शिक्षक हेच व्यक्तिमत्त्वाचे शिल्पकार…..

72

मातृदेवो भव:, पितृदेवो भव:, आचार्यदेवो भव:…. अशी शिकवण देणाऱ्या भारतीय संस्कृतीचे आम्ही वंशज आहोत याचा रस्ता अभिमान प्रत्येक भारतीयांच्या मनात निश्चितपणे आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात गुरुचे स्थान, महत्व अनन्यसाधारण आहे.

 

गुरु माझी माता,

गुरु माझे पिता

गुरु माझे देव,

गुरु माझे देवालय….

 

गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. अर्थात शाळेमध्ये शिक्षण देणारे शिक्षक एवढेच आपले गुरु आहेत. गुरु ही एवढी मर्यादित संकल्पना नाही. जीवन प्रवासात, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात कळत-नकळत आपल्याला सहजपणे शिकून जाणारे अनेक घटक असतात. ते सर्वजण आपले प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गुरुच असतात.

 

गुरु

 

नसे मनुष्य जीवनी

कोणताही गुरु एक

शिकवितो जो जो कोणी

गुरु असतो प्रत्येक…….

 

जन्मदाते आई बाबा

आद्य गुरु प्रत्येकाचे

त्यांच्या पासुनी मिळती

खरे धडे शिक्षणाचे…….

 

कृत्तीतून शिकवितो

प्रतिव्यक्ती कुटुंबाचा

पाया घालतो सहज

नित्यक्रम जीवनाचा…….

 

मुलभूत ज्ञानासाठी

निरीक्षण भोवतीचे

भेटलेली माणसे ही

देती ज्ञान जगण्याचे …….

 

शाळा शिकवी तुम्हाला

भाषाज्ञान, संख्याज्ञान

ऊपयोगी महत्वाचे

विविधांगी शास्त्रज्ञान……..

 

देऊनिया ज्ञान सारे

करतात बुद्धिमान

ज्ञाना सोबत संस्कार

शिकविती गुरुजन…….

 

पुढे गृहस्थ आश्रमी

जावे श्रीगुरू शरण

त्यांच्या कृपेने होईल

माणसाला आत्मज्ञान……

 

सद्गुरू दाखविती

पूर्व संचिताची खुण

सोडविती भावबंध

देती ईश्वराची जाण…….

 

 

या माझ्या कवितेत वर्णन केल्याप्रमाणे जीवनात आई- वडिलांची जागा कुणीही घेऊ शकत नाही. कारण या सुंदर जगात आणण्याचे, जग दाखविण्याचे आणि जग समजावून सांगण्याचे श्रेय त्यांचे असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरु आई-वडील असतात.

 

आपल्या देशाला प्राचीन काळापासून दैदीप्यमान गुरु-शिष्य परंपरा लाभलेली आहे. वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या पद्धतीने, आणि वेगवेगळ्या स्वरूपात माणसाचे औपचारिक शिक्षण चालूच होते. आजही चालूच आहे. औपचारिक शिक्षण घेण्याची पद्धत बदलली. स्वरूप बदलले. गुरुगृही, आचार्यगृही, गुरुअश्रमी, आचार्य अश्रमी जाऊन शिक्षण घेण्याच्या पद्धती पासून आज थेट ऑनलाइन शिक्षण घेण्याच्या पद्धती पर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत. औपचारिक ज्ञानदानाची आणि ज्ञान ग्रहण करण्याची पद्धत, स्वरूप, माध्यम कोणतेही असो…. प्रत्येक माणसाच्या जीवनात औपचारिक शिक्षण देणाऱ्या…. आणि माणसाचे उज्वल भविष्य आणि आयुष्य घडविणाऱ्या….. शिक्षकाचे स्थान, महत्व अनन्यसाधारण होते, आहे आणि राहील. यात शंकाच नाही. आचार्य, गुरु, गुरुजी, शिक्षक, सर, टीचर याप्रमाणे शिक्षकांची नावे बदलत गेली, अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप बदलत गेले. शिकणे-शिकवणे बदलले. परंतु शिक्षकांचे प्रत्येक माणसाच्या जीवनातले महत्त्वाचे स्थान दिवसागणिक चढत्या आलेखाप्रमाणे वाढत आहे.

 

शिक्षक हे फक्त आम्हाला व्यवहारिक जीवनातले आणि पुस्तकातले औपचारिक ज्ञानच देतात. असे नसून, आपल्या जीवनाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडविण्याचे कार्य खऱ्या अर्थाने शिक्षक करत असतात. श्रवण, भाषण-संभाषण, वाचन-लेखन, संख्याज्ञान, संख्येवरील क्रिया, प्रत्येक विषयाचे आशयज्ञान शिकवता-शिकवतात आयुष्यातील अनेक गणिते सोप्या पद्धतीने कशी सोडवायची हे ही शिक्षक शिकवत असतात. विषयावरील आणि आशयावरील आधारित प्रश्नांची उत्तरे शोधता-शोधता जीवनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याची क्लृप्ती, गमक आम्हाला शिक्षक सहजपणे सांगत असतात. विज्ञानाचे प्रयोग शिकवता-शिकवता नकळतपणे आयुष्यातले प्रयोग कसे यशस्वी करायचे हे ही सांगून जातात. कोणताही पाठ शिकवल्यानंतर त्या पाठाच्या सारांश समजावता-समजावता आपल्या जीवनाचा सारांश आणि इतीकर्तव्यता आमचे शिक्षक आम्हाला सांगत असतात. अशाप्रकारे आपल्या जगण्याचा मार्ग कायमच प्रकाशमान करणारे, जीवनाला योग्य मार्ग दाखवणारे, आयुष्याला योग्य दिशा देणारे, संकटात, अडचणीत मनाला प्रेरणा देणारे गुरुजीच असतात. शिक्षकच असतात.

 

म्हणूनच कोणत्याही संकटाने सबंध संसार मोडून पडल्यानंतर आणि आयुष्य उध्वस्त होत असतानाही आधार देणारे गुरुजी, शिक्षकच असू शकतात. प्रत्यक्ष मदतीपेक्षा प्रेरणादायी विचार, जगण्याला आधार देणारे तत्त्वज्ञान जीवनात महत्त्वाचे असते. म्हणून

 

खिशाकडे हात जाताच

हसत हसत उठला

पैसे नको सर मला

जरा एकटेपणा वाटला….

 

मोडून पडला संसार सारा

परी मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेवूनी

फक्त लढ म्हणा….

 

एवढी आधार देण्याची क्षमता आणि संकटांना तोंड देण्याचे धैर्य देण्याची ताकद आपल्या गुरुजींच्या, शिक्षकांच्या शब्दात असते. आपल्या बालपणापासून आपल्या व्यक्तिमत्त्वावर गुरुजींच्या आचारांचा आणि विचारांचा प्रभाव पडलेला असतो. आपले गुरुजी हे खऱ्या अर्थाने आपल्याला आपले कर्तव्य, भावना, संवेदना, नीतिमत्ता, प्रामाणिकपणा शिकवत असतात. आपले आई-वडील आपल्या पायांना बळ देऊन आपल्याला चालायचे शिकवतात. अगदी त्याचप्रमाणे आयुष्याच्या वाटेवर तोल न ढळू देता आणि न डगमगता उज्वल भविष्याच्या आणि यशाच्या दिशेने वाटचाल करण्याची ताकद शिक्षक आपल्याला देत असतात. म्हणून आई-वडिलांनंतरचे पालक हे गुरुजीच असतात. आपल्या जगण्या-वागण्याला योग्य मार्गदर्शनाने समृद्ध करून व्यक्तिमत्वाला घडविणारे जीवनाचे शिल्पकार हे आपले शिक्षक असतात.

 

 

दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. शिक्षकांचे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्व असते. समाजात शिक्षकांचे एक विशिष्ट स्थान असते. सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षणानेच मानवी जीवन बदलते यावर विश्वास ठेवत. ते एक महान दार्शनिक आणि शिक्षक होते. त्यांना शिक्षणाप्रती अत्यंत प्रेम होते. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्यात सर्व गुण होते. या दिवशी संपूर्ण देशात भारत सरकार आणि महाराष्ट्र शासना मार्फत आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

 

दर्जेदार मनुष्यबळ निर्मिती करणे हे शिक्षणाचे प्रमुख ध्येय असून शिक्षकाचे महत्वपूर्ण कर्तव्य आहे. देशाचे भविष्य शिक्षणाने आणि शिक्षकांमुळे उज्वल होत असते. शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते. आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाट असतो. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे, आणि योग्य शिक्षण घेऊन जगासमोर उभे राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याचा महत्त्व समजवण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो.

 

 

ज्ञान देऊनी जीवनाचे या,

भविष्य घडवितो तो शिक्षक आहे

श्रवण, भाषण, वाचन, लेखन

व्यवहारिक ज्ञान शिकवितो तो शिक्षक आहे

 

वसा घेऊनी अध्ययन-अध्यापनाचा

ज्ञानयज्ञ प्रज्वलित ठेवितो तो शिक्षक आहे

बौद्धिक, कायिक, मानसिक, भावनिक

सर्वांगीण विकास घडविता तो शिक्षक आहे

✒️श्री. मयूर मधुकरराव जोशी(लेखक, कवी, कथाकार, गझलकार, समीक्षक, सुत्रसंचालक, व्याख्याता, समुपदेशक)विठ्ठल-रुक्मिणी नगर, जिंतूर)मो:-9767733560