राजुरा,कोरपना,जिवती आणि गोंडपिपरी तालुक्यात वादळी पावसाने नुकसान

27

🔹शेतकर्‍यांच्या शेताचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी – अँड. वामनराव चटप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

जिवती(दि.15ऑक्टोबर):-अतिवृष्टी, सोसाट्याचा व वादळी वारा यामुळे शेती बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये हेक्टर प्रमाणे आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते ऍड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मा. मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे.
गेल्या पंधरा दिवसात राजुरा,कोरपना,जिवती व गोंडपीपरी या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे व वादळी वाऱ्यामुळे कापूस,सोयाबीन व धान या उभ्या पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.

धानाची पिके संपूर्ण धाराशाही झाली असून कापलेल्या सोयाबीनला कोंब फुटण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तसेच उभ्या असलेल्या सोयाबीनच्या पिकालाही कोंब येणे सुरू झाले आहे. कापूस पिकाची खालच्या भागातील बोंडे काळी झाली असून फुटलेला कापूस खराब झाला आहे. वाकलेल्या कपाशीच्या झाडांतील कापसाची प्रत घसरून ती पिवळी पडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे कापूस,धान व सोयाबीन उत्पादक शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे.खरीप पिक कापणीच्या आणि कापूस वेचणीच्या नेमक्या वेळेवर शेतकऱ्यांवर ही नैसर्गिक आपत्ती कोसळल्याने शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे.

आधीच थकीत असलेल्या कर्जामुळे व यावर्षी कमी उगवण झालेल्या बियाण्यांमुळे शेतकरी निराशेच्या गर्तेत असतांना पुन्हा हे अस्मानी संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांनी शेतीत आवश्यक तो सर्व खर्च कर्ज व उधार करून पिकांची जोपासणा केली आहे. १९१७-१८ सालापासूनचे सहकारी बँक, सोसायट्या यांचे कर्ज रूपांतरित न झाल्यामुळे यावर्षी त्यांना कर्जमाफीचा व शेती करण्यास लाभ मिळालेला नाही. अशा शेतकऱ्यांनी बाजारातून सावकारांकडून व्याजदराने कर्ज घेऊन शेती उभी केली आहे आणि आज सर्वत्र अतिवृष्टी,वादळी वारा या नैसर्गिक आपत्तीमुळे,अस्मानी संकटामुळे शेतकरी प्रचंड मेटाकुटीला आला आहे.

यामुळे शेतीवर जगणार्‍या माणसांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्य पसरले आहे. शासनाची मिळणारी अनुदानाची राशी दिनांक ११ सप्टेंबर २०२० च्या जीआर नुसार दोन हेक्टर ची मर्यादा एक हेक्टर केल्यामुळे ती मदत २०४०० रुपये मिळणार आहे. ही प्रचंड पोकळी असून ती हेक्टरी २५ हजार रुपये करून दिनांक १३ मे २०१५ च्या जीआर प्रमाणे दोन हेक्टरला देय करणे गरजेचे आहे. कारण शेतकऱ्यांना तातडीने रब्बी हंगामाची पेरणी करणे गरजेचे आहे. अन्यथा तो रब्बीची पेरणी करण्यात असमर्थ राहील. म्हणून शासनाने अशा संकटाच्या प्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी ताठपणे उभे राहणे गरजेचे आहे.

गेल्या तीन वर्षापासून दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे शेतीपंपाची वीज बिल कायमचे संपविणे गरजेचे आहे. खास बाब म्हणून अशा अतिवृष्टी झालेल्या व पूरबाधित शेतकऱ्यांचे कर्ज ही माफ करण्याची गरज आहे. तसेच खास बाब म्हणून रब्बी हंगामाकरिता कर्जही उभे करून देण्याची गरज आहे शिवाय अनुदानावर रब्बी गहू,करडी,चना यांचे बियाणे उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या कठीण परिस्थितीत शेतकरी व शेतीवर जगणारा माणूस सन्मानाने उभे राहण्या करता सरकारने सर्वतोपरी मदत करण्याची गरज आहे.

या सर्व नुकसान झालेल्या भागाची तीन दिवस प्रत्यक्ष पाहणी माजी आमदार ऍड.वामनराव चटप यांनी केली. राजुरा, कोरपना,जिवती व गोंडपीपरी तालुक्यातील कोळशी खुर्द,झोटिंग, कातलाबोडी, कुसळ,पिपरी,गणेश मोड, भुरकुंडा बुद्रुक, खडकी, रायपुर कलगुडी,दमपूर मौहदा,पुडीयाल मोहदा,कुंभेझरी, चिंचबोडी, भेंडाळा,भुरकुंडा बु.,व खुर्द,बोरगाव,भुरकुंडा खुर्द,तोहागाव यासह अनेक गावांचा दोन दिवस दौरा करीत कापूस,सोयाबीन, धान या पिकांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली.

शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये प्रमाणे मदत देण्यात यावी, खास बाब म्हणून या सर्व शेतकऱ्यांचे थकीत कर्ज संपविण्यात यावे, शेतीपंपाचे थकीत वीजबिल संपविण्यात यावे, रब्बी करिता कर्ज देण्याची व्यवस्था करावी,पेरणीकरिता गहू, चना,करडी इत्यादी बियाणे अनुदानावर उपलब्ध करून द्यावी आणि सध्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सर्पदंशाने मृत्युमुखी पडलेल्याची संख्या सतत वाढत असून साप हा वन्य प्राणी असल्यामुळे इतर प्राण्यांप्रमाणेच आर्थिक मदत देण्यात यावी.

अशा मागण्यांचे निवेदन मा.जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मा. महसूल मंत्री,मा. गृहमंत्री यांना शेतकरी संघटनेच्या वतीने माजी आमदार ऍड.वामनराव चटप,ऍड.मुरलीधर देवाळकर, प्रभाकर दिवे,अरुण नवले, निळकंठ कोरांगे, प्रा.ज्योत्स्ना मोहितकर,पौर्णिमा निरांजने, तेजस्विनी कावळे,सिंधू बारसिंगे,सुधा शिडाम,चंद्रकला ढवस,ऍड.शरद कारेकर, ऍड.श्रीनिवास मुसळे,रमाकांत मालेकर,बंडू राजूरकर,शेषराव बोन्डे,प्रभाकर ढवस,दिलीप देठे,रमेश नळे,नरेंद्र काकडे, सुधीर सातपुते,रुपेश वानखडे, डॉ.संजय लोहे,तुुकेश वानोडेे, प्रा.निळकंठ गौरकर,व्यंकटेश मल्लेलवार,राजेश कवठे,मदन खामनकर,रमेश घुडसे,पांडुरंग भोयर,सय्यद इस्माईल, सय्यद शब्बीर जागीरदार तालुका प्रमुख जिवती, देविदास वारे, नरसिंग हासणे, श्रीपती सोडनार, उध्दव गोतावळे, रूखमाबाई राठोड, मुन्नी परवीन, मालनबाई दुर्गे,ऍड.प्रफुल आस्वले,कपिल ईद्दे,मधुकर चिंचोलकर,आनंद खर्डीवार, नितेश झाडे,कमलाबाई चांदेकर, डॉ.गंगाधर बोढे,कवडू पाटील पोटे,नारायण गड्डमवार,आबाजी ढवस,संजय करमनकर,सविता काळे,प्रवीण गुंडावार,सुदाम राठोड,मदन सातपुते,रवी गोखरे, जीवन आमने,मुन्नाभाई शेख, सुभाष गोनपल्लीवर,आनंदराव झाडे,सुधीर फुलझेले,सत्यवान आत्राम यांनी दिले आहे.