नाट्य नरेश ” चे सर्वेसर्वा “प्रकाश प्रधान”

94

पूर्व विदर्भ झाडीपट्टी नावाने सुपरीचित आहे. झाडे,झुडुपं,जंगलांनी नटलेला हा भुप्रदेश अनेकानेक कलागुणांनी सुसंपन्न आहे. धानाची पिके फार मोठ्या प्रमाणावर घेतली जातात या भागात . धानाची नवत्री झाली की ख-या अर्थाने शेतकरी शेतमजूराच्या राबत्या हातांना थोडाफार आराम मिळतो. हातात पैसा येतो . कष्टाने थकलेल्या , शिनलेल्या शरीराला विसावा देण्यासाठी दंडार ,खडीगंमत, तमाशा ,दुय्यम खडा तमाशा, गोंधळ ,कव्वाली ,नाटके आदी अनेकानेक मनोरंजनाच्या माध्यमांतून विरंगुळा मिळतो.

सुरवातीला बैलांच्या शर्यती म्हणजे इनामी शंकर पटांचे आयोजन केले जायचे. त्या शर्यती बघण्यासाठी सोयरेधायरे , नातेवाईक , मित्रमेळा गोळा व्हायचा. गाठीभेटी व्हायच्या . वयात आलेल्या मुलामुलींच्या सोयरीकी सुद्धा या माध्यमांतून होत असत. गावात मंडईचे आयोजन केले जायचे. मंडई म्हणजेच एक प्रकारची जत्राच. त्यात आगासपाळणे , झेंडीमुंडी सारखे मनोरंजक खेळ , भाजीपाला ,खेळण्यांची दुकाने,कपड्यांची दुकाने ,खाण्याच्या पदार्थांचे हाॕटेल , आदी विक्रेते आपली दुकाने थाटून बसतात आणि पहायला आलेली मंडळी ते खरेदी करतात. त्या निमित्ताने नाटकांचे आयोजन केले जायचे. एकेका घरात पाहुण्यांना बसायला आणि झोपायला जागा राहत नसे. अशावेळी तिन तासांच्या नाटकांपेक्षा लोकं रात्रभर चालणारी कव्वाली ,तमाशा ,गोंधळ बघणे पसंत करायचे.

काही मंडळं पुण्या ,मुंबईच्या व्यावसायिक नाटक कंपण्यांना पाचारण करायचे. त्या नाटकांचा आस्वाद घेतल्या जात असे. तथापि गावागावात ,मोहल्ल्या मोहल्ल्यात पुण्या मुंबईच्या लेखकांच्या लिखित एक स्त्री पात्री नाटकांचे आयोजन केल्या जात असत. मोहल्ल्यातील ,गावातील हौसी कलावंत त्यात भुमिका साकारायचे . स्त्री पात्र मात्र पैसे मोजून बाहेरून आणावे लागत असे. कधीकधी स्त्री कलावंत उपलब्ध नसल्यास एखाद्या पुरूषाला स्त्री वेष परिधान करावा लागत असे. त्यातून खरे कलावंत झाडीपट्टीतील गावागावात तयार झाले. नाटक सादर करायला लागले.

पंढरीनाथ प्रधान यांना हे बाळकडू त्यांचे जन्मदाते बुवाराम प्रधान यांचे कडून मिळालं होतं . ते शाळेत हायस्कुल शिक्षक होते. ते गावातील नाटकांतून भुमिकाभिनय करायचे. वडीलांनी बसवलेल्या नाटकाची महिनाभर चाललेली तालिम, त्यांनी घेतलेली मेहनत ,त्यांचा कसदार अभिनय बाळ पंढरीनाथला अगदी जवळून पाहता आला. पुढे शालेय शिक्षण घेतांना शाळेतील स्नेहसंमेलनात बालनाट्य बसवायचे. त्यात पंढरीनाथ प्रधान यांना भुमिका साकारायला मिळाल्या . इयत्ता चौथीत असतांनाच त्यांनी ” कृष्ण सुदाम्याचे पोहे “नंतर पाचवीत “घारू अण्णा ” या नाटकात ब्राम्हणाची भूमिका साकार केली होती. इयत्ता नववीला असतांना त्यांनी “मुंबईची माणसं ” या नाटकात अभिनय केला होता. या नाटकासाठी शिक्षकांकडून त्यांना कौतुकाची थाप मिळाली होती. शिक्षकांच्या ,रसिकजनांच्या ,घरच्यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांना नाटकांची आवड निर्माण झाली. आणि हा बाळ पंढरीनाथ पुढे झाडीपट्टीच्या नाट्यचळवळीत प्रकाश बुवाराम प्रधान म्हणून नावारूपास आला.

पंढरीनाथ बुवाराम प्रधान हे मुळचे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील किन्ही (बेटाळा ) या गावचे. त्यांचा जन्म 29सप्टेंबर 1967 ला किन्ही गावात झाला. त्यांचे वडील बुवाराम हे कृषक विद्यालय ,चौगान येथे शिक्षक होते. सोबत त्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय होता. पुढे पंढरीनाथांनी डि. एड. करून प्राथमिक शिक्षकाची नोकरी पत्करली . नोकरीमुळे पोटापाण्याचा प्रश्न सुटला एकदाचा .

त्यांचा नाटकाकडे कल होताच .नाटकांची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यावेळी गावागावात पुण्यामुंबईची नाटक कंपणी बोलवायचे टाळून गावागावातील स्थानिक कसलेल्या कलावंतांनी एकत्र येऊन स्वतः नाटक कंपणी सुरू केली आणि ते प्रायोगिक तत्त्वांवर पैसे घेऊन गावागावात नाटक सादर करायला लागले. छापील नाटकांचा डाकूपट तोच तो पणा टाळून स्थानिक लेखकांच्या लेखणीतून साकार झालेल्या कलाकृती रसिकांसमोर सादर करायचे. प्रकाश प्रधान यांनाही वाटायला लागलं की आपण सुद्धा अशीच एखादी नाटक कंपणी स्थापन करावी. आपण सुद्धा एखादं स्वतःचं हस्तलिखित जन्माला घालावं. त्यांनी मनाशी चंग बांधला , त्यातून सन 2007मधे त्यांनी “नाट्य नरेश रंगभूमी”ची निर्मिती केली. त्यांनी “नर्तकी घुसली घरात” या नाट्य संहितेला जन्म दिला आणि ख-या अर्थाने झाडीपट्टी नाट्य क्षेत्रातील रंगभुमीवर त्यांनी स्वतःचा झेंडा रोवला.

नाटय नरेश रंगभूमीचा प्रथम नाटयप्रयोग पारडी (गायमुख ) दिनांक 14/1/1999 ला सादर झाला. ही ख-या अर्थाने नाट्य नरेशाच्या यशाची नांदी होती.
नाट्य क्षेत्रात त्यांनी पंढरीनाथ हे नाव न ठेवता प्रकाश नाव धारण केले. युसुफ खानने दिलिपकुमार नाव धारण करावे तसे. चित्रपट सृष्टीतील नाव बदलण्याचा ट्रेंड त्यांनी झाडीपट्टीत आणला त्यात काय वावगं ?
अगदी सुरवातीलाच त्यांनी निर्माता आणि लेखक ह्या महत्वपूर्ण भूमिका अत्यंत जबाबदारीने स्विकारल्या.
केवळ एवढ्यावरच त्यांनी समाधान मानले नाही तर अंगातील ज्या अभिनय कुशलतेने त्यांना नाट्यक्षेत्रात पाऊल टाकायला भाग पाडले होते . त्यासाठी त्यांनी स्वतः प्रमुख भुमिका सुद्धा साकारायला सुरवात केली. यामागे त्यांचे अनेक उद्देश होते. अंगात एक्टिंगचा किडा वळवळत असतांना ते स्वस्थ कसे बसणार ? दुस-या कलावंताला संधी देऊन त्याला पैसे सुद्धा मोजावे लागले असते. त्यामुळे त्यांची बचत सुद्धा झाली. एखादे वेळेस प्रयोगाचे शेपाचशे हजार रूपये कमी मिळाले तरी त्यांच्या हाडावर चोट बसत नव्हती.

प्रा राम दोनाडकर, प्रकाश प्रधान , नरेश गडेकर, विनोद राऊत, किरपाल सयाम, विलास विटी ,अरविंद झाडे ,पद्मा जयस्वाल , रागिणी बिडकर, मनोज देशमुख ,हरीराम गजपूरे हे दिग्गज रंगकर्मी अगदी सुरवातीच्या काळात नाट्य नरेश रंगभूमीचे शिलेदार होते. झाडीपट्टीच्या नाट्यपंढरीत अनेक शिक्षक ,प्राध्यापक ,डॉक्टर,वकील किंवा इतर नोकरदार , व्यावसायिक स्वतःचे कर्तव्य चोख बजातात. स्वतःचा संसार सांभाळून नाटकाचा संसार नेटका करतात. अनेक सुशिक्षीत बेरोजगारांना ,शेतकरी ,शेतमजूरांना रोजगार उपलब्ध करून देणारी झाडीपट्टीतील नाटकांमुळे “झाडीवुड ” दिडशे वर्षांपासून स्वतःचे अस्तित्व कायम टिकवून आहे.

पंढरीनाथ बुवाराम प्रधान हे प्राथमिक शिक्षक आहेत. दि. 25/06/ 1997 पासून त्यांनी सावरगाव (पान्होळी), चिचगाव (गांगलवाडी ) , रानबोथली आदी खेड्यांमधे विद्यादानाचे पवित्र कार्य ते आजतागायत करतात आहेत. विद्यादानासोबतच समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून त्यांनी नाटकाची निवड केली.

नाटकांमुळे शाळेवर परिणामतः विद्यार्थ्यांच्या अध्यापनाकडे दुर्लक्ष होणार नाही याकडे त्यांनी विशेष काळजी घेतली. साधारणतः शनिवार,रविवारला नाटकांच्या तारखा बुकिंग व्हाव्यात याकडे ते जास्त प्रधान्य देतात. ते हल्ली राहत असलेले ब्रम्हपुरी शहर आणि झाडीवुडचे प्रमुख केंद्रस्थान “वडसा -देसाईगंज ” हि शहरं अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. शिवाय त्यांची कर्मभुमी अर्थात नोकरीची गावेसुद्धा हाकेच्या अंतरावरच. त्यामुळे त्यांना नाटक संपले की येतांना प्रवासात आवश्यक तेवढी झोप घेवून दहा वाजता कर्तव्यावर उपस्थित राहण्यासाठी फार अडचणींचा सामना करावा लागत नसे. एखाद्या वेळेस जेव्हा लांब अंतरावर नाटकासाठी प्रवास करावा लागत असे . अशा संभाव्य परिस्थितीत त्यांना रजा मंजूर करून जावे लागत असे. अशा परिस्थितीला फार कमी वेळेला सामोरे जावे लागते कारण त्यांच्या नाटकांचे बुकिंग हे 100 किमी.अंतराच्या आसपासच होत असतात.

त्यांनी आजपर्यंत आठ नाटकांचे लेखन केले. त्यात प्रामुख्याने “भाऊबिज अर्थात हा खेळ संसाराचा ,कुलदीपक,नवरे गेले संपावर, भडका, वाट चुकलेली बायको, शपथ तुझ्या प्रेमाची “,अगदी आत्ता लाकडाऊनच्या काळात नाटके होणार की नाही आशी परिस्थिती असतांना देखील मिळालेल्या वेळेचा सद्उपयोग करत “वारस “नावाच्या नाटकाचे लेखन केले.
त्यांनी आपल्या नाट्यनरेश रंगभूमीच्या माध्यमातून झाडीपट्टीच्या अनेक दिग्गज कलावंतांना संधी दिली.

त्यात सिने. राजा चिटणीस ,सिने. अनिरूद्ध वनकर , सिने. देवेंद्र दोडके, प्रा. राम दोनाडकर , स्व. मानिक शिंदे , स्व. कमलाकर बोरकर , किरण बळिद , सुदेश बळिद ,संजू (मामा) भुरके , शेखर पटले , गुणवंत घटवाईक नागपूर ,दादा सुंदरकर ,वामन बावणे ,कविश कावळे ,अंबादास कामडी , अनिल नाकतोडे , के .आत्मराम , नरेश गडेकर आदी पुरूष कलावंत तर सुवर्णा नरवडे, वनमाला बागुल ,किर्ती मानकर , एस . के. शिला (सहारे) ,आसावरी तिडके ,सुप्रिया वालदे , विदया कोरे आदी स्त्री कलावंतांचा समावेश आहे. सोबतच अनेक जुने जाणते तथा नवीन कलावंतांनी देखील नाट्य नरेश रंगभूमीवर अभिनयाचा कस लावला.

“झाडीचा हिरा – हिरालाल पेंटर “यांना त्यांनी विनोदी कलावंत म्हणून एकवीस रूपये मानधन देऊन डोंगरगाव (हलबी) येथील नाटकासाठी रंगमंचावर आणले होते.

नाट्य नरेश रंगभूमी ,वडसा आपल्या चार महिन्याच्या काळात साधारणतः 40ते 45नाट्य प्रयोगांचा व्यावसाय करते. त्यात दरवर्षी हमखास प्रयोग बुकिंग करणारे नऊ -दहा मंडळ आहेत .
रसिकांच्या पसंतीचा भाग म्हणून डांस हंगामा आणि नाट्य प्रयोग यांचे वडसा ते आयोजक गावाचे अंतर बघून 45ते 55 हजारापर्यंत फिक्स करतात.

लबरेचदा आयोजक मंडळांचे तिकीट बुकिंग कमी झाले तर ठरवलेल्या रकमेत हजार दोन हजाराची सूट मागतात . त्यामुळे स्थानिक परिस्थिती बघून आणि आपले स्नेहबंध टिकून राहावे यासाठी ते पैशांसाठी फार घासाघीस करत बसत नाहीत. ठरलेली रक्कम आयोजक मंडळाकडून नाटक संपल्यानंतर मिळेल की नाही अशी शास्वती निर्मात्यास राहत नसल्यामुळे किंवा पूर्वानुभवावरून नाटकाचे दोन अंक संपले की निर्माता किंवा त्यांनी नेमलेला मॕनेजर आयोजकांकडून पैसा वसूल करतात. कमी पैसा मिळाला की त्याची झळ एकटा निर्माता सोसत नाही तर कलावंत, नेपत्थ्य , साऊंड सिस्टीम यांनाही सोसावी लागते. त्यांना ठरलेल्या रकमेपेक्षा कमी मानधनावर समाधान मानावे लागते. प्रकाश प्रधान यांनाही अशा परिस्थितीत कलावंतांच्या मानधनात कपात करावी लागते.

झाडीपट्टीत सिनेसृष्टीच्या अनेक कलावंतांनी हजेरी लावली आहे . लावतात आहेत . त्यात अभिनेते मोहन जोशी,रमेश भाटकर,मकरंद अनासपूरे आदी अनेक दिग्गज अभिनेते अनेक व्यावसायिक नाटक कंपण्यांतून झाडीपट्टी रंगभूमीवर आले. परंतु यासारख्या सिनेनटांना आपल्या नाट्य नरेश रंगभूमीच्या बॕनरखाली आणावं असं प्रकाश प्रधान यांना कधीच वाटलं नाही.
नाटक किती दमदार आहे यापेक्षा आयोजक मंडळ किती दमदार आहे यावर देखील नाटकांची बुकिंग अवलंबून असते. यावर त्यांचा प्रचंड विश्वास आहे. एकदा एका गावामध्ये दोन मंडळांनी दोन नाटकांचे आयोजन केले. त्यात नाट्य नरेशचा “शपथ तुझ्या प्रेमाची ” नाटकाचा प्रयोग होता, पलिकडच्या मंडळात झाडीपट्टीचे दमदार कलावंत होते.

काही नागपूरचे सिनेस्टार होते. पण त्यांच्या नाटकाची बुकिंग आठ हजार तर नाट्य नरेशच्या नाटकाची बुकिंग लाखाच्या आसपास होती. असा प्रधानांचा अनुभव आहे. एक दोन नागपूर किंवा पुण्या मुंबईचे कलावंत आणि बाकीची झाडीच्या परिसरातील कलावंत मंडळी घेऊन नाट्य नरेश आपली टिम सज्ज करतो. सध्या नाट्य नरेश रंगभूमी किरण बळीद ,सुदेशकुमार ,संजुमामा ,दिनेश कोटलवार ,हरीश वाळके , हेमंत बोरकर शिला सहारे , पुजा दहीवले, वैषणवी , कितीँ मानकर, विदया कोरे , प्रकाश प्रधान या आघाडीच्या दमदार कलावंतांना सोबतीला घेऊन रंगभूमीच्या सेवार्थ सज्ज आहे.

काही कलावंतांना आगाऊ रक्कम देऊन करारबद्ध करून घ्यावे लागते. जेणेकरून वेळेवर धावाधाव होणार नाही. कार्यक्रमाच्या दिवशी साधारणतः पाच वाजतापर्यंत सर्व टिम नाट्य नरेशच्या कार्यालयात हजर होते. साडेपाच पर्यंत सर्व सोपस्कर आटोपून नाटकासाठी रवाना होतात. “वेळेआधी ,सावकाश आणि बिनघोर पोहचणे” हे नाट्य नरेशचे ब्रीद आहे.

एकदा गोंडपिंपरी तालुक्यातील धानापूर येथे पोहचतांना रस्ता भटकला आणि साडे दहा वाजले तरी कलावंत पोहचले नाही म्हणून आयोजक तणावात आले. तेव्हा डान्स धमाका असल्यामुळे लोकांचे मनोरंजन झाले . नाहीतर जन आक्रोशाला सामोरे जावे लागले असते. असे प्रकाश प्रधान सांगतात.
एका प्रयोगाकरीता अगदी वेळेवर एका स्त्री कलावंताने दगा दिला. ऐनवेळी त्यांना वाहन न मिळाल्याचा बहाणा समोर आणला. मग काय. ऐन वेळेवर कुठून आणणार स्त्री कलावंत ? त्यावेळी भांबावून न जाता स्वतः लेखक , दिग्दर्शक असल्यामुळे प्रकाश प्रधान यांनी मुळ कथानकात बदल न करता चार ऐवजी केवळ तिन स्त्री पात्रांतून नाटक प्रेक्षकांसमोर उभे केले. हा बदल केवळ झाडीपट्टीचे कलावंतच करू शकतात. असे प्रधान आत्मविश्वासाने सांगतात.

पूर्वी झाडीपट्टी कलावंतांना मान होता , सन्मानही होता. परंतु वाढत्या व्यावसायिकते मुळे कलावंतांना मान सन्मान मिळत नाही. एखादे आयोजक मंडळ पैसे देऊन गावात नाट्य प्रयोग आणतो. म्हणजे आपण कलाकारांना विकत आणलो.अशा अविर्भावात असतात. आपल्या मनाप्रमाणे नाटक झालं पाहिजे . आपण देऊ तेवढे शापैसे त्यांनी घेतले पाहिजे. असे त्यांना वाटते. ही खंत ही प्रकाश प्रधान बोलून दाखवतात. नाट्य नरेश रंगभूमीने चंद्रपूर ,भंडारा,गडचिरोली ,गोंदिया तसेच यवतमाळ जिल्ह्यात तसेच आंध्रप्रदेशातील काही गावांमधेही नाट्य प्रयोग सादर केलेत. रसिकांच्या उदंड प्रतिसादात त्यांच्या नाटकांचे अनेक प्रयोग झालेत. “हा खेळ संसाराचा ” या नाटकाने दिडशेहून अधिक प्रयोगांचा उच्चांक गाठला.

प्रकाश प्रधान यांच्यात जसा हाडाचा शिक्षक आहे. तसाच हाडाचा नाट्य चळवळीला वाहून घेणारा जिंदादिल कलावंत आहे. त्यांच्या लेखनीची दखल अनेक स्तरातून घेण्यात आली. त्यांच्यातील कलावंत ,नाटककाराला अनेक पुरस्कारांनी महाराष्ट्रासह गोवा राज्यातही सन्मानित करण्यात आले आहे. भारत कला ज्योती पुरस्कार 2017 मुंबई , इंटरनॅशनल शिरोमणी पुरस्कार गोवा 2017 , सरस्वती साहित्यरत्न पुरस्कार 2017, पुणे महागुरू द्रोणाचार्य कला गौरव पुरस्कार 2019 आदी एकूण सतरा महत्त्वाच्या पुरस्कारांवर त्यांनी मोहर उमटवली.

त्यांचा हा नाट्यप्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. निर्माता ,लेखक,दिग्दर्शक ,कलावंत यासारख्या विविधांगी भुमिकांचे शिवधनुष्य ते लिलया पेलतात. यासाठी त्यांचे सहकारी कलावंत , नेपत्थ्यकार ,ध्वनी व प्रकाश योजनाकार ,संगीतकार ,त्याच प्रमाणे त्यांचे कुटुंबीय यांचे मोलाचे सहकार्य लाभते. नाट्य नरेशच्या सर्वेसर्वा असलेल्या या जिंदादिल कलावंताच्या नाट्य प्रवासासाठी उदंड शुभेच्छा.
******************
✒️लेखक:-रोशनकुमार शामजी पिलेवान (मु.पो. पिंपळगाव भोसले ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर पिन 441206
मो.7798509816