हिंगोली,परभणी, जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुच

38

🔹पाऊस उघडीप देत नसल्याने खरीप हंगामावरील ओल्या दुष्काळाचे सावट

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

हिंगोली(दि.13ऑक्टोबर):-परभणी जिल्ह्यात रविवारी (ता.१२) सकाळी नऊनंतर उघडीप दिल्यानंतर दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास अनेक मंडळांमध्ये ढगांच्या गडगडात पावसास सुरुवात झाली.

अनेक मंडळांमध्ये जोरदार पावसामुळे शेतामध्ये कापून ठेवलेले सोयाबीन पाण्यावर तरंगत होते.फुटलेल्या बोंडातील कापूस लोंबकळत होता. पाऊस सुरुच असल्याने जमिनीचा निचरा होत नाही.नाले, ओढे, नद्या काठच्या जमिनी चिभडल्या आहेत. मूळकुज, शेंगांना तसेच कापसातील सरकीला मोड फुटले आहेत.परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला.

बोरी, चारठाणा, वाघी धानोरा (ता.जिंतूर), देऊळगाव गात (ता.सेलू), हादगाव, कासापुरी (ता.पाथरी) या तीन मंडळांत अतिवृष्टी झाली.परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, गंगाखेड, सोनपेठ, पालम, पूर्णा तालुक्यातील अनेक मंडळांत पावसाचा जोर होता. हिंगोली जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यातील मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. हयातनगर (ता.वसमत), औंढा नागनाथ, येळेगाव, जवळा बाजार (ता.औंढानागनाथ) या चार मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे जमिनी खरडून गेल्या. सोयाबीन, कपाशी, हळद आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.