फडणवीस साहेब,भाषण नको,काम पाहिजे!

86

अजितदादा पवार जळगाव जिल्ह्यात आले. गफाळा मारून गेले. कामधाम शुन्य. सरकारी मानधन, गाडी, मोटर, फौजफाटा फजूल गेला.आता फडणवीस साहेब जळगाव जिल्ह्यात येत आहेत.का ? कोणालाही माहीत नाही. का?असे कसे?जर मंत्री येत असतील तर काहीतरी काम केले पाहिजे.जर गप किंवा गफाळा मारून जात असाल तर तशी करमणूक तर तमाशा,जलसावालेही करतात.मग,फरक काय तुमच्यात आणि त्यांच्यात? कोणाच्या वाढदिवसाला येत असाल तर स्वखर्चाने आले पाहिजे.कोणाची सदिच्छा भेट असेल तर स्वखर्चाने आले पाहिजे.आणि जर सरकारी खर्चाने येत असाल तर सरकारी काम झाले पाहिजे.तेच तर आम्ही सांगतो.

फडणवीस साहेब आता या नवीन सरकार मधे गृहमंत्री आहात.तर मग, किमान गृहखात्याची तरी कामे झाली पाहिजे.जळगांव जिल्ह्यात पोलिसांच्या कामातील कुचराई, दिरंगाई, अनियमितता या बद्दल गृहमंत्र्यांनी तक्रारी घेतल्या पाहिजे.आमनेसामने बसून आदेश दिले पाहिजे.असे नको कि, पोलिस अधिकाऱ्यांना गृहमंत्रीने लोकांसमोर आदेश दिला तर कमीपणा येईल.जर पब्लिक आणि पोलिस सोबत घेऊन कामाचे आदेश दिले तर लोकाभिमुख काम होईल.पारदर्शक काम होईल.गतीमान काम होईल.हीच तर अपेक्षा असते गृहमंत्री कडून.अपेक्षा का? तुम्ही निवडणुकीत प्रचाराला येता तेंव्हा हेच तर सांगतात, पब्लिकला.आम्हाला निवडून दिले, आम्हाला सत्ता दिली तर आम्ही लोकांची कामे करू.पारदर्शक काम करू.गतीमान काम करू.तिच तर अपेक्षा करतो आम्ही.तुम्ही शब्द विसरता म्हणून तर आठवण करून देत आहोत.

फडणवीस साहेब, जळगाव जिल्ह्यात आलात तर तुम्ही फक्त भाजपच्या भाऊगर्दीत नको.आता तुम्ही फक्त भाजप चे नाहीत.आता तुम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचे आहात.तर भाजप च्या टोळक्यात घुटमळत वेळ घालवू नका.प्रत्येक सामान्य माणसाची तक्रार तुम्ही घेतली पाहिजे.तरच तुमचा जळगाव दौरा सरकारी होईल.
फडणवीस साहेब,उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कोरोना निधीतून वैद्यकीय यंत्रसामुग्री न घेता निधीचा अपहार केलेला आहे.जळगांव जिल्हा विकास नियोजन समीतीत भाजपचे गिरीश महाजन, सुरेश भोळे ,उन्मेष पाटील, रक्षा खडसे,मंगेश चव्हाण हे सुद्धा सदस्य होते.आताही आहेत.यांना हा प्रकार , गैरव्यवहार आम्ही समजावून सांगितला.पण यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही.कोणतीही तक्रार केली नाही.कदाचित त्या अपहाराला यांची सम्मती असावी.म्हणून हे चूप बसले.हे साफ चुकीचे आहे.

जळगाव जिल्ह्यातील जागृत नागरिकांनी या अपहाराची अधिकृत माहिती घेऊन जळगाव जिल्हा पेठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे.आठ महिने झाले.एफआयआर सुद्धा नोंदवली नाही.म्हणून दोन नागरिकांनी जळगाव जिल्हा कोर्टात खटला दाखल केला.कोर्टाने गांभिर्याने दखल घेऊन पोलिसांना चौकशीचे आदेश दिले.चार महिने झाले.अजून एफआयआर किंवा आरोपपत्र दाखल केले नाही.कदाचित मागील व आताच्या सरकार मधील मंत्रीचा राजकीय, शासकीय दबाव पोलिसांवर असू शकतो.

फडणवीस साहेब,माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चुकीचे काम केले.म्हणून त्यांना चुकीच्या ठिकाणी जावे लागले.माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काम केले नाही म्हणून त्यांना आता कोणतेच काम उरले नाही.पण गुलाबराव पाटील यांनी चुकीचे काम करूनही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही मुख्यमंत्री त्यांचेवर मेहरबान आहेत.आता तुम्हीही तसेच चुकीचे काम करीत असाल, किंवा काम करीत नसाल किंवा चुकीचे काम करणाऱ्या मंत्रीवर मेहेरबान असाल तर आमचा तुमच्यावर आणि तुमच्या पक्षावर विश्वास राहाणार नाही.

फडणवीस साहेब आम्ही विनंती करतो कि, गृहमंत्री पदाच्या अधिकारातून जळगाव पोलिसांना आदेश द्यावेत कि,कोरोना काळातील अपहार बाबत ताबडतोब एफआयआर नोदवावी.तसेच आरोपपत्र कोर्टात सादर करावे.या आरोपाच्या चौकशीतून मंत्री गुलाबराव पाटील यांची निर्दोष मुक्तता होईपर्यंत मंत्री पद काढून घ्यावे.कोरोनाकाळातील निधीचा गैरवापर केल्याबद्दल सिव्हिल सर्जनची जळगाव हून हकालपट्टी केली.पण त्यासाठी निधी वितरीत करणारे जबाबदार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊन या सरकार ने चुकीचे काम केले आहे.अपहाराचे समर्थन केले आहे.जळगांव जिल्ह्यातील नागरिकांचा समज झाला आहे कि,महाआघाडी सरकारने नियोजनबद्ध अपहार केला आहे.आणि शिंदे फडणवीस सरकार अपहाराला संरक्षण देत आहे.

फडणवीस साहेब, शिवसेना, राष्ट्रवादी च्या नेत्यांनी अपहार केला म्हणून भाजपाच्या केंद्र सरकारने इडी च्या माध्यमातून कारवाई केली.दोन माजी मंत्री आणि एक खासदार जेलमध्ये आहेत.याबद्दल आम्ही प्रधानमंत्र्यांचे आभार मानतो.पण तुमच्याच मंत्रीमंडळातील मंत्री गुलाबराव पाटील यांचेवर प्रधानमंत्री आणि आपण मेहेरबान का? भाजपला समर्थन करणाऱ्यांना अपहाराची सवलत आहे काय?भाजप ला समर्थन देणाऱ्यांना इडी च्या कारवाई तून एक्झेम्शन दिले आहे काय? असाच जर दुजाभाव करीत असाल तर अन्यायकारक आहेच.आपला तो बाळ ! दुसऱ्याचे ते कार्ट ?

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच,जळगाव