दिवाळी सण साधेपणाने साजरे करा-जिल्हाधिकारी दीपक सिंगला

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.11नोव्हेंबर):-आपले कुटुंब तसेच स्वतःची काळजी घेऊन सामाजिक अंतर ठेवून येणारा दिवाळी सण साजरा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केली आहे. शासन निर्देशाप्रमाणे कोविड – 19 साथरोग अंतर्गत गडचिरोली जिल्हात दिवाळी सण साजरा करणेसंबंधी शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हािदंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, दीपक सिंगला, गडचिरोली यांनी अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी दिली आहे.

दिपावली उत्सव कोविड कालावधीत साजऱ्या केलेल्या अन्य उत्सवांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करावा. राज्यातील धार्मिक स्थळे अद्याप खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे दिपावली उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहिल यांची पुरेपूर दक्षता घेण्यात यावी. कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उपक्रम/कार्यक्रम उदा. दिपावली पहाट आयोजित करण्यात येऊ नयेत. आयोजित करावयाचे झाल्यास शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पध्दतीने आयोजित करावे. तसेच केबल, टि.व्ही., वेबसाईट, फेसबुक लाईव्ह इ. चे माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे इतरांना पाहण्याची व्यवस्था करण्यात यावी.

तसेच ध्वनीप्रदूषणा संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करावे. कोरोना विषाणू (कोव्हीड-19) मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई असेल. सांस्कृतिक कार्यक्रमाऐंवजी रक्तदान शिबीरे, आरोग्य शिबीरे असे उपक्रम आयोजित करुन मलेरीया, डेंगू, कोरोना इ. आजार व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी. दिपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवा दरम्यान दरवर्षी मोठया प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. त्यामुळे कोरोना आजारामुळे बाधित झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायु प्रदुषणाचा थेट परिणाम होऊन श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चालु वर्षी शक्यतो फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास मोठ्याप्रमाणावर करुन उत्सव साजरा करावा.

वरीलप्रमाणे मार्गदर्शक सुचनांचे अनुपालन करण्यास आदेशांद्वारे सूचित करण्यात आले आहे. तसेच प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत शासन/प्रशासनाकडून काही अतिरिक्त सुचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

शासनाचे मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकार राहील. तथापि, सदरील आदेशाचे पालन न करणारी/ उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, दीपक सिंगला यांनी कळविले आहे.