राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन

    62

    ११ मे, आजचा दिवस आपल्या देशात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात १९९९ सालापासून दरवर्षी तंत्रज्ञान विकास महामंडळ ( टी डी बी ) यांच्या नेतृत्वात हा दिवस साजरा केला जातो. ११ मे १९९८ रोजी भारताने एरोस्पेस अभियंता आणि डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या मार्गदशनाखाली राजस्थान येथील पोखरणच्या वाळवंटात शक्ती या अण्वस्त्रांच्या चाचण्या दोन टप्प्यात यशस्वी केल्या. दोन दिवसांनी म्हणजे १३ मे रोजी पुन्हा पोखरण २ ऑपरेशन शक्ती अंतर्गत आणखी दोन अण्वस्त्र चाचण्या केल्या. अण्वस्त्रांच्या या सर्व चाचण्या यशस्वी करून भारत अण्वस्त्र संपन्न राष्ट्र बनले. तेंव्हाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारत अण्वस्त्र सज्ज झाल्याचे जाहीर केले आणि करोडो भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. भारताने केलेली ही दुसरी अणूचाचणी होती. १९७४ साली भारताने पहिल्यांदा अणवस्त्रांची चाचणी केली त्यावेळी इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या. त्याच्या यशस्वितेचा संकेतांक ( कोडवर्ड ) होता द बुद्धा लाफड – बुद्ध हसला…. ११ मे १९९८ रोजी दुसऱ्या यशस्वी चाचणीचा संकेतांक होता, द बुद्धा लाफड आगेन – बुद्ध पुन्हा हसला… २४ वर्षांनंतर भारताने जमिनीखालुन प्रत्यक्ष अणुस्फोट घडवून आणून ते यशस्वी केले तेंव्हा जगातील साऱ्या देशाने तोंडात बोटे घातले मित्र राष्ट्राने कौतुक केले तर शत्रू राष्ट्राचा जळफळाट झाला. ही अणूचाचणी करताना भारताने कमालीची गुप्तता पाळली होती. अमेरिकेलाही या अणूचाचणीचा सुगावा लागला नव्हता. या अणू चाचण्यांमुळे भारत जगातील सहावे अण्वस्त्र सज्ज राष्ट्र बनले. याच काळात भारताने विकसित केलले स्वदेशी बनावटीचे पहिले विमान हंस – ३ ने त्याचे पहिले उड्डाण बंगळुरू येथे घेतले. हे विमान वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचेच्या ( सीएसआयआर ) विमान नॅशनल एरोस्पेस लॅबरोटरीज ( एनएएल ) ने विकसित केले होते. तसेच ११ मे १९९८ रोजीच संरक्षण संशोधन विकास संघटना ( डीआरडीओ ) त्रिशूल क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी पूर्ण केली गेली. कमी पल्ल्याचे पण जमिनीवरून हवेत जलद मारा करणारे त्रिशूल हे भारताच्या एकात्मिक गायडेड क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा एक भाग होता. ११ मे च्या अणूचाचणी नंतर भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात हे प्रचंड यश मिळवले होते म्हणूनच त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ११ मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून घोषित केला.

    श्याम ठाणेदार
    दौंड जिल्हा पुणे
    ९९२२५४६२९५