कायदा हातात घेणे लोकशाही समाजव्यवस्थेसाठी घातक!

36

✒️प्रा डॉ सुधीर अग्रवाल(९५६१५९४३०६)

आपला देश हा धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा आहे. समानतेचा संदेश देणाऱ्या संतमहात्म्यांचा वारसा आपल्याला आहे. मात्र आज जातीय- धार्मिक तणाव प्रचंड वाढलेला आहे. जातीपातीच्या नावाने समाजात आक्रमकता माजली आहे. कायदा हातात घेणे, कोणालाही शिक्षा करण्याचा अधिकार आपणास आहे ही भावना वाढीस लागणे हे या लोकशाही समाजव्यवस्थेला घातक आहे.

दोन समाजात, धर्मात जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करणे, दंगा घडवून आणण्याच्या उद्देशाने चेतावणी देणाऱ्यांविरोधात भारतीय दंडसंहिता कायद्यानुसार 153, 153 अ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येतो. या गुन्ह्यात तीन वर्षे कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात व देशात जाणीवपूर्वक दोन समुदायात हिंसा घडवून आणण्याचा प्रकार सुरू आहे जो अतिशय चिंताजनक आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच आपला भारत देश विविध परंपरा, विविध संस्कृती, विविध भाषा, धर्म ,जात ,प्रांत या सर्व गोष्टींच्या कुठल्याही पर्वा न करता सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवत सर्व समाजातील लोक एकत्र नांदतात.भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे प्रत्येक धर्माला प्रत्येक जातीला आपल्या आपल्या रितीरिवाजानुसार सण-उत्सव,प्रार्थना व धार्मिक कार्य करण्याचे स्वातंत्र्य आहे. गेल्या ७५ वर्षात अनेक वेळा काही जातीय कट्टरतावादी प्रवृत्तींनी ही शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला ,परंतु भारतीय नागरिकांनी त्यांना दाद दिली नाही. आज पुन्हा एकदा समाजातील काही घटकांकडून अशाच प्रकारे हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण होईल व त्याचा राजकीय फायदा घेता येईल, असा विचार करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आयुष्यात आपण सर्वांनी लहानपणापासून हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन या सर्व समाजातील मित्रांसोबत राहत आपण लहानाचे मोठे झालो. अचानक आज कुणीतरी नेता येऊन म्हणतो की, या धर्माचा विरोध करा, त्या धर्माचा विरोध करा हे खरोखर सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे कृत्य असून,या प्रवृत्तीचा आपण करू, तेवढा निषेध कमीच आहे. अशा प्रकारचे वातावरण हानीकारक असून भविष्यात आपण आपल्या पुढच्या पिढीला हे शिक्षण देणार आहोत का …?याचा आपण कुठंतरी विचार करायला पाहिजे.

देशात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, राममनवमी व हनुमान जयंती निमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेला हिंसाचाराचे गालबोट लागले. देशातील काही भागात समाजकंटकानी हिंसाचार घडवून आणला.या हिंसाचारात दगडफेक व काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्याने दोन समुदायात तेढ निर्माण झाली.हे होता कामा नये.लोकांनी कायदा हातात घेऊ नये.

स्वतंत्र भारताचे सर्वांत मोठे, महत्त्वपूर्ण यश म्हणजे देशाने आपली भू-राजकीय एकात्मता टिकवून धरली आहे आणि तीसुद्धा संपूर्णपणे अहिंसक, लोकशाही मार्गाने, हेच होय. भारतासारखा विशाल देश कोणत्या शक्तीने एकत्र ठेवला आहे? भारतीय संस्कृती हीच ती शक्ती आहे.