडे पडली आहेत ती बुजविण्याकडे ह्यांनी लक्ष दिले असते.” हे त्यांचे विचार आजही या देशातील प्रसारमाध्यमांना तंतोतंत लागू पडतात.

देशात ज्या धार्मिक दंगली घडतात त्याबद्दल बाबासाहेब आपल्या अग्रलेखात म्हणतात की, “सध्यां हिंदु-मुसलमानांमध्ये भयंकर तेढ उत्पन्न झाली आहे. तिचा फायदा काही लबाड लोक घेत आहेत. धर्माने माणसाला देवदूत बनविले पाहिजे. परंतु तसे न होतां धार्मिक कलहामुळे धर्माच्या योगाने माणसाचे माणूसपण जाऊन त्याला पशुपणा येत आहे. अशा स्थितीत अशिक्षित गुंड मारामाऱ्या करितात. एकमेकांची टाळकी सडकतात व खून करितात आणि सुशिक्षित गुंड अल्पायासाने आपापल्या समाजांत लोकप्रिय होण्याची पर्वणी साधून घेतात. अशिक्षित गुंडांच्या दुष्ट कृत्यांची खरी जबाबदारी खरे म्हटले असतां सुशिक्षित गुडांवरच आहे. कारण त्याच्या चिथावणीमुळेच अशिक्षित लोक अत्याचार करावयाला प्रवृत्त होतात. सुशिक्षित गुंड जसें हिंदूंत आहेत तसे मुसलमानांत आहेत. पंडितांत आहेत तसे मौलानांमध्ये आहेत. खरे पाहिल्यास धर्माचा विचार कोणीच करीत नाही, धर्माच्या आद्य तत्त्वांची कोणालाच पर्वा नाहीं.अशा वेळी ढोंगी लोकांचे फावावें हे स्वाभाविकच होय.” हे बाबासाहेबांचे शब्द वाचले असता जणू त्यांनी आजच्याच देशाच्या परिस्थितीवर भाष्य केल्यासारखे वाटते. धार्मिक दंगली, वाद, भांडणे कमी करणे, मिटवणे हे पत्रकाराचे काम असते परंतु आज प्रसार माध्यमेच धार्मिक दंगलींसाठी नागरिकांना प्रवृत्त करतांना दिसतात. बाबासाहेबांनी सांगितलेले सुशिक्षित गुंड हे अशिक्षित गुंडांच्या भरवश्यावर आजही आपली पोळी भाजून घेतांना दिसतात.
पत्रकारिता कशी असावी? अन्यायग्रस्तांना आपला आधार वाटावा, धार्मिक व जातीय सलोखा कायम राहण्यास मदत व्हावी, सरकारवर तर दबाव असावाच परंतु नागरिकांना सुद्धा त्यांची कर्तव्ये आठवण करून देण्याची क्षमता असावी, ही बाबासाहेबांच्या लेखी पत्रकारितेची व्याख्या होती. ही व्याख्या आजच्या पत्रकारांनी अंगी बाणवली तर देशातील अर्धे प्रश्न सुटू शकतील. पण ते आता दिवास्वप्नच आहे.
त्याकाळात वृत्तपत्रे दोन मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन चालविली जात असत. एक म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनाला गती देणे आणि दुसरे म्हणजे सामाजिक सुधारणा करणे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात संपूर्ण आयुष्य झोकून देण्यास तयार असणारे नेते सामाजिक सुधारणांसाठी कमालीचे उदासीन होते. त्यांना राजकीय स्वातंत्र्य तर हवे होते परंतु माणसाला माणसाचा दर्जा मिळावा हे मात्र मान्य नव्हते. अशा नेत्यांच्या दुटप्पीपणावर बाबासाहेबांनी सडकून टीका केली. त्यांच्या अग्रलेखांमधील सडेतोड मांडणीमुळे अनेक नेत्यांचे सामाजिक सुधारणांबद्दल विचारपरिवर्तन झाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांनासुद्धा बाबासाहेबांनी वृत्तपत्रातून वाचा फोडली. केसरीच्या ता. २८ जुलैच्या अंकात शेतसारा किती घ्यावा या मथळ्याखाली एक अग्रलेख आला होता व बाबासाहेबांनी तो अग्रलेख वाचून त्यात शेतसाऱ्याबद्दल केलेला युक्तिवाद आपल्या लेखातून खोडून काढला होता. शासनाला कर देतांना अल्पभूधारक, गरीब शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही असे त्याचे स्वरूप असावे अशाप्रकारची मांडणी त्यांनी अग्रलेखातून केली होती.बाबासाहेबांनी कायमच कामगार, कष्टकरी, गिरणी कामगार, वेठबिगार, गरीब शेतकरी, अस्पृश्यांची, आर्थिकदृष्ट्या कमजोर व अन्यायग्रस्तांची बाजू घेत पत्रकारिता केली. त्यामुळे शासन, प्रशासन, जमीनदार, गिरणी मालक, उच्चवर्णीय सर्वांचाच विरोध होत होता. त्यांना कोणताही आधार- पाठिंबा नसतानासुद्धा त्यांनी कुणाच्याही विरोधाची पर्वा न करता एकट्याच्या ताकदीवर पत्रकारिता चालवलेली होती. आजची शासन, प्रशासन व बड्या उदयॊगपतींची हाजी हाजी करणारी पत्रकारिता बघितली की त्यांच्याबद्दल घृणा उत्पन्न होते.

त्याकाळात देखील लंडनमधील द टाईम्स, ऑस्ट्रेलियातील डेली मर्क्युरी, न्यूयॉर्क टाईम्समधील न्यूज अमेरिकन जर्नल यासारख्या विख्यात आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रासह कृष्णवर्णीय लोकांनी चालवलेली वर्तमानपत्रे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यताविरोधी चळवळीची दखल घेत होते. यावरून त्यांच्या सामाजिक कार्याची, त्यांच्या मांडणीची व पत्रकारितेची आपल्याला कल्पना येऊन शकेल. आजही लोक जे लिहायला घाबरतात ते बाबासाहेबांनी त्याकाळात अनेकदा लिहून सर्वसामान्यांपर्यंत पोचवले हते.बाबासाहेबांनी राज्यघटना लिहून राजकीयदृष्ट्या तर सर्वांना समानतेचा अधिकार दिलाच परंतु त्या अगोदरपासून त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून दलितांना सामाजिक समानता मिळवून देण्याचा लढा उभा केला होता. मीच तुमचा तारणहार आणि मीच तुमचा नेता असे म्हणून अस्पृश्यांवर देखील त्यांनी आपले मत कधीच लादले नाही. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे झालेल्या मुंबई इलाखा अस्पृश्य परिषदेपुढे बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ‘‘अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारायचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. फक्त समानतेचे हक्क मिळतील असाच धर्म त्यांनी स्वीकारावा.’’ धर्मांतराच्या बाबतीत देखील त्यांनी तो निर्णय घेण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य असल्याचे मान्य केले होते.

बाबासाहेब एक विश्वव्यापक व्यक्तिमत्व होते. त्यांचा दृष्टिकोन, त्यांच्या बुद्धिमत्तेचा आवाका प्रचंड होता. परंतु आज त्यांचे अनुयायीच कळत-नकळतपणे त्यांना मर्यादित करून ठेवण्यात मोठा वाटा उचलत आहेत. त्यांना एका जातीपुरते मर्यादित करून ठेवले आहे. सर्वच जाती-धर्मासाठी केलेले कार्य न सांगता , अस्पुश्य-दलितांसाठी केलेले कार्यच वारंवार सांगत बसल्याने बाबासाहेबांना इतरांच्या नजरेत फक्त दलितांचेच नेते करून ठेवले आहे. त्यांना फक्त आमचे म्हणू नका , आपले म्हणा. राज्यघटनेच्या पलीकडे जाऊन १९२० पासून ते १९४७ पर्यंत त्यांनी प्रत्येक क्षेत्रात केलेले कार्य, त्यांनी सर्वांसाठी केलेली पत्रकारिता समाजासमोर आणणे गरजेचे आहे. बाबासाहेब कायम म्हणत की “तुमच्या वागण्या-बोलण्यातून तुमच्या धर्माबद्दल इतरांमध्ये आदर निर्माण झाला पाहिजे.” बस इतके एक वाक्य जरी आज आपण मनावर घेतले तर ती बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल.

✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-९८२२९९२६६६