आभार – आदर्श गुरुजनांचे

116

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.’शिक्षक’ हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते.आपल्या गुरु, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.डॉ.राधाकृष्णन यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्‍याचा संकल्प केला.ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्‍यातही सुरूच राहिल.१९६२ मध्ये डॉ.राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेंव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती.देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले होते.शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे.भविष्यातले विचारवंत,कलाकार,लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी,डॉक्टर,प्राध्यापक,इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते.ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो,अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्‍या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात.आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात.शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो.आपल्या व्यक्तीमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार,संस्कृती,परंपरा,चालीरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात.त्यामुळे विद्यार्थ्यांनी‍ आपल्या गुरूंचा नेहमी आदर केला पाहिजे.त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
प्रत्येक माणसाला गुरु असतोच.गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही.गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे.गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही रूपं बघतो.म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये आपण गुरुला साक्षात परब्रह्म मानले आहे.तसा गुरु मला माझ्या शिक्षकांमध्ये मिळाला.माझा पहिला आणि कायमचा गुरु माझी आई.नंतरचा गुरु म्हणजे माझे शिक्षक.त्यांनी मला नुसतंच श्री ग णे शा किंवा अ आ इ ई शिकवलं नाही तर माझ्या आयुष्याचा श्रीगणेशाच त्यांनी केला.आईने मला बोलायला शिकवलं, चालायला शिकवलं तर माझ्या शालेय जीवनातील गुरुने मला लिहायला शिकवलं,वागायला शिकवलं.खरं म्हणजे शिक्षकांनी माझ्यावर चांगले संस्कार करून जगण्याची एक दृष्टीच मला दिलीय.माझ्या शिक्षकांनी मला शाळेत शिकवलेल्या पुस्तकी शिक्षणापेक्षाही महत्त्वाचं शिक्षण मला दिलेय.ते म्हणजे एक माणूस म्हणून जगण्याचं.अशा माझ्या आदर्श शिक्षकांचे आजच्या शिक्षक दिनी आभार मानणे माझे कर्तव्यच आहे.माझ्या जीवनाला आकार देणाऱ्या माझ्या सर्व प्रेरणादायी शिक्षकांचे मनस्वी (थँक्यू सर) आभार…!!!
आपल्या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे गुरु-शिष्य परंपरा.गुरुच आपणाला अज्ञानातून बाहेर काढतात.शिक्षक हे आपले गुरुच आहेत.त्यामुळे आपण शिक्षकदिनानिमित्त त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायला हवी.प्रथम आपण ‘गुरु’ या शब्दाचा अर्थसमजून घेऊया.‘गु’ म्हणजे अंधकार आणि ‘रु’ म्हणजे नाहीसा करणे.गुरु आपल्या जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे,ते आपल्याला शिकवतात.मनुष्याच्या जीवनात तीन गुरु प्रकारचे गुरु असतात.आपल्यावर निरनिराळे संस्कार करून आपल्याला समाजाशी एकरूप व्हायला शिकवणारे आई-वडील हे आपले पहिले गुरु.बालपणात आई-वडील आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवतात. योग्य काय आणि अयोग्य काय,याची जाणीव करून देतात.तसेच चांगल्या सवयी लावतात.आपल्याला अनेक गोष्टी शिकवून सर्वांगाने परिपूर्ण करणारे शिक्षक,हेच आपले दुसरे गुरु.
खरेतर आपण शिक्षकदिनी त्यांना भावपूर्ण नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यायला हवा.गुरु म्हणजे आपले शिक्षक आणि शिष्य म्हणजे आपण असतो.शिक्षक आपल्याला अनेक विषयांचे ज्ञान देतात.ते इतिहास शिकवतात.त्यातून ते आपल्यातील राष्ट्राभिमान जागृत करतात.आपण आपल्यासाठी जगायचे नसते,तर राष्ट्रासाठी जगायचे असते,हा व्यापक विचार आपल्याला देतात.भगतसिंग, राजगुरु,सुखदेव इत्यादी क्रांतीकारकांनी राष्ट्रासाठी प्राणार्पण केले,त्याप्रमाणे आपण त्याग करायला हवा.त्याग हा आपल्या जीवनाचा पाया आहे.हे आपल्याला शिक्षक सांगतात.त्यागी मुलेच राष्ट्राचे रक्षण करू शकतात.इतिहासातून आपले आदर्श ठरतात.त्यांच्याप्रमाणे आपण त्यागी असायला हवे.निरनिराळे विषय निःस्वार्थीपणे शिकवून आपल्याला प्रगतीपथावर नेणारे आपले शिक्षक असतात.शिक्षक आपल्याला मराठी भाषा शिकवतात.त्यामधून ते आपल्यामध्ये मातृभाषेचा अभिमान जागृत करतात आणि रामायण,महाभारत,दासबोध अशा ग्रंथांचा अभ्यास करण्याची आवडही निर्माण करतात.यातून ते आपल्याला आपल्या संतांची ओळख करून देतात आणि त्यांच्यासारखे आपण घडावे यासाठी प्रयत्न करतात.तसेच ते आपल्याला समाजशास्त्र,अर्थशास्त्र यांसारखे विषयही शिकवतात.यातून आपण ज्या समाजात रहातो,त्या समाजाचे ऋण आपल्यावर असते,याची जाणीव शिक्षक आपल्याला करून देतात.अर्थशास्त्रातून योग्य मार्गाने (धर्माने) पैसा मिळवावा आणि अयोग्य मार्गाने (अधर्माने) पैसा मिळवू नये,हे शिकवतात.अशा महान शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन होय.
तिसरे गुरु म्हणजे आध्यात्मिक गुरु.प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात गुरु येतात.जसे श्रीकृष्ण-अर्जुन,श्री रामकृष्ण परमहंस-स्वामी विवेकानंद,समर्थ रामदासस्वामी-शिवाजी महाराज अशी गुरु-शिष्य परंपरा हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे.आध्यात्मिक गुरु आपल्याला आपली खरी ओळख करून देतात.आपण आपल्या जीवनाला प्रार्थना,कृतज्ञता आणि नामजप यांची जोड द्यायला हवी.आपण कोणतेही काम हातात घेतले की,प्रथम कृतज्ञता व्यक्त करावी. तसेच ती कृती चांगली व्हावी,म्हणून प्रार्थना करावी.आपल्यावर गुरूंची कृपा व्हावी,म्हणून प्रतिदिन आपल्या हातून घडणार्‍या चुकांची नोंद करावी आणि त्यामागील दोष शोधावा.यामुळे आपले दोष लवकर जातील अन् आपण आनंदी होऊ.आता आपण गुरुंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया आणि आपल्याला समजलेली सर्वच सूत्रे आमच्या कृतीत येऊ देत,अशी प्रार्थना करूया.
कृतज्ञता म्हणजे लोकांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची जाण ठेवून जेंव्हा केंव्हा शक्य होईल तेंव्हा त्याची परतफेड करणे किंवा आभार मानणे.थॅंक यू किंवा आभारी आहे हे शब्द कृतज्ञता व्यक्त करणारे आहे.कृतज्ञता ही भावना नसून मनाची अशी अवस्था आहे,ज्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रचंड साठा आहे.या जगात चांगुलपणा आहे तो कृतज्ञतेमुळेच.कृतज्ञता व्यक्त करणारे लोक नेहमी आनंदी असतात.ते जास्त
आशावादी,उत्साही,निश्चयी असतात इतकंच नाही तर त्यांचं एकूण मानसिक आरोग्यही उच्च प्रतीचं असतं.कृतज्ञता बाळगली की सकारत्मकता वाढते.समस्यांना तोंड देतांना मन सकारात्मक असेल तर विधायक उपाय सुचतात.कृतज्ञतेच्या जाणिवेमुळे किती तरी नकारात्मक विचारांवर- भावनांवर सहज मात करता येते.जीवन जगत असतांना पदोपदी आपल्याला इतरांची मदत मिळत असते.त्यामुळे कृतज्ञता हा आपला अंतर्भूत गुण व्हायला पाहिजे. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आपल्याला इतरांची मदत मिळत असते जसे की बालपणी आईवडील,विद्यार्थीदशेत शिक्षक,तरुणपणी पतिपत्नी, मित्रमंडळ,म्हातारपणी आपली मुलेबाळे,समाज तसेच आपल्याला सदैव मदत करणारा निसर्ग यांच्या सर्वांच्या सहकार्यानेच तर आपण आपले संपूर्ण आयुष्य यशस्वीपणे जगत असतो.
ज्या सृष्टीने,निसर्गाने,ईश्वराने आपल्याला जन्म देऊन पालन पोषण केले त्यांच्याप्रती अर्पणभाव,कृतज्ञता आपल्याला व्यक्त करता आली पाहिजे.आयुष्यातल्या वाटचालीत वेगवेगळ्या वळणावर ज्यांनी आपल्याला साथ दिली त्यांचे विस्मरण होणार नाही याची खबरदारी आपण सदैव घेतली पाहिजे.रोज रात्री झोपताना पाच मिनिट तरी,आज दिवसभर ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांचे आभार मानले व ज्यांनी दिवसभरात आपल्याला त्रास दिला त्यांना क्षमा केली की मनाला भरपूर शांतता लाभते व गाढ झोप लागते. आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आवर्जून वेळ काढला पाहिजे कारण आपण आभार मानत गेलो व कृतज्ञता व्यक्त करत गेलो की आपल्यात करुणा भाव निर्माण होतात व आपला अहंकार गळून पडतो.एकमेकांबद्दल कृतज्ञेची भावना मूळ धरू लागली की नाते संबंध दृढ होतात.आयुष्याच्या प्रवासात थांबून थांबून कृतज्ञतेच्या फुलांचा सुगंध आपण अनुभवायला पाहिजे,तेंव्हाच आपले जीवन सुखकर होत असते.
मनुष्य जन्मात गुरुचं नितांत महत्व आहे.त्यांचे आभार आयुष्यभर जरी मानले तरी त्यांची उतराई होणं शक्य नाही.माता,शिक्षक आणि आध्यात्मिक गुरु.रोज आपण कित्येक नवीन व्यक्तींच्या संपर्कात येतो.पण काही व्यक्ती मात्र जीवनात अढळ स्थान पटकावतात.गुरुंचे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणासाठी आई तर कोणाला वडिल,कोणासाठी भाऊ तर कोणासाठी अंतरंगातला मित्र,कोणासाठी चॉकलेट देणारे आजोबा,तर कोणासाठी सदैव तेवत असणारा ज्ञानदिप,कोणासाठी गुरुमूर्ती तर कोणासाठी सर्वस्व असतात.अशा या आदर्श गुरुजनांचे आजच्या शिक्षकदिनानिमित्त मनापासून आभार.

✒️लेखक:-राजेंद्र लाड (आष्टी,जि.बीड)
(राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक)
मो:-९४२३१७०८८५