ओबिसीचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

32

✒️लेखक:-विनोद पंजाबराव सदावर्ते
मोबा: ९१३०९७९३००
*************************************
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना व्यवस्थेच्या ठेकेदारांनी एका चौकटी मध्ये बंद करण्याचा प्रयत्न केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मांडणी फक्त एका जातीशी भावनिक करून त्यांच्या कार्याचा आणि विचाराचा प्रचार आणि प्रसारच होऊ दिला नाही. उलटपक्षी डॉक्टर बाबाबासाहेब आंबेडकर यांचे यांचे विचार व कार्य मर्यादित करून काजव्याच्या प्रकाशाने सुर्य झाकण्याचा प्रयत्न येथील विषमतेने ग्रासलेल्या मानसिकतेने केलेला आहे. मुळ बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे कार्य जनतेसमोर येऊच नाही म्हणून एक वर्ग आजही सक्रिय आहे. परंतू परिवर्तनाची आणि प्रबोधनाची लाट जन सामान्यात उसळत असताना प्रत्येक जन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाणुन घेऊन त्यांच्या विचाराने काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. हळूहळू जातीच्या चौकटीबाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य जात असल्यामुळे समाजामध्ये सामाजिक समता, बंधुता निर्माण होण्याचे काम होत आहे. परंतु भारतातील बहुसंख्य असलेल्या ओबिसी बांधवानी अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचले नाही अथवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपुलकी नाही.

ओबिसी मधून आज अनेक लोक संविधानाचे अभ्यासक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे प्रचारक झाले, अनेक तरुण तरुणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी, विचारा विषयी प्रबोधन करत आहेत. हे परिवर्तनच मानावे लागेल. परंतु बहुसंख्य ओबीसी बांधवांना अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गंधही नाही. याला अज्ञान म्हणाव कि द्वेष. भारत एकमेव असा देश आहे कि येथे संस्काराला, आणि प्रामाणिक पणाला खुप महत्त्व दिले जाते, संस्कार आणि प्रामाणिक पणा नसेल तर त्याला किंमत दिली जात नाही. जात धर्म काहीच नसुन मानव सर्वश्रेष्ठ आहे याची शिकवण देताना सुद्धां ज्या बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवाला माणसात आणले त्यांचे नाव सुद्धां घेतले जात नाही. आपल्या समस्या सोडविण्यासाठी कायदेशीर मार्गाने बाजु मांडणारे लोक खुप आहेत परंतु आम्हाला कायदेशीर हक्क अधिकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे मिळाले असे खूप कमी लोक आहे.

आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातीच्या वा धर्माच्या चष्म्यातून बघने म्हणजे मानसिक अपंगत्वाचे लक्षण होय. बहुसंख्य समुहाला ओबीसी ची ओळख निर्माण करून देऊन प्रवाहामध्ये येण्यासाठी सर्व मार्ग खुले करून यशाची चाबी ओबीसी बांधवांना कडे दिली याची जानीवच ओबिसींना राहलेली नाही.

ओबिसी या प्रवर्गाला खूप लोकांचा विरोध होता. स्वतः ला राष्ट्रीय नेते समणाऱ्या लोकांनी सुद्धा ओबिसी म्हणजे नेमके कोण याचा प्रश्न उपस्थित केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबिसी म्हणजे नेमके कोण आणि त्यांना प्रवाहात आणणे का गरजेचे आहे हे पटवून देऊन ओबिसी प्रवर्गाची निर्मिती करून ओबिसींना विकासाच्या प्रवाहात आणण्याची गेट पास मिळवून दिली. ओबिसींना हक्क अधिकार मिळवून देऊन त्यांना प्रतिनिधित्व करण्याची कायदेशीर अधिकार देऊन त्यांचे संरक्षण करण्याची सुविधा सुद्धां उपलब्ध करून दिली. ओबिसीं प्रवर्गाने प्रवाहात येऊन स्वतः चे अस्तित्व टिकवून ठेवण्याची सुविधा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी करून दिली आहे.

ओबिसीच्या नावाखाली करोडो लोक मालामाल होऊन आज माना सन्मानाचे जिवन जगत आहेत परंतु त्यांना ओबिसींच्या उद्धारकर्त्याची जाणीव नाही वा जाती व्यवस्थेमुळे आणि विषमतेमुळे त्यांनी उद्धारकर्त्याला जवळ केलेच नाही. कित्येक लोकांना आपण ओबिसी आहोत आणि ओबिसींना सर्व क्षेत्रात यशस्वी होण्याचा अधिकार आहे हे ही सुद्धा माहिती नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबिसींना राजा होण्याची संधी निर्माण करून दिली आहे परंतु फक्त जातीव्यवस्था आणि मानसिक गुलामगिरी मुळे ओबिसींनी बाबासाहेब समजून घेतले नाही म्हणून स्वतः देशाचा राजा असताना सुद्धा आपल्याच हक्क अधिकाराची जाणीव नसल्याने ओबीसी आजही मागासलेले राहिले असून ओबीसी राजा दुसऱ्याला मागत आहे. जर ओबिसींना स्वतः च्या अस्तितवाची जाणीव होत नसेल तर आजही मानसिक गुलामगिरी मध्ये आहेत असेच समजावे. ओबिसींना स्वतः चे अस्थित्व डॉक्टर बाबासाहेब यांनी निर्माण करून दिले तरी बहुसंख्य ओबिसी आजही निद्रीस्त अवस्थेत आहेत.

आजही ओबिसी जर जागा झाला तर देशाचा राजा होईल. ओबिसींना अजून राजा हि संकल्पना च कळाली नाही कारण ज्या बहुसंख्य ओबिसी यांना राजा होण्याचा अधिकार आहे तो ओबिसीं आजही मानसिक गुलामगिरी मध्ये खितपत पडलेला आहे. मानसिक गुलामी तोडण्यासाठी शिक्षण हे प्रभावी माध्यम असल्याने शिक्षणाचे दार उघडून ओबिसींना शिक्षणाची सुविधा करून दिली. परंतु ओबिसीं या प्रवर्गाने शिक्षण घेतले पण तर्कवाद आणि सत्यता असलेले शिक्षण त्यांना मिळाले नाही. म्हणून आजही ओबिसी हक्क अधिकार यापासून दुर आहेत. सुशिक्षित ओबिसीं यांनी जागृत ओबिसींना जर वैचारिक आणि सामाजिक मदत केली तर एका दिवशी ओबीसी समुह राजा बनतो एवढी ताकत या समुहामध्ये आहे. परंतू हळूहळू या ओबिसींना हक्क अधिकारा पासून दुर नेऊन ते कमी करण्याचे कट कारस्थान व्यवस्था करत आहे.

ओबिसींनी आपला ईतिहास वाचून सध्याच्या सध्याच्या परिस्थिती किडे बघितलं तर अमुलाग्र बदल घडलेला आहे. याचे सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. इतिहास आणि वर्तमान स्थिती काय बदल झालेला आहे याची जाणीव होईल. हा बदल होण्यासाठी कोण कारणीभूत आहे हे स्विकारने गरजेचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जिवन जगण्याची पद्धत आहे. आणि ही पद्धत ओबिसींना राजा बनवून सोडते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे शिक्षण, नोकरी, हक्क अधिकार, आरक्षण आणि संरक्षण मिळाले. म्हणून ओबीसी वर्ग आज स्वाभिमानाने उभा व टिकून आहे. बऱ्याच सुशिक्षित नोकरदार ओबिसींना आपल्याला सुद्धां हक्क अधिकार, आणि आरक्षण आहे, ओबिसीं सुद्धां सामाजिक मागासलेला आहे याची जाणीव नाही. तो जागृत नाही. जागृत लोकांनी ओबिसींना आजही जागृत करून स्वतः च्या अस्तित्वाची व स्वाभिमानाची जाणीव करून देणे गरजेचे आहे. ओबीसी बांधवांचे अज्ञान आणि मानसिक गुलामी यामुळे ओबीसी आजही आपल्या हक्क अधिकारांचे रक्षण करण्यास अपयशी ठरत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थाने मानवंदना द्यायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ओबिसीं बांधवामध्ये पेरून ओबिसींना जागृत करणे गरजेचे आहे.

तर बाबासाहेब आंबेडकर यांना खरी मानवंदना दिली याचे सार्थक होईल. आज पर्यत मर्यादित बाबासाहेब आंबेडकर यांची मांडणी करणाऱ्या लोकांनी आता थोड थांबुन अगोदर स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेणे गरजेचे आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची व्यापक स्वरुपात मांडणी करून ओबिसींच्या घरात बाबासाहेब व डोक्यात बाबासाहेब पोहचवण्याचा प्रयत्न करू जनेकरून प्रत्येक भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे कार्य माहिती होऊन एकसंघ राष्ट्र निर्माण होण्यास मदत होईल व समता व मानवतेचा शत्रु समजून येईल. भिमरायांना अभिवादन करूया, चला ओबिसींना राजा बनवुया.