नाट्यश्रीचे बहारदार कवी संमेलन

89

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.१७ डिसेंबर):- स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंचच्या वतीने विदर्भातील ज्येष्ठ कवी “ऊर्मी”कार प्रभाकर तांडेकर “प्रदत्त” यांच्या अध्यक्षतेखाली, प्रसिद्ध साहित्यिक राजेंद्र कांबळे यांचे उपस्थितीत नुकतेच कविसंमेलन घेण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवी चरणदास वैरागडे, दादाजी चुधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कवि संमेलनात विदर्भातील एकूण अठ्याहत्तर कवींनी भाग घेऊन उत्स्फूर्तपणे कविता सादर केल्या. सामाजिक आशयाच्या, विषयाच्या व चळवळीच्या विविध कवितांनी संमेलनात चांगली रंगत आणली.

गडचिरोली जिल्ह्यातील ज्येष्ठ व श्रेष्ठ प्रसिद्ध कव्वाल व गझलकार वामनदादा गेडाम यांच्या गझलेने या संमेलनाची रंगतदार सुरुवात झाली. तर पराग दडवे या कवीच्या ‘प्रेम, अध्यात्म आणि मी’ या कवितेने प्रेमाची एक वेगळीच ओळख रसिकांना करुन दिली.

सिंदेवाहीच्या सौ.प्रिती ईश्वर चहांदे या कवयित्रीने “दुःख” कविता सादर करून आपल्या ह्रदयाची बोच प्रगट केली, तर डॉ.प्रविण किलनाके यांनी “मोडून पडलेला औत”द्वारे शेतकऱ्यांच्या व्यथेला वाचा फोडली. कुरखेडाच्या कु.विधी भास्कर बन्सोड या बालकवीने “वेळेस माझी वाट आहे” या कवितेतून आशावाद प्रगट केला. मुलच्या प्रब्रम्हानंद मडावी या कवीने “नाती” कवीता सादर करून आदिवासींच्या वेदना मांडल्या. इंजि.विजय मेश्राम यांनी “असे वाटते” म्हणत रसिकांची वाहवा मिळवली, तर भिमानंद मेश्राम यांच्या ‘विशवगुरु’ या कवितेने संमेलनास एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आरमोरीच्या ज्योती म्हस्के यांनी “समाजाच्या नपुंसकते”वर आघात केला.

डॉ.चंद्रशेखर बांबोळे यांनी “घेतले वाटून त्यांनी”, म्हणत समाजाच्या दांभिकतेवर हल्लाबोल केला. मुलचेरा येथील प्रभाकर दुर्गे यांची “श्वासातून फुटल्या आर्त किंकाळ्या” मनिषा हिडको या आदिवासी कवयित्रीची “जननी” सुजाता अवजट यांची “मैत्री”, सोपानदेव म्हशाखेत्री यांची “जगण्यास अर्थ आला”, पुरुषोत्तम ठाकरे यांची “सकाळी सकाळी” स्वप्नील बांबोळे यांची “व्हा चोर इथे” उपेंद्र रोहनकर यांची “माही माय”, सुनिता तागवान यांची ‘नशिब’, खेमदेव हस्ते यांची ‘रान पेटत आहे’, योगेश गोहणे यांची ‘संत गाडगेबाबा ‘ संगीता ठलाल यांची ‘कोंड्याची राख’, देवेंद्र मुनघाटे यांची लोकप्रतिनिधींचे चिमटे घेणारी ‘आजचा पुढारी’, तर प्रमुख अतिथी चरणदास वैरागडे यांच्या ‘व्यथा शेतकऱ्याची’ या आशयगर्भ कवितेने रसिक भारावून गेले. डॉ.गुलाब मुळे यांच्या ‘गुस्ताखी माफ हो’ व दिनेश देशमुख यांच्या ‘आश्वस्त हो’ या विनोदी कवितांनी रंगत आणली.

नाट्यश्रीचे कविसंमेलन निखळ आनंद देणारे असते. दर्जेदार कवितांचा आस्वाद या संमेलनातून घ्यायला मिळतो. समाजाला दिशा देणारे हे कवीसंमेलन आहे’ असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’ यांनी काढले. ‘विविध स्तरावरील समस्यांना वाचा फोडणारे, आदिवासी व मागासवर्गीयांच्या समस्या मांडणारे कवी संमेलन आहे’ असे मत प्रमुख अतिथी राजेंद्र कांबळे यांनी मांडले.

या कवी संमेलनात संगीता रामटेके, सुनीता तागवान, कु.भाग्यश्री बन्सोड, सौ.ज्योत्स्ना बन्सोड, तुळशीराम उंदीरवाडे, प्रदीपकुमार साखरे, निळकंठ रोहनकर, मिलिंद खोब्रागडे, पुजा गिरी, वंदना मडावी, प्रतीक्षा कोडापे, वर्षा पडघन, गजानन गेडाम, खुशाल म्हशाखेत्री, दिनेश देशमुख, वसंत चापले, अहिंसक दहिवले, लता शेंद्रे, केवळ बगमारे, विजया पोगडे, प्रकाश मारभते, सुरेखा बारसागडे, सोमनाथ मानकर, सुनील मंगर इत्यादींसह ७८ कवींनी आपापल्या स्वरचित कविता सादर केल्या. कवी संमेलनाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन योगेंद्र गोहणे यांनी केले. सोबतच प्रत्येक कवींचा थोडक्यात साहित्यिक परिचय करून दिला.

अरुण बुरे यांनी अभिप्रायांचे वाचन केले. सहभागी सर्व कवींना सहभाग प्रमाणपत्र व पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी प्रा.अरुण बुरे, दिलीप मेश्राम, वसंत चापले, गजानन गेडाम, राजू चिलगेलवार, राजेंद्र जरुरकर, दादाजी चुधरी, चुडाराम बल्हारपुरे संचालक व दै.देशोन्नतीचे उपसंपादक नरेश बावणे यांनी विशेष मेहनत घेतली. अशी माहिती आमच्या न्युजनेटवर्कला श्री कृष्णकुमार निकोडे गुरूजींनी पुरवली आहे.