भ्रष्टाचार व कामचुकारपणा कुठे नाही?

32

सध्या भ्रष्टाचार हाच शिष्टाचार होऊन बसला आहे. भ्रष्टाचाराची जाळे-मुळे समाजामध्ये खोलवर रुजली आहेत. भ्रष्टाचाराला शिष्टाचाराचे स्वरूप येऊन जनतेची प्रचंड लूट होत आहे. जनतेला प्रत्येक कामासाठी आर्थिक व मानसिक त्रास सहन करून अतिरिक्त वेळ खर्च करावा लागत आहे. सध्या खाते/विभाग कोणताही असो, त्यामध्ये भ्रष्टाचार व कामचुकारपणा दिसून येतो. यामध्ये एखादे खाते किंवा विभाग कामचुकारपणा किंवा भ्रष्टाचार करत नसेल असे म्हणणे म्हणजेच भ्रष्टाचाराला शिष्टाचार समजणे होय. ज्या ज्या ठिकाणी लोकांचे कामे होत असतात, मग ते ग्रामपंचायत, तलाठी ग्रामसेवकांपासून तर संसदेपर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विभागांमध्ये भ्रष्टाचार व कामसुकारपणाचे स्त्रोत माजले आहे. काही अपवादात्मक अधिकारी व कर्मचारी वगळता त्या विभागात मात्र भ्रष्टाचार होतो किंवा कामचुकारपणा होतोच. कामचुकारपणा म्हणजे वेळेवर न येणे, वेळ अगोदर घरी जाणे, सर्वसामान्य लोकांची कामे वेळेवर न करता विनाकारण त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देऊन एकाच कामासाठी वारंवार बोलावणे, यालाही काम चुकारपणा असे म्हणतात.

भ्रष्टाचाराचा जर विचार केला तर भ्रष्टाचार म्हणजे केवळ पैशाची देवाण-घेवाण नव्हे, तर आपले आचरण भ्रष्ट करून, करून दिलेले काम म्हणजे भ्रष्टाचार. बरेच ठिकाणी बरीचशी कामे पैसा दिल्याशिवाय होत नाहीत. अनेक सरकारी कार्यालयामध्ये शासकीय फि वगळता काम करण्याच्या, त्यालाच आपण लाचेच्या रकमा म्हणू शकतो, त्याही फिक्स करून दिलेले असतात. वेगवेगळे दाखले, प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लोकांना पैसे मोजावे लागतात. एवढेच काय तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी केल्या जाणाऱ्या पंचनाम्या साठी सुद्धा अनेक ठिकाणी पैसे घेतले जातात. वेगवेगळ्या नोंदी, फेरफार किंवा काही गोष्टी एका नावावरून दुसऱ्या नावावर उतरवण्यासाठी, सर्व काही कायदेशीर असतानाही त्यांच्याकडून पैसा वसूल केला जातो. थोडक्यात काय तर भ्रष्टाचार हा एवढा फोफावलेला आहे की त्याला शिष्टाचार समजून लोक जगत आहेत.

एखादे काम करायचे असेल तर पाच पन्नास रुपये द्यावेच लागतात, असे सहज बोलणारे लोक आणि लोकांची मानसिकता आज आपल्याला दिसून येते. एखाद्या जागृत व सुशिक्षित व्यक्तीने विना लाचेचे काम करून घ्यायचे झाल्यास त्या व्यक्तीला आर्थिक, मानसिक त्रास देऊन, वेळ खर्च करून घेतला जातो. एखाद्या व्यक्तीचे नाव राशन कार्ड मध्ये समाविष्ट जरी करायचे तरीही संबंधित व्यक्तीला पैसे दिल्याशिवाय ते नाव राशन कार्ड वरती येत नाही. याचा जर विचार केला तर देशामध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असेल हे दिसून येते. भ्रष्टाचाराला किंवा लाचलुचपतला लोकांकडून पाहिजे तसा विरोध होत नाही, याचाच अर्थ या गोष्टी लोकांच्या वळणी पडून लोक त्याला शिष्टाचार समजायला लागलीत, हेच सिद्ध होते. आपण वेगवेगळ्या विभागातील कामकाज बघितले तर अनेक विभागांमध्ये कर्मचारी अधिकारी वेळेवर येत नाहीत. वेळे अगोदर घरी जातात. अनेक विभागांमध्ये ओळखी बघून लवकर कामे केली जातात. काही विभागांमध्ये काम करण्यासाठी हेतू पुरस्कार दिरंगाई केली जाते. काही कामांमध्ये हेतू पुरस्कार सर्वसामान्य लोकांना वारंवार बोलावले जाते. हे सर्व प्रकार भ्रष्टाचार व कामचुकारपणात मोडतात. कामाचा मोबदला म्हणून पगार मिळतो, सर्वसामान्य लोकांची कामे वेळेवर व कोणत्याही प्रकारचा त्रास न होता व्हायला पाहिजेत.

कारण कोणतीही यंत्रणा, कितीही मोठी असली तरीही ती यंत्रणा लोकांपेक्षा मोठी नाही, ती यंत्रणा केवळ लोकांची सेवा करण्यासाठीच आहे हीच बाब सर्वसामान्य लोक विसरून गेले. व जे सेवेकरी आहेत ते सेवा न करता सेवेच्या नावाखाली मेवा खान्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे ज्याने जीवन विस्कळीत तर झालेच, परंतु कोणत्याही शासकीय कामकाजावर लोकांचा विश्वास राहिला नाही. कोणतेही काम करताना पैसा ओळख या गोष्टी असतील तरच सरकारी काम होते अशी धारणा लोकांच्या मनामध्ये आजही आहे. भारत हा धार्मिक व संस्कारी देश आहे. धर्माला येथे अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. आपन ढोबळ मानाने जर विचार केला तर, कोणताही धर्म भ्रष्टाचार, चुकारपणा व सर्व सामान्य व्यक्तीला विनाकारण त्रास देण्याची शिकवण देत नाही. उलट असे करणे धर्माच्या दृष्टीने वाईट मानले जाते. वेगवेगळ्या पूजाअर्चा वेगवेगळे विधी केले जातात. वेगवेगळे उपास- तापास वेगळे क्रिया कर्म करून आम्ही धर्माचे आहोत हे दाखवून दिले जाते. मग भ्रष्टाचार कामचुकारपणा या गोष्टी करताना मात्र माणूस नितीमत्तेचाही विचार करत नाही, आणि धर्माचा ही विचार करत नाही. धर्माला बेईमान होऊन धर्माच्या शिकवणुकीच्या विरुद्ध वागून, भ्रष्टाचार आणि कामचुकारपणा करण्यात येतो. याचाच अर्थ लोकांना धर्माचे ही काही घेणेदेणे नाही. धर्माच्या नावाचा वापर केवळ सोयीनुसार करून स्वतःचे संरक्षण केले जाते. यापेक्षा धर्माचा कोणताही आधार लोक घेत नाहीत हेच दिसून येते.

जर शासकीय कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडले तर तो व्यक्ती कोणत्याही धर्माचा असो त्या धर्माचा सन्मान झाल्याशिवाय राहत नाही. हीच ताकद, हीच शिकवण भारतीय संविधानाने दिलेली आहे. देशातील कोणत्याही नागरिकांनी कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी, राजकीय नेत्यांनी जो कोणी जबाबदार व्यक्ती आहे त्यांनी जर आपली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडली तर धर्माचा तर सन्मान होईलच, परंतु सर्वसामान्य लोकांचा वेळ, पैसा व मानसिक त्रास या गोष्टी टाळून, लोकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होईल. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षाचा काळ उलटून गेला. तरीही देशातील नागरिकांच्या समस्या थोड्याही कमी झाल्या नाही उलट वाढत गेल्या. परंतु जे लोक जनतेचे सेवक होते आणि आहेत त्यांच्याकडे बघितले तर त्यांच्याकडे बर भक्कम संपत्ती, व भौतिक वस्तू मुबलक प्रमाणात आहेत. एकीकडे लोकांना कसण्यासाठी, उपजीविकेसाठी जमिनी मिळत नाही. दुसरीकडे दहा -दहा एकर मध्ये लोकांचे फार्म हाऊस तयार झाले. थोडा जरी विचार केला तर जो व्यक्ती दहा एकर जमीन फक्त ऐश्वोरामासाठी वापरतो, त्या व्यक्तीची संपत्ती नेमकी असेल तरी किती? आणि त्याचे उत्पन्नाचे साधन असतील तरी कोणते? कारण मेहनत आणि पगार याचा विचार केला तर एवढी संपत्ती कमावणे शक्य नाही.

तरीही त्यांच्याकडे वेगवेगळ्या मार्गातून भ्रष्टाचार करून ते संपत्ती त्या ठिकाणी येत असते. अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार हा हजारात असतो, परंतु नोकरीवर लागल्यानंतर त्यांचे घर व गाडी एकत्रपणे रकमेचा विचार केला तर करोडो मध्ये जाते. मग साधा प्रश्न येतो नोकरीला लागण्याच्या अगोदर दुचाकी वर फिरणाऱ्या व्यक्ती नोकरीवर लागल्यावर महागडे घर व महागडी गाडी घेतो. खरचं पगाराच्या जोरावर होऊ शकते का? वीस वीस एकर जमीनीवाल्या शेतकऱ्यांकडे जशी गाडी नसते, तशी गाडी चतुर्थश्रेणीत काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांकडे आहेत. थोडक्यात काय तर कामचुकारपणा करून आणि भ्रष्टाचार करून एवढा पैसा कमावलेला असतो. म्हणून लोक त्याला शिष्टाचार समजून भ्रष्टाचाराचे समर्थन करत आहेत. परंतु याचाच परिणाम सरकारी कामकाजा वरील विश्वास कमी होत आहे. श्रीमंत व गरीब ही दरी वाढत आहे. राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा विचार केला तर तो भ्रष्टाचार कल्पनाशक्तीच्या पलीकडचा आहे. आणि म्हणून देशाला सर्व गुण संपन्न करताना, देशाच्या विकासातील सर्व मोठी अडचण जर कोणती असेल, तर ती आहे भ्रष्टाचार. आणि आपण डोळस वृत्तीने जर बघितले तर काही कर्मचारी काही अधिकारी आपल्याला प्रामाणिक व कर्तव्याची जाण असलेले दिसुन येतील, परंतु एकही विभाग किंवा खाते असे दिसणार नाही की ज्या ठिकाणी लाचलुचपत, भ्रष्टाचार व कामचुकारपणा न करता सर्वसामान्य लोकांचे काम सहज व वेळेवर होतील. म्हणून भ्रष्टाचार कामचुकारपणा या गोष्टी सर्वसामान्य लोकांनी समजून घेऊन कोणत्याही कर्मचारी, अधिकाऱ्यांना, कोणताही अतिरिक्त पैसा न देता आपली कामे वेळेवर व योग्य पद्धतीने करून घेण्याचा आग्रह करावा.

शासकीय कार्यालयांमध्ये जेवढी शासकीय फी आहे तेवढेच पैसे भरून त्याची योग्य ती पोचपावती घेऊन, आपले काम करण्याचा आग्रह करून समाजामध्ये सुद्धा जनजागृती करावी. जेणेकरून भ्रष्टाचार व कामसुकारपणाला आळा बसून लोकांची कामे सोयीस्कर होतील. आणि सरकारी कामावरील विश्वास हा मजबूत होईल. सरकारी कार्यालयाची अवस्था बघितली तर, स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह घाण दिसून येतात. मग शासनाकडून आलेला पैसा हा नेमका खर्च तरी कुठे होतो हे सुद्धा बघणे गरजेचे आहे. भ्रष्टाचार हा खूप मोठा गहण विषय आहे. तरीही ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असे वाटते की हे नियमबाह्य आहे त्या ठिकाणी आपण आवाज उठवून भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा प्रयत्न करून, जनजागृती करू शकतो. भारतीय समाज हा मेंढरा सारखा आहे. जोपर्यंत कोणी हिम्मत करणार नाही तोपर्यंत बाकीचे लोक शांतच बसून भ्रष्टाचाराचे समर्थन करतील. म्हणून जागृत नागरिकांनी या विरोधात आवाज उठववा, लोकांची कामे भ्रष्टाचार करताना मुक्त व्हावी यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

✒️विनोद पंजाबराव सदावर्ते(समाज एकता अभियान,रा. आरेगांव ता मेहकर)मो:-९१३०९७९३००