बरे झाले, आझाद गेले !!

36

कांग्रेस मधून एक एक नेता उद्वेगाने सोडून जात आहे.मागे राहिलेल्यांना कोणताही खेद खंत नाही.उलट म्हणतात,”गुलाम नबी आझाद गेले,ते बरे झाले.खरं म्हणजे ते आधीच जायला पाहिजे होते.पण पक्षश्रेष्ठींची मेहरबानी.असे एक एक करून २०१४पासून कांग्रेस ची फळे फुले गळून पडत आहेत.भाजपच्या झोळीत पडत आहेत. किंवा महाराष्ट्र,बंगाल, आंध्र,तेलंगणा मधे सुगंध पसरवत आहेत. तरीही कांग्रेसच्या उर्वरित नेत्यांना काहीही सोयरसुतक नाही. म्हणे ,ही पाने,फळे,फुले जुनी झाली होती.आता बाजारात किंमत मिळाली नसती.निवडणुकित तर मुळीच नाही.

बस मधील किंवा रेल्वे मधील सहप्रवासी कधी काही कारणे असा सोडून गेला तरी आपण बराच वेळ हात हालवतो.हाय हैलो करीत असतो.नीट जा. सांभाळून. पोहचल्यावर फोन करा. कि मी करू? काही राहिले तर नाही?एकदा बघून घ्या.असू द्या.काही राहिले तर मी पोहचवतो.पण कांग्रेस मधून आझाद सारखे एक एक चांगली माणसे असे कांग्रेस सोडून जात आहेत.कोणत्याही नेत्याला खड्डा पडला नाही.उलट ,बरे झाले!आझाद गेले.

असे आजपर्यंत सोळा वरिष्ठ नेते सोडून गेले.सोडतांना त्यांना आनंद झाला नाही.डोळे पाणावले.कोपऱ्यात जाऊन पुसले.पण चेहरा सांगतो,हा माणूस दुखी आहे.हा माणूस खिन्न आहे.ही खिन्नता उर्वरित कांग्रेस नेत्यांमध्ये जाणवत नाही.मला संशय येतो.कांग्रेस च्या मालक मंडळींनी असा काही ठराव पारीत केला तर नाही,कि,आपली कंपनी,” कांग्रेस प्राइवेट पार्टी लिमीटेड” जाणिवपूर्वक लिक्वीडेशन मधे आणायची आहे. त्याच दिशेने कांग्रेस चे कार्य चालू आहे. जो मेला, गेला, रिटायर झाला, त्याचा विभाग बंद करायचा.नवीन भरती करायची नाही. कांग्रेस प्राइवेट पार्टी लिमीटेड ने असा निर्णय आणि कृती का सुरू केली असेल? याचा छडा लागत नाही.काही काळानंतर कांग्रेस मधे तीन संचालक असतील. सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहूल गांधी.

जळगाव जिल्ह्यातील कांग्रेस मधे शेवटचा नेता होता , प्रोफेसर व्हि जी पाटील. हा माणूस खूप चळवळी होता. पुर्ण वेळ काम करायचा. कोणाला झोपू देत नव्हता. म्हणून सर्व मिळून त्यालाच झोपवले.कायमचे.आणि सुटकेचा सुस्कारा टाकला.गेला,व्हि जी.बरे झाले. लवकर जायला पाहिजे होता.त्यानंतर जी गळती लागली ती थांबलीच नाही. जळगांव लोकसभा मतदारसंघात एकही नेता उरला नाही.जे आहेत ते फक्त , श्राद्ध ला आलेले पाहुणे आहेत.जळगाव शहरातील अध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरी.कांग्रेस चळवळीतील शेवटचा माणूस. कांग्रेसचे नेते फडकू देत नव्हते. म्हणून ते आप,भाजप ला घेऊन लढत असत.त्यांच्या विरोधात तक्रारी वरपर्यंत पोहचवल्या.म्हणे हा माणूस कोणालाही सोबत घेऊन आंदोलन करतो. जळगांव फर्स्ट काढून कांग्रेस ला मागे टाकले.जर चळवळ करायची इतकी उर्मी आहे तर कांग्रेस सोडून संघटना काढा.पण येथे कांग्रेस भवन मधे गर्दी नको. आम्हीच जेमतेम चहाचा खर्च कसातरी भागवतो. वीजबील साठी भाजप आमदार सुरेश भोळेंकडे मागितले तर ताबडतोब देतील.पण ते अजून तरी नको. आतापर्यंत शहर कांग्रेस ला सुरेश दादांनी पाणी पाजले.ती विहीर पण आटली.म्हणून येणाऱ्या जाणाऱ्यांची वाट चुकली.

मागील सात वर्षात एक अध्यक्ष बसवला. त्यांनी कांग्रेस प्राइवेट पार्टी लिमीटेड चे लिक्वीडेशन चे धोरण अंमलात आणले. पक्षश्रेष्ठींना हवे होते तितके जिल्हा कांग्रेसला अवसानायात आणले.आता ते असून नसल्यासारखे आहेत.कोणाची श्राद्ध असली तर आवर्जून येतात. नंतर धरणगाव चे डी जी पाटील,जेडीसीसीच्या वादळात रस्ता चुकले.इकडे जिल्हा काँग्रेस ने आनंद मनवला.बरे झाले,ते गेले. असेही फक्त बसून असत.आता उरले आहेत, दोन. एक रावेरला,दुसरे गोदावरी दवाखान्यात.जिल्हातील रावेर व्यतिरिक्त इतर मतदारसंघ मिळेल त्या भावाने विकून कैश केले.असेही नंतर विकण्याची स्थिती उरली नसती.राष्ट्रवादीने हिरावून घेतली असती.त्यापेक्षा दोन पैसे मिळवले तर काय बिघडले?म्हातारी गाय मरायच्या आधी कसाईला विकली तर चामडे तरी मिळते.त्याच दुरदृष्टीने एक एक विधानसभा मतदारसंघ मोडीत काढले.

रावेर विधानसभा आमदार शिरीष चौधरी व रावेर लोकसभा मतदारसंघाचे कायम उमेदवार किती काळ कांग्रेस मधे तग धरतील?असे प्रश्न कांग्रेस कार्यकर्ते एकमेकांना विचारत आहेत.इडी नोटीस ची झेरॉक्स प्रतवर किरीट सोमय्यांची सही किंवा अंगठा उमटवून जरी पाठवला तरी जळगाव जिल्हा काँग्रेसमुक्त होईल.संस्था व संसाधने इतकी संग्रही करुन ठेवली आहेत कि,आवरता येणार नाहीत,सावरता येणार नाहीत.जळगांव शहरातील कांग्रेस भवन वर पाटी दिसेल,” येथील दुकान नवीन जागेवर स्थलांतरित करण्यात आलेले आहे.”

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव