गेला कोरोनाचा मढा, केला बालोत्सवाचा चोळामोळा

27

🔹दि.७ ते १४ नोव्हेंबर – बालक दिन सप्ताह विशेष लेख..

भारत देशात बालकांना भावी उज्ज्वल राष्ट्राचे आधारस्तंभ मानण्यात येते. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवशी दरवर्षी १४ नोव्हेंबरला ‘बालक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. पंडित नेहरूंना मुलांविषयी खुप प्रेम व जिव्हाळा होता. त्यांच्या या भावनांचा आदर व्यक्त करण्याचा हा राजमार्ग आहे. बालकांना आपल्या जीवनात बालपणाचा आनंद लुटण्याचा, मौजमस्ती करण्याचा व शिक्षण घेण्याचा हक्क आहे. पुढे या मुलांमधूनच देशाचे भावी सुशिक्षित आणि मनाने व शरीराने आरोग्यसंपन्न नागरिक तयार होणे अगत्याचे ठरते.

हा हक्क मिळालेल्या आपल्या नशिबवान मुलांनी आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेण्याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. पालकांनी ही जाणीव आपल्या मुलांच्या व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात बिंबविल्यास ते नक्कीच समजूतदार व सुज्ञ नागरिक निपजतील. शिवाय कायमचे उपेक्षित व नकारात्मक जगणे वाट्याला आलेल्या एखाद्या दुर्दैवी बालकालाही आपल्या या प्रयत्नांमुळे चांगले आयुष्य मिळू शकेल. बालक दिन सप्ताह साजरा करतांना आपण चाचा नेहरूंचे त्यामागील विचार समजून घ्यायला हवेत. मुलांमुलींना सुरक्षित आणि प्रेमळ वातावरणात वाढविले पाहिजे.

त्यांना आपले आयुष्य फुलविण्याच्या आणि पर्यायाने देशाच्या उन्नतीत भर घालण्याच्या समान संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. बालदिनाच्या निमित्ताने आपणापैकी प्रत्येकाला मुलांच्या कल्याणासाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून वचनबद्धतेची आठवण होत राहावी, असे वाटते.
यावर्षी कोरोनाच्या जीवघेण्या थैमानामुळे शाळा मागील आठ महिन्यांपासून बंद आहेत. त्या अद्यापही उघडण्यात आलेल्या नाहीत. महाराष्ट्रातील सर्व शाळांनी ‘बालदिन सप्ताह’ पाळावा. तो दि.७ ते १४ नोव्हेंबर २०२० पर्यंत बाल उत्साह वृद्धिंगत करणाऱ्या विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात यावा, असा शासन आदेश निर्गमित झाला होता.

आता तर ऑनलाइन व विविध हिकमतीने चालू असलेल्या शिक्षणास दिवाळीची दीर्घ सुट्टी दिलेली आहे. त्यामुळे सदर सप्ताह हा विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविणारा कसा ठरेल? कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून शिक्षकांनाही विविध कोरोना प्रतिबंधक कामगिरीवर धाडण्यात येत आहे. त्यांची हक्काची दीर्घ उन्हाळी सुट्टीही रद्द करण्यात आली. त्यामुळे तेही ही कामगिरी व शैक्षणिक कार्य अशा दोन्ही भूमिकेमुळे कंटाळले आहेत. त्यांनाही ‘आता थोडी उसंत मिळावी’ असे वाटणे साहजिकच आहे. दि.७ नोव्हेंबर १९०० ला विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता.

तोच त्यांचा शाळाप्रवेश दिन ‘महाराष्ट्र विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. तो जोडून यंदा दि.१४ नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण आठवडाच बालकांना समर्पित करण्याचा हा मानस सराहनीय आहे. मात्र म्हणतात ना, ‘नकटीचे लग्न अन् सतराशे विघ्न!’ तशी परिस्थिती उद्भवली आहे. बालकांचे शिक्षण हक्कही या विघ्नसंतोषी कोरोनाच्या साडेसातीने हिसकावून घेतले आहे. त्याला कोणतरी काय करणार म्हणा!जागतिक पातळीवर दरवर्षी २० नोव्हेंबरला ‘बालक दिन’ अर्थात चिल्ड्रेन्स डे साजरा होत असतो. इ.स.१९५९ पूर्वी तो ऑक्टोबर महिन्यात साजरा केला जात असे. छोट्या मुलांमुलींमध्ये सांप्रदायिक विचारांचे आदानप्रदान व विविध संप्रदाय वा धर्मांबद्दलचे सामंजस्य वाढावे.

तद्वतच बालक दिन साजरा करण्यामुळे जगभरातल्या बालकांचे जीवनमान अधिक चांगले बनविण्याची संकल्पना रुजावी, असाही शुद्ध हेतू होता. २० नोव्हेंबर हीच तारीख निवडण्याचे कारण असे की इ.स.१९५९ मध्ये याच तारखेस संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने बालहक्कांची सनद म्हणजेच डिक्लेरेशन ऑफ चिल्ड्रेन्स राईट्स स्वीकारली होती. या शिवाय याच दिवशी बालहक्कांच्या मसुद्यावर स्वाक्षऱ्या झाल्या. हे हक्क आजवर १९१ हून अधिक राष्ट्रांनी मान्य केले आहेत, हे उल्लेखनीच! जगभर सर्वात पहिला बालदिन ऑक्टोबर १९५४ मध्ये साजरा झाला होता. त्यानंतर महासभेने ठरविल्याप्रमाणे तो इ.स.१९५९ पासून नियमितपणे २० नोव्हेंबर रोजी साजरा केला जात आहे.

पंडित नेहरूंचे दि.२७ मे १९६४ रोजी देहावसान झाले. त्यानंतर भारतात तो दि.१४ नोव्हेंबर १९६४ पासून चाचा नेहरूंच्या मृत्युपश्चात लगेच साजरा होऊ लागला आहे. दरवर्षी बालकदिन निमित्ताने शाळेत आकाशकंदील, रांगोळीचे रंग, पतंग तयार करणे, ओल्या मातीपासून पुतळे व गडकिल्ले उभारणे, वर्गसजावट व विविध शोभेच्या वस्तू तयार करणे, रांगोळी, चित्रकला स्पर्धा व बाल आनंद मेळावा आयोजित करणे आदी उपक्रम राबविण्यात येत होते. मात्र यंदा सन २०२० मध्ये कोरोनाचा मढा गेला अन् शाळा बंद पडल्या. त्यामुळे बालकांच्या महत्वाच्या शिक्षणहक्कावर पानी फिरले व शिक्षणाची दैनावस्था झाली.

मग कसेबसे शिकक्षवर्गाने नाना उपाय योजून ‘फूल नाहीतर फुलाची पाकळी’ म्हणत शिक्षण सुरू ठेवले. यात सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेता आले नाही, याची खंत मात्र त्यांना आजीवन वाटत राहिल. महाघातकी, कपटी, कारस्थानी, महापापी कोरोना कधी माघार घेईल? याच काळजीने सर्वांना काजळून-काळवंडून टाकले आहे. आता ‘बालक दिन सप्ताह’ साजरा करण्यात पालकांनीच मोलाचा वाटा उचलण्याची नितांत गरज आहे. ते आपल्या लाडक्या पाल्याच्या उन्नती-उत्कर्षासाठी पर्यायाने राष्ट्र कल्याणासाठी ही हमीही लीलया पेलतील अशी अपेक्षा करुया! सर्व बालकांना बालक दिन सप्ताहाच्या गोड गोड शुभेच्छा..!!

✒️लेखक:-श्री कृ. गो. निकोडे गुरुजी,
[ मराठी साहित्यिक व शैक्षणिक विचारवंत ]
मु. पोटेगावरोड, पॉवर हाऊसच्या मागे,
रामनगर, गडचिरोली
ता. जि. गडचिरोली.
मो:-७४१४९८३३३९.
e-mail – krishnadas.nirankari@gmail.com