भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घालणारे रंगकर्मी! [भालजी पेंढारकर जयंती विशेष.]

52

 

_भालचंद्र पेंढारकर अर्थात अण्णा हे अत्यंत व्यासंगी, शिस्तबद्ध आणि रंगभूमीवर अमाप श्रद्धा असणारे रंगकर्मी होते. तिसरी घंटा जाहीर केलेल्या वेळेवरच देणारे आणि त्याच क्षणी बुकिंगची पर्वा न करता नाटक सुरू करणारे एकमेव निर्माता आणि अभिनेते होते. मुंबई साहित्य संघात त्यांची स्वतःची रेकॉर्डिंग रूम होती. त्यात त्यांनी असंख्य नाटके रेकॉर्ड करून ठेवलेली आहेत.. त्यांत प्रायोगिक नाटके, संघात झालेल्या प्रत्येक नवीन प्रयोगाचे ध्वनिमुद्रण त्यांनी केले होते. अधिक रोचक, उपयोगी संकलित माहिती श्रीकृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींच्या सदर लेखात वाचा…. संपादक._

भालजी पेंढारकर हे भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घालणार्‍या चित्रकर्मींमधले अग्रणी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक आणि गीतकार होते. भालजींचा जन्म दि.२ मे १८९८ रोजी कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन सहायक शल्यचिकित्सक डॉ.गोपाळराव आणि राधाबाई पेंढारकर यांच्यापोटी कोल्हापुरात झाला. निर्माते-अभिनेते बाबूराव पेंढारकर हे त्यांचे ज्येष्ठ बंधू. चाकोरीबद्ध शालेय शिक्षणात मन न रमलेल्या भालजींनी तरुणवयातच कोल्हापूर सोडले. सुरुवातीच्या काळात पुण्यात केसरी या वृत्तपत्रात नोकरी, छत्रपती शाहूमहाराजांच्या रायबाग कॅम्पमध्ये वास्तव्य आणि सैन्यात भरती काहीशी अशी भटकंती करत ते कोल्हापूरला परतले. भालजी पुण्यात असताना त्यांनी केसरीचे अंक घरोघरी पोहोचवणे, विकणे अशी कामे केली; पण त्यातून उरलेल्या वेळात त्यांनी केसरीचे जुने अंक-विशेषतः लोकमान्य टिळकांचे जहाल अग्रलेख, चिपळूणकर, मोडक, विजापूरकरांच्या ग्रंथमाला, पुस्तके, चरित्रे असे साहित्य वाचले. त्यांच्यातल्या लेखकावर या सगळ्यांचे संस्कार झाले. पुण्यातल्या लक्ष्मी थिएटरचे व्यवस्थापक रुस्तमजी मोदी (सोहराब मोदींचे बंधू) यांनी त्या काळी मूकपटांच्या वरच्या भागात इंग्रजी उपशीर्षकांची मराठी भाषांतरे देण्याची पद्धत सुरू केली होती. भालजींना वर्तमानपत्रात स्फुटे लिहिण्याबरोबरच हे मराठी भाषांतराचे कामही मिळाले. पुढे त्यांनी सिनेमा समाचारमधून चित्रपटांची परीक्षणेही लिहिली. १९२१ मध्ये भालजींनी संगीत कायदेभंग, भवितव्यता, क्रांतिकारक, राष्ट्रसंसार, आसुरी लालसा आणि अजिंक्यतारा ही सहा नाटके लिहिली, त्यांत अभिनयही केला.
भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाल्याच्या भावनेचा व स्वातंत्र्याचा दिव्य संदेश भालजींनी आपल्या चित्रपटांतून दिला. बहिर्जी नाईक, नेताजी पालकर, मोहित्यांची मंजुळा यांतील संवादांमधून भालजींनी दुबळेपणा व लाचारीविरुद्ध शाद्बिक आसूड ओढले. स्वातंत्र्य मिळाले तरी सुराज्य निर्माण करण्यासाठी त्याग, निष्ठा, औदार्य व संयमी असा खंबीरपणा आणि आत्मविश्वास असलेली तरुण पिढी तयार व्हावी यासाठी त्यांनी समृद्ध आशयासह कला व तंत्र या दोन्ही दृष्टिकोनातून उत्कृष्ट अशा चित्रपटांची निर्मिती केली. भालजींचे चित्रपट किंवा त्यांची निर्मिती संस्था म्हणजे कलाकार व तंत्रज्ञ घडवणारी एक मोठी कार्यशाळाच होती. तसेच त्यांचा संच म्हणजे कुटुंबच होते. शिस्तबद्धता, वेळापत्रकानुसार काम, कामांचे नेटके वाटप, स्तोत्रपठण, प्रार्थना, रेखीव दिनक्रम, वगैरे… चित्रपटाच्या माध्यमातून भालजींनी सुलोचनादीदी, चंद्रकांत मांडरे, सूर्यकांत मांडरे, जयश्री गडकर असे असंख्य कलाकार घडवले. शिवाजीचा काळ आणि त्या काळातील व्यक्तिरेखा व प्रसंग ही भालजींच्या चित्रपटांची प्रमुख वैशिष्ट्ये होती. त्यांच्या युगप्रवर्तक अशा कारकिर्दीमुळे भालजींना यथार्थतेने चित्रतपस्वी असे म्हटले जाते. सन १९४८मध्ये गांधीजींची हत्या झाल्यानंतरच्या दंगलीमध्ये भालजींचा कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओ जाळला गेला. नुकताच तयार झालेला मीठभाकर व बाळ गजबरांचा मेरे लाल हे चित्रपट आगीत भक्षस्थानी पडले. दीडशे ते दोनशे कामगार बेकार झाले. भालजींनी पुन्हा लाखो रुपये खर्चून जयप्रभास परत उभे केले. जिद्दीतून मीठभाकर व मेरे लालची पुनर्निर्मिती केली. मीठभाकरने चांगला व्यवसाय केला. भालजींनी कोल्हापुरात मराठी चित्रनिर्मितीस पुन्हा एकदा वेग मिळवून दिला. भालजी पेंढारकरांच्या बोलपटांच्या सुरुवातीलाच बहु असोत सुंदर, आकाशवाणी, पार्थकुमार, कालियामर्दन, सावित्री अशी सुरू झालेली त्यांची कारकीर्द नेताजी पालकर, थोरातांची कमळा, वाल्मिकी, मीठभाकर, छत्रपती शिवाजी, गाठ पडली ठका ठका, मोहित्यांची मंजुळा अशी वळणे घेत गेली. साधी माणसं, गनिमी कावा आणि शेवटचा शाब्बास सूनबाई असे तब्बल पंचेचाळीस चित्रपट त्यांनी चित्रपटसृष्टीला दिले. या चित्रपटांत ते दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद किंवा निर्मिती या नात्याने कार्यरत होते. अशा या श्रेष्ठ चित्रमहर्षीचे- भालजींचे कोल्हापूर येथे दि.२६ नोव्हेंबर १९९४ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या युगप्रवर्तक अशा कारकिर्दीमुळे भालजींना यथार्थतेने चित्रतपस्वी असे म्हटले जाते. भारतीय चित्रपटसृष्टीच्या अप्रगत अशा कालखंडात मूकपटापासून सुरुवात करत उत्तमोत्तम बोलपट निर्माण करून चित्रपटसृष्टीचा भक्कम पाया घालणारे सर्जनशील, प्रयोगशील चित्रपटकर्मी म्हणून त्यांचे नाव भारतीय कलेच्या इतिहासात कायमचे नोंदले गेले आहे.
!! चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!

– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
रामनगर वॉर्ड, गडचिरोली, जि. गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.