पैशांसाठी हॅकर्स सगळा डेटा शोधून काढतात -मा. अजय जाधव

34

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि 27डिसेंबर):- फेसबुकवरून मैत्री करून फसवणूक करणाऱ्यांचा प्रचंड सुळसुळाट वाढला आहे. फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम व स्टेटसच्या माध्यमातून माणसे स्वतःची सर्व माहिती खुली करून देतात व गोपनीय माहितीचा हॅकर्स गैरफायदा घेतात. आपण सोशल मीडियावर फोटो प्रसारित करतो. त्यामुळे स्क्रीनशॉट, फोटो मार्फ करून तुमच्या फोटोचे एडिटिंग करणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे बदनामी होताना दिसते म्हणून सोशल मीडियावर फोटो प्रसारित करू नयेत असे विचार मा. श्री अजय जाधव सायबर गुन्हे तज्ञ, सातारा यांनी मौजे तासवडे येथे वेणूताई चव्हाण कॉलेज कराडच्या कनिष्ठ विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या वेळी ‘सायबर गुन्हे जनजागृती’ या विषयावर बोलताना मांडले.

ते पुढे म्हणाले की, आरोपी खोटी प्रोफाइल तयार करून दिशाभूल करतात. दिल्लीतील नोएडा भागात ऑनलाइन पैशांची फसवणूक करणाऱ्यांचे भरमसाठ अड्डे आहेत. कोणतीही बँक ग्राहकांना फोन करून माहिती विचारत नाहीत परंतु या क्षेत्रातील फसवणूक करणाऱ्या लोकांनी नवनवीन कल्पना शोधलेल्या आहेत. अशा लोकांपासून सावध रहा. देशातील बहुतांश ग्राहकांचे मोबाईल हॅक आहेत. कारण आपण बहुतांश ऍप्सना या संधी दिलेल्या आहेत. आणि याचाच हॅकर्स शोध घेत असतात. त्यातून भरपूर लोकांची फसवणूक झाल्याची उदाहरणं आहेत चोरीला गेलेले 50% मोबाईल तर अजिबातच सापडत नाहीत.

या कार्यक्रमप्रसंगी सन्माननीय अध्यक्ष श्री अमित जाधव, सिनेट सदस्य शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, यांनी आपल्या मनोगतात ‘सायबर गुन्हे हे आज प्रचंड वाढू लागले आहेत तरी विद्यार्थ्यांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी न पडता सुरक्षितता, सतर्कता आणि सावधगिरी बाळगूनच विविध प्रकारच्या ॲप्सना आपल्या मोबाईल मध्ये स्थान द्यावे अन्यथा तुमची ही दिशाभूल ही अटळ आहे. कारण आज वेगळ्या प्रकारची माध्यमे आपल्याला मोहात टाकण्यासाठी प्रयत्न करीत असतात. त्यामुळे आपले अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे. असे सांगितले.

या कार्यक्रम प्रसंगी तासवडे गावचे सरपंच भारती शिंदे, उपसरपंच सुभाष जाधव ,सदस्य भीमराव खरात, अश्विनी जाधव, मनीषा जाधव व विकास जाधव, भिकाजी जाधव रमेश जाधव ,भगवान शिंदे ,लक्ष्मण जाधव व इतर ग्रामस्थ व स्वयंसेवक तसेच प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु अल्मास पटेल हिने केले. प्रमुख पाहुण्याचा परिचय प्रतीक्षा जाधव हिने केले.