ग्राहकांनी आपले हक्क व कर्तव्य ओळखावीत– गोपाळ मंत्री

157

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.29डिसेंबर):-ग्राहकांना मिळणारे हक्क व त्यांचे असलेले कर्तव्य प्रत्येक सुजान ग्राहकांनी जाणून घेणे आजच्या परिस्थितीमध्ये अत्यंत आवश्यक आहे कारण ग्राहकांची पदोपदी फसवणूक होत आहे व त्यामुळेच आज व्यापक प्रमाणावर राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे शहराध्यक्ष गोपाळ मंत्री यांनी केले . दिनांक 29 डिसेंबर रोजी येथील तहसील कार्यालय पुरवठा विभाग व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात ग्राहक पंचायत चे उपाध्यक्ष सय्यद ताजुद्दीन फरीद, शहराध्यक्ष गोपाळ मंत्री, तालुका सचिव मुंजाभाऊ लांडे, संघटक सुधाकर चव्हाण, सदस्य नारायण घनवटे, प्रसिद्धी प्रमुख राजकुमार मुंडे, पुरवठ्याचे नायब तहसीलदार अशोक केंद्रे, संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार सुनील कांबळे यांच्यासह ग्राहक मंचच्या महिला अध्यक्ष सीमा घनवटे, प्रतिमा ताई वाघमारे,नीलावती भुमरे,माणिक बेदरे,पत्रकार मिलिंद रायभोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना ग्राहकांना असलेले सहा हक्क त्यामध्ये सुरक्षेचा हक्क, माहिती मिळवण्याचा हक्क, निवड करण्याचा हक्क, मत मांडण्याचा हक्क, तक्रार आणि निवारण करण्याचा हक्क व ग्राहक हक्काच्या शिक्षणाचा हक्क याविषयी ग्राहकांनी सजग असावे.

वेगवेगळे शासनमान्य एगमार्क, आयएसआय यासारखे लोगो पाहून वस्तूंची डोळसपणे खरेदी करावी जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. तसेच फसवणूक झाली असता राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन किंवा नॅशनल कंजूमर हेल्पलाइन या वेबसाईटवर जाऊन आपली तक्रार दाखल करावी असे प्रतिपादन ग्राहक मंचच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले .

तसेच ग्राहकांच्या जागरूकतेसाठी विविध शिबिरे, कार्यशाळा यांचे आयोजन करावे व त्यामधून ग्राहकांना त्यांच्या हक्काची माहिती मिळावी . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महसूल सहाय्यक गणेश सोडगीर ,ऑपरेटर गंगाधर कदम, अव्वल कारकून उर्मिला कोलघने, पठाण मॅडम, कोतवाल प्रकाश कांबळे यांनी प्रयत्न केले . कार्यक्रमासाठी रास्त भाव दुकानदार तरुण ज्येष्ठ नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.