चार घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव….

32

“चार घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव….” याप्रमाणे खरोखर आपले जीवन हे अत्यंत कमी कालावधीची असते. पाहता पाहता आयुष्याचे दिवस सरुन जातात. आजाणतेपणा मध्ये बालपण संपते…… स्वप्नाप्रमाणे तरुणपण संपून जाते….. विविध गोष्टींच्या भुरळीमधून बाहेर पडल्यानंतर…. लख्ख आणि स्वच्छ प्रकाशाप्रमाणे प्रौढत्व आयुष्यात येते. याच काळात जर आपण समजून, उमजून राग, लोभ, द्वेष, मत्सर आणि अहंकार यासारखे सर्व विकार सोडून जमेल तेवढे निरागसपणे वागायला शिकले पाहिजे. हे करता आले नाही की, प्रौढत्व सुद्धा एका वेगळ्याच धुंदीत आणि आपल्याच विश्वात निघून जाते. मग अनेक प्रश्न आणि पश्चाताप घेऊन वार्धक्य येते…. हेच वार्धक्य मरेपर्यंत आपल्याला विचारत राहते….. वेड्या एवढे सुंदर आयुष्य मिळाले असताना. निरागस, चांगले का वागला नाहीस…. हे का नाही केलेस….? ते का नाही केलेस…? तुझ्या ऐन उमेदीच्या काळात दुसऱ्यांना का समजून घेतले नाहीस…? त्यांच्या इच्छा-आकांक्षा, स्वप्न का समजुन घेतले नाहीस…? आयुष्यात किती माणसे जोडलीस…? कोणा-कोणाच्या भावना आणि इच्छा,आकांक्षा समजून घेतल्यास….? कोणाच्या स्वप्नाला बळ दिले….? कोणा कोणाचा आधार झालास….? आणि ज्यावेळी स्वतः आपण आपल्या आयुष्याचा हिशोब मांडतो….. त्यावेळी फसवणार तरी कसे आणि कुणाला…? मग उरतो तो पश्‍चाताप….. बऱ्याच गोष्टी सहज करता आल्या असत्या…. पण केल्या नाहीत…. का केल्या नाहीत….? याचे उत्तर मिळतच नाही…. मग आयुष्यातील असेच काही प्रश्न कायम अनुत्तरीत राहतात….

प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रौढत्वाचा काळ महत्वाचा असतो. हाच काळ स्थिरस्थावरतेचा आणि उत्कर्षाचा असतो. साध्य करता येतील तेवढी सगळी स्वप्न आपण साकारलेली असतात. आपल्या आपल्या परीने आपण कर्तृत्व सिद्ध केलेले असते.आपल्याला अपेक्षित असणारी आयुष्यातील उंची आपण आपल्या परीने साधलेली असते. याचा अर्थ इथे सर्व थांबते असा नाही. एका बाजूला आपले शिक्षण, कर्तृत्व, प्रतिभेची भरारी, उत्कर्षाचा शिरोबिंदू साधने चालूच असते. अजूनही आपली स्वप्ने असतात. ती साकार करण्याची धडपड असते. हे सर्व आपल्या देहाचा शेवटचा श्वास चालू असेपर्यंत चालणारच आहे. परंतु प्रौढत्वाचा काळ हा संपूर्ण अर्थाने गुंतवणुकीचा काळ असतो. याच काळात खर्‍या अर्थाने सर्व बाजूनी गुंतवणूक करायची असते. म्हणजेच जीवन जगण्यासाठी लागणारा धनसंचय आणि आर्थिक गुंतवणूक तर करायचीच असते. याच बरोबर चांगुलपणा, निरागसपणा जपायचा असतो. तारुण्याच्या धुंदीत कळत – नकळत घडून गेलेल्या चुका सुधारायच्या असतात. कोणत्याही कारणामुळे अथवा समज-गैरसमजामुळे गमावलेल्या माणसांना पुन्हा मिळवायची असते. लेकरं मोठी करायची असतात…. त्यांचे संगोपन करायचे असते…..

गगनभरारीची ताकद त्यांच्या पंखात भरायची असते…. आता त्यांना स्वप्न बघायला शिकवायचे असते…. त्यांचीच स्वप्ने समजून घ्यायची असतात… आता त्यांच्या स्वप्नांना आपले समजायचे असते…. आणि आता त्यांची स्वप्न साकार करण्यासाठी जगायचे असते.

स्वप्न कुणाचीही असोत…. अगदी आपल्या मुलांची सुद्धा..‌. ज्यावेळी दुसऱ्याच्या स्वप्नाला आपण आपले समजतो… त्यांच्या स्वप्न साकार करण्याच्या तळमळीच्या प्रयत्नात जेव्हा आपण सहभागी होतो..‌‌..‌ त्यावेळी त्या व्यक्तीला वाटणारा आनंद आणि आधार शब्दात व्यक्त करता येत नाही. आयुष्यभर जी माणसे स्वतःसाठी जगतात. स्वतःचेच आयुष्य घडवतात. स्वतःला उत्तुंग यशाच्या शिखरापर्यंत नेतात. आपल्या प्रचंड कष्टाच्या आणि मेहनतीच्या बळावर उज्वल आणि अफाट कर्तृत्व साध्य करतात. अशी सगळी माणसे खूप कर्तृत्ववान असतात. त्यांचा ऐन उमेदीचा आणि कर्तुत्वाचा काळ आनंदात जातो. पण वार्धक्यात मात्र त्यांना प्रश्न पडतात… तुम्ही इतरांसाठी काय केलात…? वार्धक्यात माणसाचे स्वतःचे मन सुद्धा स्वतःला विचारत राहते..‌… आयुष्यात दुसऱ्यासाठी किती जगलास…..? त्यावेळी आपल्याकडे उत्तर नसते आणि आपल्याला समजून घेणारी आणि आधार देणारी माणसे सुद्धा नसतात…… आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणजेच आपल्या वृद्धापकाळात आपल्या उषा-पायथ्याला जिवाभावाची आणि आपल्यावर निस्सीम प्रेम करणारी माणसे असावीत….. अशी जर आपली अपेक्षा असेल….. तर आपण आपल्या उमेदीच्या काळात संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला समजून घेणे…. त्यांच्या भाव-भावना, आशा, अपेक्षा आकांक्षा आणि त्यांची स्वप्ने यांचा सार्थ आदर करणे…. त्यांना जमेल तेवढी मदत करणे…. आवश्यक असते….

आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात ज्यावेळी आपण आपल्या स्वतःचा जीवनपट मागे वळून पाहतो…. आपल्या संपूर्ण आयुष्याचा हिशोब मांडतो…. त्यावेळी कुठल्याच कारणाने आपल्याला पश्चाताप वाटायला नको… असे वाटत असेल तर आत्ता खऱ्या अर्थाने जागे होण्याची वेळ आहे… जे जे कळत-नकळत चुकले आहे ते बरोबर करण्याची वेळ आहे…. प्रत्येकाच्या जीवनाला अनेक पैलू असतात…. त्या सर्व पैलूंचा विचार झालेला नसतो… कळत-नकळत काही गोष्टी दुर्लक्षित केलेली असतात… त्या सर्व दुर्लक्षित केलेल्या बाबींना पुन्हा महत्व द्यायचे असते…. जीवनात अनावधानाने आपल्याकडून ज्यांच्यावर अन्याय झाला आहे… त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा असतो…

म्हणून आपला उमेदीचा काळ हा सर्वार्थाने गुंतवणुकीचा काळ म्हणून वापरायचा असतो. याच काळात तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र, स्वावलंबी असता म्हणून या काळात माणसे जोडायची असतात, जपायची असतात. माणुसकीचे आणि मानवतेचे सुंदर नाते तयार करायचे असते. आपल्या कुटुंबातील माणसांची… आपल्या नातेवाईकांची… आपल्या आप्तस्वकीयांची…. आपल्या मित्र-मैत्रिणीची…. सबंध मानव जातीची काळजी घ्यायची असते. त्यांना समजून घ्यायचे असते. आतापर्यंतचा आपला संपूर्ण काळ दुसऱ्याला समजावून सांगण्यात आणि स्वतःला सिद्ध करण्यात गेलेला असतो…. आता आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची गरज नसते…. आता तुम्हाला कुणालाही स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नसते…. तुम्ही कसे आहात ….? हे समजावून सांगण्याचीसुद्धा आवश्यकता नसते. आत्तापर्यंत प्रत्येकाने तुमच्या बद्दलचा आडाखा घेतलेला असतो. जगाने तुम्हाला ओळखलेले असते… प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने अंदाज बांधलेला असतो. कोणाच्या दृष्टीने तुम्ही चांगले तर कोणाच्या दृष्टीने वाईट असता. या कुठल्याच गोष्टीचा तुमच्यावर फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या हिमतीवर आणि सामर्थ्यावर स्वतःचा प्रपंच पेलत असता. म्हणून आयुष्याच्या या वळणावर आता या कशानेच कोणताच फरक पडत नाही. तुमच्याबद्दलचे इतरांच्या मनात असलेले पूर्वग्रह तुम्हाला चांगले, वाईट ठरवू शकत नाहीत.

आताच्या घडीला तुमचे प्रत्यक्ष वागणे फार महत्त्वाचे असते…. तुम्ही करत असलेली कर्तव्ये महत्त्वाची असतात….. पार पाडत असणाऱ्या जबाबदाऱ्यांना योग्य न्याय देणे महत्त्वाचे असते….आता आपण फक्त मोकळेपणाने आणि संपूर्णपणे माणुसकी जपत जमेल तेवढ्या निरागसतेने जगायचे असते. आता लोकांची आपल्याबद्दल काय मते आहेत… याचा फारसा विचार करण्याची गरज नसते… याउलट आपण लोकांबद्दल माया, ममता, आपुलकी, प्रेम जिव्हाळा ठेवायचा असतो. आता कोणी मदत करावी अशी अपेक्षा उरलेली नसते…. याउलट आपल्याला इतरांना मदत करता येईल का…? याची धडपड करायची असते…

आयुष्याच्या अशा वळणावर सध्या आपण आलेलो असतो. ज्या वळणावर आपली अजूनही स्वप्ने चिरंजीव असतात. पण स्वप्नरंजन मात्र संपलेले असते. आशा, अपेक्षा, आकांक्षा जिवंत असतात पण त्यांना कल्पनेची पालवी फुटत नाही. भाव-भावना, संवेदना आणि जाणिवा जाग्या असतात, पण त्यातला अल्लडपणा आणि निरागस भाव संपलेले असते… आता सगळ्याच बाबतीत खऱ्या अर्थाने प्रगल्भता आलेली असते…

आता पूर्णपणे आपण आपल्या विश्वात हरवून जाऊ शकत नाही. मुळात आपल्या स्वतःचे एकटे विश्व राहिलेले नसते. आतापर्यंत आपल्या विश्वात अनेक माणसे सहभागी झालेली असतात. त्यांच्यासाठीचे जगणे सुरू झालेले असते. अशा प्रकारचे जगणे हा आता आपल्या सवयीचा भाग झालेला असतो. सतत चांगले वागून चांगुलपणाची सहजप्रवृत्ती वृत्तीत तयार झालेली असते. अनेक टचके-टोमणे खाल्ल्यानंतर….. खूप मोठ्या संघर्षानंतर….. खूप चांगले वाईट दिवस पाहिल्यानंतर…. आणि सुख, दुःखाचे अनेक प्रसंग अनुभवल्यानंतर आलेले हे शहाणपण असते…. आणि या शहाणपणालाच आता निरागसपणाची, अल्लडपणाची जोड द्यायची असते….. बघा जमेल का तुम्हाला…. ? जमल्यास खूप चांगले होईल…. जगाबरोबर तुम्हीसुद्धा सुंदर बनून जाल…

हे जीवन ही एक मैफिल आहे.
दोस्तहो, यारहो, मित्रहो आयुष्यात
नवनवीन बरेच काही शिकता आहात
पण खर्‍या अर्थाने निरागस जगायला
कधी शिकणार आहात…..

✒️श्री. मयूर मधुकरराव जोशीविठ्ठल-रुक्मिणी नगर,जिंतूर(मो:-767733560(WhatsApp)7972344128 (calling)