लोककल्याणकारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज -प्रा. डॉ. रघुनाथ केंगार

29

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.27जून):- “शाहू महाराजांनी आपल्या राज्यात शिक्षणाची निकड लक्षात घेऊन गोरगरीब कुटुंबातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी वसतीगृहांची उभारणी केली. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे जाणून प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे आणि मोफत केले. त्यांनी शैक्षणिक सुविधा दिल्या. शिकून तयार झालेल्या विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या माध्यमातून नोकरीची हमी दिली. शाहू महाराजांचे आरक्षण धोरण, त्यांची जलनिती, त्यांनी निर्माण केलेली सामाजिक समता, मल्ल विद्येला दिलेला आश्रय, बहुजन समाजाचे शिक्षण, स्त्री शिक्षण तसेच अस्पृश्यता निवारणासाठी छत्रपती शाहू महाराजांनी व्यक्तिगत पुढाकार घेतला तसेच आंतरजातीय व विधवा विवाहास मान्यता दिली.

छत्रपती शाहू महाराज हे फक्त राजे नसून समाजाची चिंता करणारे ऋषी होते. म्हणूनच त्यांना राजर्षी ही पदवी बहाल करण्यात आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे लोककल्याणकारी राजे होते.”असे प्रतिपादन वेणूताई चव्हाण कॉलेज कराडचे माजी मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. रघुनाथ केंगार यांनी केले. ते वेणूताई चव्हाण कॉलेज , कराडमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनाच्या आयोजनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

   या समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव म्हणाले की, “राजर्षी शाहू महाराज हे द्रष्टे राज्यकर्ते होते. देशाच्या उभारणीत त्यांचे महत्वाचे योगदान आहे. भारतीय संविधानाला अपेक्षित सामजिक न्याय, समताधिष्ठित, बंधुभावपूर्ण समाज निर्मितीच्या उद्देशाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरी केली जाते.”

  समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. पी. पवार यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्रीमती एस. आर. पवार यांनी करून दिला. सर्व उपस्थितांपचे आभार प्रा. पी. एस. कराडे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.