मूल पंचायत समिती तिथे मंदावली कामाची गती–काम करायला जाणूनबुजून होणारी दिरंगाई शंकेच्या भोवऱ्यात

30

🔹प्राथमिक शिक्षकांचे कोणतेही कार्यालयीन काम वेळेत पार पडत नसल्याने अनेक शिक्षक संघटनेकडे तक्रार घेऊन येतात . पाठपुरावा करताना कार्यालयातील मनस्ताप देणारे प्रसंग म्हणजे एक महाकथा बनेल . शिक्षकांना होणारा मनःस्ताप संघटना कदापि सहन करणार नाही . त्यासाठी आंदोलनात्मक संविधानिक मार्गाचा पर्याय निवडावा लागेल .
– लक्ष्मण खोब्रागडे(जिल्हासदस्य,म.रा.पू. शि. संघटना)
—————————————-

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.18मे):- मूल पंचायत समिती अंतर्गत अधिकृत कामांना जाणूनबुजून होणारा विलंब चर्चेचा विषय असून ,त्यामुळे अनेक शिक्षक त्रस्त असल्याचे एक उदाहरण नुकतेच समोर आले आहे . याबाबत माहिती देताना महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हासदस्य लक्ष्मण खोब्रागडे यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त करीत संविधानिक आंदोलनात्मक लढा उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे .

नुकतेच एका शिक्षकांचे जी. पी.एफ. प्रकरण जिल्हा परिषदेतून ९मे २०२३ ला मंजूर होऊन तसे पत्र पंचायत समिती मूलच्या इमेल वर तसेच आवक-जावक विभागात आले . पूर्वीप्रमाणे ऑफलाइन धनादेश न देता ऑनलाइन पद्धतीने सरळ शिक्षकांच्या खात्यात रक्कम वळती करायची आहे .

त्यासाठी लक्ष्मण खोब्रागडे व सदर शिक्षक गेल्या तीन चार दिवसांपासून कार्यालयात संबंधित कर्मचाऱ्याशी सौजन्यपूर्वक चर्चा करीत प्रकरण निकाली काढण्याची विनंती केली . आवश्यक कागदपत्रे सादर केली . पण संबंधित कर्मचाऱ्याच्या संदिग्ध प्रतिक्रियेने त्यांच्या निरुत्साही व दिरंगाई करणाऱ्या मनोवृत्तीचे दर्शन झाले . यावर तीव्र संताप व्यक्त करताना पुरोगामी संघटनेचे लक्ष्मण खोब्रागडे यांनी प्रकरण दोन दिवसात निकाली न निघाल्यास संघटनात्मक आंदोलन करण्याचा पवित्रा घेतल्याचे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे .