विदर्भातील दलित चळवळीचे अभ्यासक- डॉ. बि. आर. मस्के

38

संपूर्ण विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रात डॉ. बि. आर. मस्के सरांना दलित चळवळीचे अभ्यासक, संशोधक म्हणून ओळखले जाते. त्यांनी विदर्भातील दलित चळवळीचे सामाजिक,राजकीय आर्थिक, सांस्कृतिक मूल्यांचे अनंत प्रवाह आपल्या लेखनीतून जीवंत केलेले आहे. संशोधन करित असताना संदर्भ साधने तपासून घडलेल्या घटनांची वास्तववादी मांडणी केली आहे. सबाल्टर्न इतिहास मांडणे ही त्यांची शैली आहे. त्याच शैलीचा प्रभाव अनेकाच्या संशोधनावर दिसतो. डॉ. बि.आर. मस्के यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील मसला ता. गंगाखेड येथे झाला. महाविद्यालयीन जीवनात गरिबीचे घाव सोसून शिक्षण पुर्ण केले. महाराष्ट्रात १९९५ मधे इतिहास विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण करणारे त्या काळातील एकमेव विद्यार्थी होते. ही भूषणावह बाब होती.1995 ते 1997 या काळात ज्ञानोपासक महाविदयालय परभणी येथे इतिहास विषयाचे ज्ञानार्जन केले. पुढे शासकीच महाविद्यालय प्राध्यापक पदाची महाराष्ट्र राज्य सेवा परिक्षा उच्च गुणानी पास होऊन अमरावती येथील प्रसिध्द विदर्भ महाविद्यालय येथे इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तो काळ संक्रमणाचा होता. 1997 ते २०१९ या 22 वर्षाच्या काळात अनेक विधार्थ्याना घडविले. अनेकाना आर्थिक मदत केली.

वर्गात विद्यार्थ्याना आपला विषय समजला पाहिजे, त्यांना ज्ञान मिळाले पाहिजे म्हणून इतिहास विषय सोपा करून शिकावित. विषयातील कोणतीही अडचण सोडविण्यासाठी ते नेहमी तत्पर असत.असा त्यांचे अनेक विद्यार्थी प्राध्यापक आहेत. काही उच्च पदावर विराजमान आहेत. त्यांनी विदर्भातील उपेक्षित चळवळीतील कार्यकर्त्याना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विदर्भातील दलित चळवळीचा इतिहास हे ४०० पृष्ठांचा ग्रंथ प्रकाशित करून लिखानाच्या माध्यमातून दलित चळवळीला गतिमान केले. त्यांच्या मार्गदर्शनात 10 संशोधकानी आपली पीएच.डी प्राप्त केली. तसेच ०५ संशोधक सध्या संशोधन करित आहे. समाजातील अनेक उपेक्षित वंचित समाजातील संशोधकाना प्रेरणा दिली. ज्या विषयावर आतापर्यंत संशोधन झाले नाही असे विषय संशोधनासाठी निवडले. त्यांना न्याय दिला. समाजाला त्या संशोधनाचा फायदा झाला. १९९९ते २००५ पर्यंत अमरावती, नागपूर विदर्भ इतिहास परिषदेचे मुख्य सचिव होते.

सोबतच 04 अंकाचे प्रकाशन केले आहे. याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करीयर कौन्सिंग, स्वच्छता अभियान, व्यक्तिमत्त्व विकास कार्यकृम राबविले त्यांचे अनेक विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धत चमकले. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन केले. व्याख्यानासाठी संपूर्ण विदर्भ पालथा घातला. विर्दभातील दलित चळवळीचा प्रसार प्रचार करण्याचा प्रयत्न केला. उत्तम वक्ते म्हणून सर्वांना परिचीत आहे. त्याना आतापर्यंत त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल म्हणून विद्याभूषण पुरस्कार विद्यारत्न पुरस्कार त्यांच्या संशोधन कार्यास महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट संशोधन पुरस्कार मिळालेला आहे. २०१९ पासुन वसतंराव नाईक शासकीय महाविद्यालय नागपूर येथे इतिहास विभाग प्रमुख म्हणून सध्या कार्यरत आहेत. आजही जनसामान्याच्या जीवन संघर्षाच्या नोंदी घेऊन इतिहास लेखन पद्धतीला नवीन आयाम देण्यासाठी त्यांची अहोरात्र धडपड असते. त्यांची जन्मभूमी मराठवाडा असली तरीही कर्मभूमी विदर्भ आहे. त्यांच्या मूळ मसला गावातील सामाजिक, सांस्कृतिक पाया त्यांनी भरभक्कम केला.

गावांतील परिस्थितीने हताश झालेल्या अनेक मुलांना शिक्षणासाठी सढळपणे मदत केली. परिसरात सामाजिक सलोखा राखण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. आंबेडकरी चळवळीला सतत गतिमान कसे करता येईल त्यांचा चितंनाचा विषय आहे. गटा-तटातील रिपब्लिकन पक्षाविषयी त्यांना चिंता आहे. आंबेडकरी नवयुवकांनी व्यापार , उदयोग जगतात नाव कमावले पाहिजे. सतत वाचन केले पाहिजे .बौद्ध संस्कृतिचा अभ्यास करून प्रत्यक्ष आचरणात आणली पाहिजे. असे ठामपणे सांगतात. सतत आंबेडकरी चळवळीचा ध्यास असणारे व्यक्तीमत्व वयाचे ५५ वर्ष पूर्ण करित आहे. त्यांच्या विचारातून, लिखानातून आंबेडकरी इतिहासांचे उत्कृष्ट लेखन भविष्यात घडो. इतिहास लेखन, संशोधनाची दिशा दिपस्तंभाप्रमाणे निश्चित प्रेरणादायी असेल असा ठाम विश्वास आहे.

✒️प्रा प्रफुल राजुरवाडे(इतिहास विभाग प्रमुख)रा. तु महा. चिमूर जि चंद्रपूर मो:-9689952873