मुंबईकरांचा साश्रुनयनांनी ट्रॅमगाडीस निरोप! [मुंबईत विजेवरील ट्रॅम आरंभ दिन.]

136

 

_सुरुवातीला ट्रॅमगाड्या घोडे ओढत असत. नंतर त्या वीजेवर चालविण्यात आल्या. मुंबई वीज पुरवठा आणि ट्रॅमवेज कंपनी मर्यादितने मुंबई ट्रॅमवेज कंपनी विकत घेतली. हीच आताच्या बेस्टची मूळ कंपनी होय. दि.७ मे १९०७ रोजी पहिली विजेवरची ट्रॅम धावली. सन १९२० साली दुमजली ट्रॅमसेवा चालू झाली. सन १९२४ पासून रेल्वे वीजेवर चालू लागली होती तर सन १९२६ साली बससेवा चालू झाली. बस व रेल्वे सेवा जलद गतीने असल्याने ट्रॅमसेवा तोट्यात गेली. शेवटी ट्रॅमसेवा बंद करण्यात आली. सदर रोचक ज्ञानवर्धकसंकलित माहितीचा लेख श्री एन. कृष्णकुमार जी. गुरूजींच्या शब्दातून जरूर वाचा… संपादक._

ट्रॅम हे विजेवर चालणारे पूर्वीचे वाहन आहे. यासाठी रस्त्यातच रूळ टाकलेले असतात. या वाहनामुळे वाहतूक कोंडी होवू शकते. तसेच यांचा वेगही मर्यादित असतो. भारतात पूर्वी मुंबई येथे ट्रॅम सेवा होती. तसेच कलकत्ता येथेही ट्रॅम धावत असत. युरोपमधले अनेक देश तसेच ऑस्ट्रेलियातील काही शहरे येथे ट्रॅम हे सार्वजनिक वाहतुकीचे साधन म्हणून वापरले जाते. ट्रॅमसेवा ही मुंबई शहरातील पहिली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था होय. मुंबईत दि.१९ मे १८७४ रोजी पहिली ट्रॅमसेवा चालू झाली. मुंबई ट्रामवे कंपनी, मुंबई महानगरपालिका आणि मुंबई सरकार यांच्यात करार होऊन तिचे नियोजन झाले. सुरुवातीला ट्रॅमगाड्या घोडे ओढत असत. नंतर त्या वीजेवर चालविण्यात आल्या. मुंबई वीज पुरवठा आणि ट्रॅमवेज कंपनी मर्यादितने मुंबई ट्रॅमवेज कंपनी विकत घेतली. हीच आताच्या बेस्टची मूळ कंपनी होय. दि.७ मे १९०७ रोजी पहिली विजेवरची ट्रॅम धावली. सन १९२० साली दुमजली ट्रॅमसेवा चालू झाली. सन १९२४ पासून रेल्वे वीजेवर चालू लागली होती तर सन १९२६ साली बससेवा चालू झाली. बस व रेल्वे सेवा जलद गतीने असल्याने ट्रॅमसेवा तोट्यात गेली. शेवटी ट्रॅमसेवा बंद करण्यात आली. दि.३१ मार्च १९६४ रोजी रात्री १० वाजता बोरिबंदर ते दादर शेवटची ट्रॅमगाडी धावली. त्या शेवटच्या दिवशी हजारो मुंबईकरांनी तिला दुतर्फा प्रचंड गर्दी करून हळहळत निरोप दिला होता. त्यादिवशी ७१,९४७ प्रवाश्यांनी ट्रॅममधून प्रवास केला. त्याचे उत्पन्न ४,२६० रुपये होते. सुरुवातीला एक आण्यात कुठेही प्रवास करायची सुविधा होती. नंतर दीड आणा आणि नंतर दोन आणे तिकीट झाले. माटुंगा सर्वात दूरचे स्थानक होते. सहा नंबरची ट्रॅमगाडी फोरासमार्गे कुलाबा ते गिरगाव धावायची. चालकाजवळ पायापाशी वर्दी देण्यासाठी घंटा असायची. ससून डॉक ते छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, वाडीबंदर, लालबाग, जेकब सर्कल, ताडदेव, ऑपेरा हाऊस, ग्रॅंटरोड ते जेजे हॉस्पिटल, धोबीतलाव ते कर्नाटक बंदर असे शहरभर जाळे होते. ट्रॅम गोल फिरून वळायची आणि उलट दिशेने धावायची. आताच्या गोलाकार बागा या तेव्हाची ट्रॅमची स्थानके होती. किंग्ज सर्कल, सायन सर्कल, दादर टीटी ट्रॅम टर्मिनस ही त्यातील काही ठिकाणे होत. बा.सी.मर्ढेकरांच्या खालील शब्दात ती अजरामर झाली आहे-
“जिथे मारते कांदेवाडी टांग जराशी ठाकुरद्वारा|
खडखडते अन् ट्राम वाकडी, कंबर मोडुनी, चाटित तारा||”
मुंबईत कुलाबा ते क्रॉफ़र्ड मार्केट या मार्गावर पहिली विजेवर चालणारी ट्रॅमगाडी सुरू झाली आणि घोड्यांच्या ट्रॅमचे युग समाप्त झाले. मुंबई शहरात ट्रॅम धावत होती, हे आजच्या पिढीला ज्ञात नाही.
दि.९ मे १८७४ रोजी मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणार्‍या ट्रॅम सुरू झाल्या होत्या. घोड्याची ट्रॅम सुरु होण्यापूर्वी मुंबईत मुख्य वाहतुकीचे साधन म्हणजे मेणे व छकडे होते. घोड्याने चालवलेला टांगा हे वाहन सन १८८०मध्ये मुंबईत प्रथम आले. अस्सल मुंबईकर याला टांगा म्हणण्यापेक्षा व्हिक्टोरिया हे भारदस्त इंग्रजी नावं देत असत. कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट, पायधुनी ते बोरीबंदर आणि बोरीबंदर ते काळबादेवी- पायधुनी या मार्गावर घोड्यांनी ट्रॅम खेचली. पहिल्याच दिवशी ४४ घोड्यांसह ६ ट्रॅमगाड्यांनी ४३ फेर्‍या केल्या. ४५१ प्रवाशांकडून ८४ रुपये ९ पैसे जमा झाले. ट्रॅम ओढण्यासाठी आणलेल्या विलायती घोड्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना टोप्या घालत असत. या ट्रॅममध्ये कंडक्टर असायचा पण तिकीटं नसायची. त्यावेळी कोणी प्रवासी फुकट म्हणजे पैसे न देता प्रवास करणारा आहे की नाही हे तपासून पाहिलेच नव्हते. एवढेच नव्हे कंडक्टर जे काही पैसे गोळा करत होते, ते बरोबर कंपनीकडे जमा करत होते की नाही, याचाही काही बंदोबस्त केलेला नव्हता. पण हा मामला फार काळ टिकला नाही. चार महिन्यांनंतर ट्रॅमच्या तिकिटांची कल्पना सुचली आणि ट्रॅमचं उत्पन्न वाढू लागलं. उत्पन्न वाढू लागल्यावर ट्रॅमचं तिकीट कमी करुन एक आणा करण्याचं औदार्य त्या काळच्या सरकारनं दाखवलं. ही ट्रॅमसेवा सुमारे ३१ वर्षे सुरू होती. दि.९ मे १८७४ पासून दि.७ मे १९०७ पर्यंत एकतीस वर्षांनंतर शेवटच्या दिवशी जेव्हा साधी ट्रॅम बंद झाली, त्यादिवशी ७१ हजार ९७४ प्रवाशांनी ट्रॅममधून प्रवास केला. ४२६० इतकं उत्पन्न त्यादिवशी जमा झालं. म्युझियम ते ससून डॉक, लालबाग, जेकब सर्कल, ऑपेरा हाऊस, करनॅक बंदर ते धोबी तलाव, जेजे हॉस्पिटल ते ग्रँट रोड या मार्गावर त्यावेळी ट्रॅम धावायची. म्युझियमपासून दादरपर्यंतचा प्रवास त्याकाळी फक्त दीड आण्यात व्हायचा.
सन १९०५मध्ये बॉम्बे इलेक्‍ट्रिक सप्लाय ऍण्ड ट्रॅम्वेज कंपनी लिमिटेड ही कंपनी म्युनिसिपालिटीने विकत घेतली. दि.७ मे १९०७ला वीजेवर चालणारी ट्रॅमगाडी सुरू झाली. पहिली ट्रॅमगाडी लंडनच्या ब्रश इलेक्‍ट्रिकल कंपनीने दिली होती. त्यावेळी ट्रॅमगाड्यांमध्ये उभं राहण्याची व्यवस्था होती आणि अप्पर क्लास आणि लोवर क्लास अशी विभागणी करण्यात आली होती. पण पहिल्याच दिवशी मालवणकर नावाचे प्रवासी ट्रॅममधून रुळांवर पडले आणि त्यांचा पाय तुटला. कालांतरानं ट्रॅममध्ये उभं राहायला म्युनिसिपाल्टीनं बंदी घातली आणि सन १९२० साली दुमजली ट्रॅम सुरू झाली. नंतर बोरीबंदर ते जे.जे.हॉस्पिटल आणि राणीची बाग अशी ट्रॅमगाडी धावू लागली. सन १९०७ साली ट्रॅमचे विद्युतीकरण झाले आणि ती किंग्ज सर्कल पर्यंत धावू लागली. तोपर्यंत ट्रॅमचे शेवटचे ठिकाण (टर्मिनस) दादरचे खोदादाद सर्कल होते. म्हणूनच ट्रॅम संपुष्टात येऊन इतकी वर्षे लोटली तरी खोदादाद सर्कलचे दादर टी.टी. हे नावं आजही कानावर येते; कारण दादर टी टी म्हणजे दादर ट्रॅम टर्मिनस होय. हे नाव आज ट्रॅम बंद पडली तरी वापरले जाते, नव्हे हेच नाव या भागाची ओळख आहे.
दि.१२ डिसेंबर १९१० रोजी कुर्ला ते रे रोड दरम्यान हार्बर लाइन चालू झाली होती पण त्यात मुख्य त्रुटी म्हणजे ही लाइन रे रोड पर्यन्तच होती, व्हिटी स्थानकाला जोडली नव्हती आणि विद्युतीकरणसुद्धा झाले नव्हते. तोपर्यंत प्रवाशांना रे रोड पासून बोरीबंदर अर्थात व्हिटीपर्यन्त अंतर कापण्यास याच ट्रॅम वापराव्या लागत. ३१ वर्षांत ससून डॉक, म्युझियम, वाडीबंदर, मध्य मुंबईत लालबाग, जेकब सर्कल, ताडदेव, ओपेरा हाऊस, ग्रॅंट रोड, जे.जे.हॉस्पिटल, धोबीतलाव, कर्नाक बंदर असे शहरभर ट्रॅमसेवेचे जाळे पसरले. आज जिथे माटुंग्याचे अरोरा चित्रपटगृह आहे, त्याच्यासमोर ट्रॅम संपत असे, तिथे एक अर्धवर्तुळाकार असा ट्रॅमचा मार्ग मुद्दाम ट्रॅमगाडीसाठी ठेवलेला असायचा, त्यावरून ट्रॅमचा चालक मोठ्या दिमाखाने ट्रॅम वळवून परतीच्या मार्गावर नेई आणि क्वचित आपल्या पायाखाली असलेला लोखंडी चकतीवजा टोल ठाण ठाण वाजवी. ट्रॅमच्या या नव्वद वर्षांच्या इतिहासात मुंबई झपाट्यानं बदलली. वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबरच विस्तारणाऱ्या मुंबई शहरात जलद प्रवासाच्या पर्यायाची मागणी पुढे येऊ लागली. ट्रॅमचा प्रवास वेळखाऊ आणि गैरसोईचा लोकांना वाटू लागला. ट्रॅम ताशी ५ किलोमीटर वेगाने धावत होती. शिवाय मोटारींसाठी ती अडचणीची ठरत होती. यामुळे जगभर ट्रॅमला पर्याय शोधण्याचे वारे वाहत होते. त्याऐवजी डिझेलवर चालणाऱ्या बस सेवेवर भर देण्यास सुरुवात झाली. दि.७ मे १९०७ रोजी सुरु झालेली विजेवर चालणारी ट्रॅम तारीख ३१ मार्च १९६४पासून बंद करण्यात आली आणि जलद वाहतुकीसाठी बस गाड्यांना सर्वत्र रस्ते मोकळे झाले. पण तब्बल ९० वर्षं जिव्हाळ्याची ठरलेल्या ट्रॅमला मुंबईकरांनी वाजत गाजत निरोप दिला. शेवटची ट्रॅम बोरीबंदरहून दादरला रात्री दहा वाजता निघाली. तिला निरोप द्यायला प्रचंड गर्दी झाली होती. त्यामध्ये कंटक्टर होते बी.जी.घाटे. मुंबईकरांनी या कंडक्टरचे चक्क ऑटोग्राफ घेतले. एखाद्या कंडक्टरला असा मान पहिल्यांदाच आणि कदाचित शेवटचाच मिळाला असावा. ट्रॅम बंद झाली आणि मुंबईकर हळहळला. ती अकरा नंबरची ट्रॅम तरी ठेवायला हवी होती. असं पुलं म्हणाले होते. सहा नंबरची ट्रॅम कुलाबा ते गिरगाव, फोरास रोडमार्गे धावत होती. खरंच… ट्रॅमशी मुंबईकरांचं घट्ट नातं जोडलं गेलं होतं. एकेकाळी मुंबईची लाईफलाइन असलेल्या आणि पन्नास वर्षांपूर्वी इतिहासजमा झालेल्या ट्रॅमचे ट्रॅक हुतात्मा चौक परिसरात फेब्रुवारी २०१६मध्ये खोदकाम करताना सापडले खरे, मात्र महापालिकेने नेमलेल्या कंत्राटदाराने सोमवारी सायंकाळी हे ट्रॅक सरळ उखडले. हा प्रकार पाहून मुंबईचा जीव कळवळला. हे ट्रॅक आहे तिथेच जतन होऊ शकत होते, असे पुरातत्त्व विभागाचे म्हणणे असतानाही अत्यंत निर्दयीपणे हे ट्रॅक उखडून बेस्टच्या आणिक आगारातील म्युझियममध्ये जमा करण्यात आले. जगभरात नॅरो गेजच्या ट्रॅमसेवा आहेत, तर मुंबईत सापडलेले ट्रॅमचे ट्रॅक ब्रॉड गेजचे आहेत, जे जादा वीज खर्ची करणारे आणि प्रवासी क्षमता अधिकची असणारे असावेत. ट्रामचे हे रूळ १९६४ पूर्वीच उखडले जाणे अपेक्षित होते. मात्र काही कारणाने ते तसेच राहिले आणि मातीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले, त्यावेळी ते जमिनीखाली गाडले गेले असावेत, असे मत या ठिकाणी उत्खनन करणार्या निरीक्षकाने व्यक्त केले आहे.
ब्रिटिशकालीन मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे लोकप्रिय साधन म्हणून ट्रॅम ओळखली जायची. ससून डॉकपासून थेट किंग्ज सर्कलपर्यंत पसरलेल्या या ट्रामच्या जाळ्यापकी चार रूळ नुकतेच हुतात्मा स्मारक परिसरात रस्त्याचे काम चालू असताना सापडले. मात्र मुंबईतील ट्रॅमचे जाळे लक्षात घेता असे रूळ अनेक ठिकाणी आढळू शकतात. यात ऑपेरा हाऊस, चर्नीरोड, गोल देऊळ, सीपी टँक, ताडदेव, बोरिबंदर- आत्ताचे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, जे.जे.रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आदी अनेक ठिकाणांचा समावेश आहे. येथील रस्त्यांवर खणल्यास तेथेही असे रूळ आढळू शकतात. मुंबईसारख्या शहरात सध्या वाहतुकीला पर्याय म्हणून ट्रॅम सुरू करणे शक्‍य नाही; पण ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी पुढे यायला हवे. सध्या मुंबईतील बेस्टच्या आणिक आगारात जुन्या ट्रॅमचे मॉडेल आजही पहायला मिळते, हे उल्लेखनीयच!
!! विजेवरील ट्रॅमसेवा आरंभ दिनाच्या समस्त जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

– संकलन व सुलेखन –
श्री एन. कृष्णकुमार जी. गुरूजी.
रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.