विद्रोही सत्यशोधक विजय सातपुते

विद्रोहाची परंपरा खुप जुनी आहे, चावार्का पासुन बुद्ध,फुले,शाहु ते आंबेडकरां पर्यंत त्यात अनेक संत समाज व्यवस्था, जाती व्यवस्थेला सुरुंग लावुन वैकुंठ वाशी झाले.व्यक्तिगत फायद्या साठी केलेला संघर्ष हा विद्रोह म्हटल्या जात नाही.समाजातील गोरगरीब मागासवर्गीय जाती जमाती वर केलेला अन्याय अत्याचार हा उगड्या डोळ्याने पाहणे ज्यांना शक्य होत नाही.तो माणुस त्याशक्ती विरोधात लढण्यासाठी तयार होतो तो विद्रोही म्हणुन ओळखल्या जातो.अन्याय अत्याचाराच्या विरोधात प्रथम लढाई करावी लागते, नंतर त्याला वैचारिक वारसा लागतो.तेव्हा तो त्या एक विचारधारेचा विद्रोही गणल्या जातो,बहुचर्चित आदिवासी भागात आदिवासी लोकांनी जेवण बनविण्यासाठी जमिनीवर पडलेले लाकुड तोडले तर तो मोठा चोर समजुन अटक केली जाते.त्या दिवसापासून तो गुन्हेगार ठरतो.पण त्याच भागातील उभे सागाची झाडे कापून गाड्या भरून लाकूड घेऊन जाणारा उच्च वर्गीय,वर्णीय कोण ठरते?. कोणीच नाही!. पोलीस रिकार्ड मध्ये तो सदन व्यापारी असतो,मग त्या विरोधात गोरगरीबांच्या बाजूने आवाज उचलणारा गुन्हेगार, नक्षलवादी,विद्रोही कसा होतो. म्हणजे न्याय देतांना या देशात नेहमी हाच फंडा लावल्या जातो. त्यालाच मनुवाद म्हणतात.त्या वादाच्या विरोधात जो जो संघर्ष करेल, समाजात जनजागृती करेल, तो विद्रोही ठरतो,आदिवासी समाजाच्या न्याय हक्क साठी लढणारा नक्षलवादी ठरतो,मुस्लिम समाजाच्या न्याय हक्का साठी लढणारा अतिरेकी ठरतो. मागासवर्गीय समाजाच्या न्याय हक्का साठी लढणारा आंबेडकरी विद्रोही ठरतो.सर्वानसाठी लढणारा सत्यशोधक विद्रोही ठरतो.

असंघटीत नाका कामगार,घरकामगर,विटभट्टी,रेती,आणि दगड फोडणारा कामगार एकूण बांधकाम करण्यासाठी लागणारा कामगार म्हणजेच असंघटीत कष्टकरी कामगार यांच्या साठी काम करणारा विद्रोही सत्यशोधक म्हणजे विजय गोविंद सातपुते. भांडुपच्या सिद्धार्थ नगर,मिलिंद नगर आणि आंबेडकर नगर या आंबेडकरी चळवळीच्या बाल्ले किल्ल्यातून असंघटीत कष्टकरी नाका कामगारांचे प्रबोधन करून संघटित करण्याचा संघर्ष विजय सातपुतेनी सुरू केला. असंघटीत नाका कामगारांना समजावुन सांगणे साधे काम नव्हते, कारण नाक्यावर बहुसंख्येने मागासवर्गीय समाजातील लोक त्यात बौद्धांची सांख्य जास्त त्यांच्या रक्तातच बाबासाहेब असतो.त्यांना सामोरे जातांना विजय सातपुते कधीच मागे हटले नाही,वैचारिक पातळीवर चर्चा करतांना त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक जन आंदोलनाची अभ्यासपूर्ण माहिती नाक्यावरील कार्यकर्त्यांना देत असतं.ज्यांची कोणती ओळख नाही, असा नाका कामगारांना संघटनेत पद देऊन त्यांची समाजात ओळख निर्माण करीत असत,गरिबीचे चटके शोषलेला माणुसच गरिबांना संघटित करून त्यांच्या न्याय हक्क आणि प्रतिष्ठे साठी लढू शकतो,हे विजय सातपुते यांनी नाका कामगारांना दाखवुन दिले.म्हणूनच त्यांना पुरोगामी चळवळीत विद्रोही सत्यशोधक म्हणुन ओळखले जात होते.

भारतात गरीब कुंटुंबाची आर्थिक कोंडी नेहमीच होत असते.त्यामुळे त्यांची मुलंमुली शिक्षणा पासुन वंचीत राहतात.शिक्षण नाही तर नोकरी नाही.नोकरी नाही तर कोणतीच प्रगती नाही. त्यामुळे त्यांना शैक्षणिक,सामाजिक,शारीरिक आणि आर्थिक संकटांना सतत संघर्ष करावा लागतो.या सर्व संकटावर मात करून जो नेहमी विजय होतो.आणि स्वतःची वैचारिक ओळख निर्माण करतो तोच खरा विजय असतो.असा माझ्या जीवनात आलेला आणि मला भिम भक्ताचा वैचारिक भिमसैनिक, शिष्य बनविणारा माझा जिवलग मित्र म्हणजेच सातपुतेचा विजय.

विषय कोणताही असो सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक,आर्थिक किंवा राजकीय यावर वैचारिक चर्चा,वादविवाद,संवाद,परिसंवाद यात अभ्यासपूर्ण उत्तर देऊन समोरच्याला निरुत्तर करून सातपुतेचाच विजय होत असे.ज्याला विजय सातपुतेचे विचार पटले नाही.त्यांनी त्यांचे म्हणणे खोडून काढण्याचा प्रयत्न केल्यास.कोणत्या पुस्तकात लिहले?. कोणी लिहले?. ते पुस्तक तुम्ही वाचले काय?.या रोख ठोक प्रश्नाने विजय सातपुते सर्वांची बोलती बंद करीत होते.यातुन मान्यताप्राप्त नेते,विचारवंत सुद्धा सुटले नाहीत.हे मी त्यांच्या सतत सोबत असल्यामुळे अनुभवले. मी नामांतर चळवळीतील जहाल नेते प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांचा भक्त होतो.दलित मुक्ती सेना ते दलित मुस्लिम सुरक्षा महासंघ असा प्रवास असतांना. कवाडे सरांना महाराष्ट्रातील सविस जिल्ह्यापैकी सतरा जिल्हे प्रवेश बंदी होती.तेव्हा मला बाबासाहेबानंतर कोणी नेता असेल तर ते फक्त प्रा.जोगेंद्र कवाडे सरच असु शकतात.असे वाटत होते. त्यांच्या ऐवढा जहाल नेता राज्यातच काय देशात असुच शकत नाही.असा माझा समज होता.तो समज विजय सातपुते यांनी खोडून काढला.मला त्यांनी विचारले भारतीय संविधान जे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहले ते तुम्ही कधी वाचले काय?.शुद्र पूर्वी कोण होते?.प्रॉब्लेम ऑफ रुपी, बुद्ध आणि त्यांचा धम्म, बाबासाहेबांची विलायते वरून पत्र,चांगदेव खैरमोडे यांची किती पुस्तक वाचली?.यांचे उत्तर माझा कडे नव्हते,कारण आम्ही कधी पुस्तक, ग्रंथ वाचण्याची तसदी घेतलीच नाही.आम्हाला आवड फक्त नेत्यांची भाषण ऐकण्याची.नेते जे बोलतात तेच लक्षात ठेवणे आणि तेच लोकांसमोर बोलणे.त्यात आपला नेता किती प्रामाणिक आणि धाडसी आहे.मोठमोठ्या नेत्याची जाहीर सभेत बोलून चड्डी लाल करते याचेच अप्रूप वाटत होते.

जहाल भाषा तीही फक्त सत्यानाश करणारी त्यामुळे दोन समाजात दोस्ती होण्या ऐवजी दुश्मनी निर्माण होणार अशी भाषण कवाडे सर तेव्हा करीत होते.त्याभाषणा करीत त्यांना जिल्हा बंदी होती.भारतीय संविधान असे भाषण करून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यास जिल्हा बंदी,भाषण बंदी घालते.कारण त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडून समाजात असणारी शांतता भंग होईल म्हणुन पोलीस असा नेत्यावर योग्य कारवाई करते हे विजय सातपुते कडून समजले तेव्हा पासुन मी भिम भक्ताचा भिमसैनिक शिष्य झालो.त्यांच्यामुळे वैचारिक ग्रंथ,पुस्तक,कथा, कांदबरी वाचण्याची सवय झाली.ती आज ही कायम आहे.त्यांच्यामुळे मी पत्रकार प्रशिक्षण घेतले.

मासिक,पाक्षिक,साप्ताहिकात बातम्या लेख लिहण्यास सुरुवात केली.आजच्या घडीला मी राज्यातील साठ वृत्तपत्रात नियमितपणे स्तंभ लेखन करीत आहे.चळवळ म्हणजे काय?. हे जाणुन घेण्या करीता आम्ही १९८२ ते १९८४ पर्यंत समाजवादी, राष्ट्र सेवा दल,डाव्या आणि आंबेडकरी चळवळीतील विचारवंतांच्या गाठी भेटी घेऊन. परिसंवाद, व्याख्यान,चर्चा सत्र घेऊन अनेक कार्यक्रम राबविले.त्यामुळे सर्वांची जवळून ओळख झाली.कॉम्रेड शरद पाटील यांच्या मुळे डावी चळवळ तिची विचारधारा कार्य आणि कृती दिसुन आली.नामांतर आंदोलनात कॉम्रेड शरद पाटील यांनी आदिवासीनां मोठ्या प्रमाणात मोर्चा,आंदोलनात उतरून स्वतः जेलची शिक्षा भोगली.जातीच्या प्रश्नावर रोख ठोक भूमिका त्यांनी घेतली त्यातुन डाव्या विचारधारेची मंडळी जगातील कामगारांना भांडवलदारांच्या शोषणा विरोधात संघर्ष करण्यास उतरतात.पण जातीव्यवस्थे मुळे होणाऱ्या शोषणा विरोधात लढण्यास तयार होत नाही.नि रोखठोक भूमिका घेत नाही.हे विजय सातपुते यांच्यामुळे कॉम्रेड शरद पाटील सोबत काम करण्यास मिळाल्या मुळे समजले. आजही असंघटीत कामगाराच्या न्याय हक्क साठी लढणारी इंटक,आयटक सिटू रस्त्यावर लढते मोर्चे आंदोलन करते,पण विधानसभेत, लोकसभेत यांचे लोकप्रतिनिधी ४५ दिवस अगोदर ह्याच मांगण्या पक्षाच्या वतीने रीतसर नोंद करून चर्चा घडवून आणीत नाही. तिथे ते पंचतारीक प्रश्नाच्या नांवे गोंधळ घालुन लक्षवेधण्याचे काम करता. वृत्तपत्रात छायाचित्रासह बातमी छापून आली की हे आम्ही तुमच्या साठी भांडतो हे दाखविण्यास मोकळे. हे सर्व समजवून घेण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाचा अभ्यास करावा लागतो. ते वाचल्या नंतर न्याय,हक्क आणि अधिकार कसे मिळवायचे यांची उत्तर मिळतात.रस्त्यावर किती ही आंदोलन करा त्यातुन तुम्ही सत्ताधाऱ्यावर आणि प्रशासनावर दडपण आणू शकता.वृत्तपत्रात बातम्या छापुन आणू शकता, तुम्हाला ते नेता बनण्यासाठी आणि संघटना वाढीसाठी पूरक असेल,पण न्याय हक्क आणि अधिकार मांगण्या साठी पूरक नसतात. त्याकरिता तुम्हाला सनदशीर मार्गाने पत्रव्यवहार, चर्चा, आणि संवाद साधावा लागेल.ही विजय सातपुते यांचे मांडणी आज ही मला मार्गदर्शक ठरत आहे.

विजय सातपुतेचा वैचारिक अभ्यास खूप होता,त्याबळावरच ते अनेक सुप्रसिद्ध विचारवंत, पत्रकार,साहित्यिक,नेते यांच्या बरोबर चर्चा करून वादविवाद घालुन वैचारिक संघर्ष करीत असत.त्यात प्रा.अरुण कांबळे,नामदेव ढसाळ,राजाभाऊ ढाले,निलिनी पंडित ते शेवटी कॉम्रेड शरद पाटील यांच्या पर्यंतचा संघर्ष तोंडी आणि लेखी मी अनुभवला आहे. एवढेच नाही तर राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे छत्रपती शिवाजी महाराज,मराठी आणि मुंबई वरील प्रेम किती ढोंगी आहे हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध करून दाखविले,ठाकरे कंपनी ने कधीच सनद शीर मार्गाने आंदोलन केले नाही.तोडफोड गुंडगिरी,विशिष्ट समाजाच्या विरोधात जातीवादी गरळ ओकुन कायदा सुव्यवस्था बिगडविण्याचे काम एक नाही हजारदा केले पण मनुवादी विचाराचे समर्थन करणाऱ्या सत्ताधारी,प्रशासकीय यंत्रणेने त्यांच्यावर कधीच संविधानाच्या चौकटीत राहुन कारवाई केली नाही.

विजय सातपुते यांच्यात एकच कमजोरी होती.ते तडजोड करीत नसत.त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या युपी,बिहारी विरोधातील मोहीम ही फक्त गरीब फेरीवाले टॅक्सीवाल्या पुरती होती.पण मोठमोठे बिल्डर,त्यांच्याकडे माणस पुरविणारे ठेकेदार,सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या ठेकेदारा विरोधात त्यांनी कधी आवाज नाही उचलला.युपी बिहारच्या उच्च वर्णीय वर्गीय लोकांना पायघड्या टाकणार आणि मागासवर्गीय कष्टकरी लोकांना मारहाण करणार या विरोधात विजय सातपुते यांनी “उत्तर भारतीय हटाव मुंबई बचाव” आंदोलन केले होते.त्यात शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते,काही नगरसेवकानी पाठिंबा दिला होता.पण जाहीर भूमिका घेऊ शकत नव्हते. ते व्यक्तिगत भाग घेण्यासाठी तयार होते.त्यांची मदत घेतली असती तर या आंदोलनाला तीव्र धार आली असती.आणि नेतृत्व त्यांच्या कडे गेले असते.हा सातपुतेनां धोका वाटत होता.यामुळेच हे आंदोलन थांबले.दलित ऐक्य हा विषय भी सातपुतेनी खुप चांगल्याप्रकारे प्रबोधन करून सोडविण्याचा प्रयत्न केला.सर्वच आंबेडकरी बाल्ले किल्यात असंघटीत कष्टकरी कामगार, मजुर मोठ्या प्रमाणात आहेत.त्यांची सामाजिक दृष्ट्या एकजूट झाल्यास त्यांनी आपल्या नगरातील विविध गटाच्या कार्यकर्त्या पैकी एकाचीच निवड करावी.ते ही सर्वाना विहारात किंवा मैदानात एकत्र बसवुन चर्चा करून कार्यकर्ता नेता निवडावा,त्याला असंघटीत कामगार मजूर कोण आहेत,त्यांचे कोणते प्रश्न आहेत,त्यांच्यासाठी कोणता कायदा आहे यावर चर्चा करावी,तरच त्यांना आपण बाबासाहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता,नेता मानावे,हा प्रयोग अनेक ठिकाणी यशस्वी झाला.दारू पिऊन शिवीगाळ करणे,त्या विरोधात पोलीस तक्रार करणे,यात अटक झालेल्या माणसाला सोडवून आणने ही ओळख असणाऱ्या कार्यकर्त्यांना सातपुते यांचे नेतृत्व खटकायला लागले.त्या कार्यकर्त्यांनी सातपुते कम्युनिस्ट आहे लाल बावट्यावाला आहे.असा प्रचार सुरू केला.पण विजय सातपुते हा साधा माणुस नव्हता.तो विद्रोही सत्यशोधक होता.

असंघटीत नाका कामगारांना केवळ कामगार,मजूर म्हणून संघटीत करणे अशक्य आहे, करिता त्यांना दुख मुक्तीचा मार्ग दाखविणाऱ्या तथागत बुद्धाचा धम्म सांगणे आवश्यक आहे. मग त्याकरिता विजय सातपुते यांनी बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती अभियान समितीची स्थापन केली आणि मुंबईतील सर्व बुद्ध विहार समिती,कमिटीच्या लोकांना भेटून बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे.यासाठी जनप्रबोधन करण्यास सुरवात केली.ख्रिचन समाजाचे चर्च ख्रीचनाच्या ताब्यात असते.मुस्लीम समाजचे मझीद मुस्लिमाच्या ताब्यात असते. शीख समाजाचे गुरुद्वारा शीख समाजाच्या ताब्यात असते.हिंदूचे सर्व मंदिर हिंदुच्या (ब्राम्हणांच्या) ताब्यात असतात.मग बुद्धाचे बुद्ध विहार महंताच्या ताब्यात का?.या अभियानात अनेक मान्यवर सहभागी झाले होते.बारावर्ष बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती अभियान चालले माननीय अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असतांना त्यांना पाच लाख सह्याचे निवेदन दिले त्यामुळेच पाच हिंदू ,पाच बौद्ध भिक्खू एक जिल्हा अधिकारी अध्यक्ष एकूण अकरा लोकांची कमिटी झाली त्यात भन्ते प्रज्ञावंत सेक्रेटरी झाले.याची माहिती बुद्धगया येथील भन्ते नी मुंबईच्या लोकांना दिली. बुद्धगया येथे सुशिक्षित लोकांच्या वार्षिक धम्म पर्यटन करण्यासाठी गेलेल्या लोकांना विचारले कुठून आला त्यांनी सांगितले मुंबई वरून भन्तेनी विचारले विजय सातपुते, सागर तायडे,चंद्रकांत गमरे,गौतम जाधव,अनंत तपासे यांना ओळखता?.ज्यांनी मुंबईतून बुद्ध गया महाबोधी महाविहार मुक्तीचे अभियान राबवून पंतप्रधान यांना पाच लाखाचे निवेदन दिले त्यामुळे पाच बौध्द भिक्खू या कमिटी वर आहेत.बुद्धगया फिरून आलेल्या अनेक लोकांनी मुंबईत आमची भेट घेतली.हा विजय सातपुते यांच्या वैचारिक संघर्षाचा इतिहास खूप लोकांना माहित नाही.त्यांच्या स्मुर्ती दिना निमित्य याची आठवण येते.विजय सातपुते खरे विद्रोही सत्यशोधक होते.त्यांनी कॉम्रेड शरद पाटील यांच्या विरोधात लिहण्यास मागे पुढे पहिले नाही.पूर्णवेळ कार्यकर्ता,नेता,साहित्यिक,संपादक,कामगार नेता बनण्यासाठी त्यांनी सेवा निवृत्ती स्वीकारली होती.पण शाररीक दुघर आजाराने त्यांना पछाडले बायपास होऊन दोन वर्ष जगतील असे डॉक्टरने सांगितल्यावर होते.पण कोकणातील माणगांव तालुका गोरेगांव आपल्या गांवी ते दहा वर्ष जगले.तरी ते घरात बसून अनेक विषयावर लिहत असत.त्यांच्या कविता म्हणजे शब्दांचे बॉम्ब गोळे असत,त्यांनी लिहलेली पुस्तके सुद्धा वैचारिक आव्हान देणारी होती.शरीरात अनेक आजार असतांना ही ते शेवट पर्यंत शांत बसून,झोपून राहिले नाही.सतत मित्र मंडळीशी चळवळी बदल वैचारिक चर्चा करीत असत.अशा या विद्रोही सत्यशोधक विजया सातपुते यांना २० जुलै स्मृती दिनानिम्मित विनम्र अभिवादन!.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप मुंबई)मो:-९९२०४०३८५९

महाराष्ट्र, मुंबई, लाइफस्टाइल, लेख, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED