जनहीतार्थ आर्थिक-सामाजिक भरीव योजना!

79

[संयुक्त राष्ट्रे संघटना स्थापना दिवस विशेष]

आंतरराष्ट्रीय संघटनेची संकल्पना ही विसाव्या शतकात दृढमूल झाली असली, तरी तिच्या स्थापनेच्या संदर्भात मध्ययुगात काही तुरळक प्रयत्न झालेले दिसतात. परंतु मध्ययुगीन काळातील राष्ट्रांमधील परस्परसंबंधांचे स्वरूप प्राय: द्विपक्षीय होते. क्वचित प्रसंगी बहुपक्षीय परिषदांचे आयोजन केले जात असे. मात्र त्यांचे स्वरूप तात्कालिक व उद्दिष्टांपुरते मर्यादित असे. वेस्टफेलिया तहाच्या वेळी अनेक यूरोपीय राष्ट्रे एकत्र आली होती. त्यांच्या चर्चेतून आधुनिक यूरोपच्या राजकारणाचा उदय झाला आणि राष्ट्रराज्याची कल्पना स्थिरावली. त्यानंतर आधुनिक जगाच्या इतिहासात मैत्रीसंघटना, परिषदा, सहकार्य यांचे नवे युग सुरू झाले. एकोणिसाव्या शतकात यूरोपीय राष्ट्रांनी राजकीय, आर्थिक, सामाजिक यांसारखे प्रश्न परस्पर सहकार्याने सोडविण्यासाठी अनेक संघटना-संस्था स्थापन केल्या.

इ.स.१८१५ची व्हिएन्ना परिषद, तिच्यातून पुढे उदयाला आलेली संयुक्त यूरोप- कन्सर्ट ऑफ यूरोपची कल्पना, रेडक्रॉस, इंटरनॅशनल टेलिग्राफिक युनियन, युनिव्हर्सल पोस्टल युनियन, बर्लिन परिषद, हेग परिषदा- नेदर्लंड्स, पहिल्या महायुद्धानंतर भरलेली पॅरिस शांतता परिषद आणि त्या परिषदेचा एक भाग म्हणून स्थापन झालेला राष्ट्रसंघ यांसारख्या संस्था, संघटना व परिषदा या आधुनिक काळातील आंतरराष्ट्रीय संघटनेच्या विकासातील उत्क्रांतीचे महत्त्वाचे टप्पे होत. त्या दृष्टीने त्या दिशेने विसाव्या शतकाच्या सुरूवातीपासूनच प्रयत्न सुरू झाले होते. पहिल्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील गंभीर दोष जगाच्या निदर्शनास आले आणि सत्ता-संतुलनाच्या राजकारणास पर्याय म्हणून सामूहिक सुरक्षिततेच्या तत्त्वाचा राजकीय विचारवंत पुरस्कार करू लागले.

प्रकट राजनय आणि सामूहिक सुरक्षितता ही नवी सूत्रे प्रचारात आली. ती राष्ट्रसंघाच्या रूपाने काही अंशी मूर्त स्वरूपात आली; परंतु त्याबाबतीत राष्ट्रसंघ निष्प्रभ ठरला कारण बड्या राष्ट्रांच्या महत्त्वाकांक्षांवर नियंत्रण ठेवण्यात तो असमर्थ ठरला. तथापि लोककल्याणाच्या काही आर्थिक-सामाजिक भरीव योजना त्याने राबविल्या आणि संयुक्त राष्ट्रे या संघटनेस भक्कम पार्श्वभूमी तयार केली.

दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांतता, सुरक्षितता आणि सहकार्य यांकरिता संयुक्त राष्ट्रे संघाची निर्मिती करण्यात आली. ही दि.२४ ऑक्टोबर १९४५ रोजी स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय संघटना आहे. या संघटनेचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे असून सन २००७ साली तिच्या सदस्यांची संख्या १९२ होती. दुसऱ्या महायुद्धापूर्वीच राष्ट्रसंघ ही संघटना अनेक कारणांनी निष्प्रभ ठरली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरूवातीस इंग्लंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांतील नेत्यांनी युद्धोत्तर काळातील समस्यांच्या सोडवणुकीचा विचार सुरू केला होता. रशिया व फ्रान्स या राष्ट्रांचे नेतेही या प्रक्रियेत सहभागी झाले. ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँक्लिन रूझवेल्ट यांची अटलांटिक महासागरातील एका युद्धनौकेवर दि.१४ ऑगस्ट १९४१ रोजी भेट झाली. तीत त्यांनी युद्धाची उद्दिष्टे जाहीर केली. ती अटलांटिक सनद या नावाने प्रसिद्ध आहे. याच बैठकीत युद्धोत्तर कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याचा मनोदय या नेत्यांनी व्यक्त केला.

फ्रँक्लिन रूझवेल्ट यांनी या भावी संघटनेस संयुक्त राष्ट्रे ही संज्ञा सुचविली. पुढे शत्रूराष्ट्रांविरूद्ध एकत्रित आलेल्या सव्वीस मित्रराष्ट्रांनी अटलांटिक सनदेला पाठिंबा दर्शविला व दि.१ जानेवारी १९४२ रोजी प्रथमच संयुक्त राष्ट्रे या संस्थेच्या अधिकृत स्थापनेस सहमती दर्शविली. जर्मनी-जपान-इटली या शत्रू-राष्ट्रांविरूद्धच्या दुसऱ्या महायुद्धातील सामूहिक कारवाईचा उल्लेख मित्र-राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रे असा केला होता. मॉस्को येथील दि.३० ऑक्टोबर १९४३च्या परिषदेच्या जाहीरनाम्यात चीन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, सोव्हिएट रशिया आणि ग्रेट ब्रिटन यांनी राष्ट्रसंघाच्या जागी आंतरराष्ट्रीय संघटनेची निकड प्रतिपादिली. या चार राष्ट्रांनी डंबर्टन ओक्स- वॉशिंग्टन डी.सी. या परिषदेत या नूतन संघटनेच्या सनदेचा अंतिम मसुदा तयार केला. या परिषदेत किमिया, स्टालिन, चर्चिल आणि रूझवेल्ट यांनी असे ठरविले, की संयुक्त राष्ट्रांची सॅन फ्रॅन्सिस्को येथे दि.२५ एप्रिल १९४५ रोजी सर्व मित्रराष्ट्रांची बैठक घेऊन सनदेच्या कलमांना सहमती घ्यावयाची. त्याप्रमाणे उपस्थित ५० मित्रराष्ट्रांच्या सॅन फ्रॅन्सिस्को येथे एप्रिल ते जून दरम्यान अनेक बैठका झाल्या. त्यांवर सविस्तर चर्चा होऊन सुरक्षा मंडळाच्या रचनेसंबंधी निश्चित धोरण ठरविण्यात आले आणि सनदेवर शिक्का मोर्तब झाले.

या परिषदेस संस्थापित परिषद- फाउंडिंग कॉन्फरन्स असे म्हणतात. या संघटनेची पहिली आमसभा लंडन- ग्रेट ब्रिटन येथे दि.१० जानेवारी १९४६ रोजी भरली. तीत युद्धोत्तर योजनांविषयी आणि संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाविषयी साधकबाधक चर्चा होऊन ते अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात स्थायी स्वरूपात बांधण्याचे ठरले. त्यानंतर या बांधकामासाठी जॉन रॉकफेलर या धनाढ्य गृहस्थाने सुमारे ८५ दशलक्ष अमेरिकन डॉलर अशी भरघोस देणगी दिली आणि अमेरिकन शासनाने त्यात ६७ दशलक्ष डॉलर निर्व्याज रक्कम घातली आणि न्यूयॉर्क येथे सात हेक्टर क्षेत्रात कार्यालयाच्या भव्य वास्तू उभ्या राहिल्या.

संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे स्वरूप असे होते- सनदेच्या प्रारंभी उद्देशिका देऊन तिचे स्वरूप १११ कलमे व एकोणीस प्रकरणांत स्पष्ट केले आहे. पूर्वीच्या राष्ट्रसंघाची योजना व्हर्सायच्या तहाचा अंगभूत भाग होती, तर संयुक्त राष्ट्रांची सनद हा राष्ट्राराष्ट्रांमधील स्वतंत्र करार आहे. या सनदेचा एकदा स्वीकार केल्यावर ती संबंधितांवर बंधनकारक आहे. कालमानाप्रमाणे बदल करण्याची सनदेत तरतूद असून तिचा वापर करून संयुक्त राष्ट्रांच्या जागी उदया एखादी नवी संघटनादेखील स्थापन करता येऊ शकेल. सु. दहा हजारांपेक्षा जास्त शब्दसंख्या असलेल्या या सनदेत संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे, तत्त्वे, रचना, विविध संस्था-उपसंस्थांची कार्यकक्षा व कार्यपद्धती यांसंबंधी तरतुदी आहेत.

संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे व तत्त्वे याप्रमाणे- सनदेच्या पहिल्या कलमातच संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे विशद केली ती अशी- १) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करणे. २) राष्ट्राराष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे. ३)आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करून त्याव्दारे राष्ट्राराष्ट्रांमधील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व मानवी समस्यांची उकल करणे तसेच वंश, लिंग, भाषा व धर्म यांच्या आधारे भेदभाव न करता मानवी हक्क व मूलभूत हक्क यांची जोपासना करून त्यांबाबत आदरभाव वाढविणे. ४) ही समान उद्दिष्टे गाठण्यासाठी विविध देशांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये सुसंवाद साधणारे केंद्र म्हणून कार्य करणे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सदस्यराष्ट्रांनी कोणत्या तत्त्वांच्या आधारे कार्य करावे, याचे मार्गदर्शन सनदेच्या दुसऱ्या कलमात केलेले आहे. ती आधारभूत तत्त्वे: १) सर्व राष्ट्रे सार्वभौम व समान आहेत. २) सनदेनुसार येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे बंधन सर्व सदस्य-राष्ट्रांवर आहे. ३) आंतरराष्ट्रीय संघर्षांची शांततामय मार्गाने सोडवणूक करणे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षितता व न्याय यांना धोका निर्माण होणार नाही. ४) आंतरराष्ट्रीय संबंधांत कोणत्याही राष्ट्राची भौगोलिक अखंडता व राजकीय स्वातंत्र्य यांविरूद्ध बळाचा प्रयोग करण्याची धमकी किंवा प्रत्यक्ष वापर करण्यास सदस्य-राष्ट्रांना प्रतिबंध. ५) संयुक्त राष्ट्रांच्या कार्यांत सर्व सदस्य-राष्ट्रांचे सहकार्य. ६) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेसाठी बिगर-सदस्य राष्ट्रांकडूनही या तत्त्वांशी सुसंगत वर्तन व्हावे म्हणून प्रयत्न. ७) कोणत्याही राष्ट्राच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप करण्यास प्रतिबंध. आंतरराष्ट्रीय संबंधांचे लवचिक आणि प्रवाही स्वरूप व उद्दिष्टपूर्तीसाठी संघटित प्रयत्न यांची सांगड या आधारभूत तत्त्वांमध्ये घातलेली दिसून येते.

!! संयुक्त राष्ट्र संघटना स्थापना दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभकामना !!

✒️अलककार- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
गडचिरोली, फक्त व्हॉट्स ॲप-९४२३७१४८८३