इंदिराजींनी पाकची फाळणी केली, मोदीजी भारताची फाळणी करतील !

37

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

भारताच्या आयर्न लेडी म्हणून ओळखल्या गेलेेल्या दिवंगत प्रधानमंत्री इंदिराजी गांधी यांनी १९७१ च्या भारत-पाक युध्दात पाकिस्तानचे कंबरडे मोडून फाळणी केली होती. त्यांनी पाकला जबरदस्त धडा शिकवला होता. आणिबाणी लादूनही त्या भारताच्या सर्वात पॉवरफुल आणि यशस्वी प्रधानमंत्री म्हणून इतिहासात नोंदल्या गेल्या. पाकची फाळणी करत त्यांनी स्वतंत्र बांगलादेश निर्माण केला. इंदिराजींना भारतीयांनी खुप ताकद दिली होती, मोठे बहूमत दिले होते. त्यांच्यानंतर तशी ताकद, तसे बहूमत देशाचे विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मिळाली आहे. २०१४ ला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री व्हावेत अशी कोट्यावधी भारतीयांची इच्छा होती. तसा कौलही देशाने दिला. पुन्हा २०१९ च्या निवडणूकीतही लोकांनी मोदींना तसाच कौल दिला.

इंदिराजी नंतर असे बहूमत आणि सत्ता मिळवण्याचे भाग्य फक्त नरेंद्र मोदींना लाभले आहे. मोदी काहीतरी परिवर्तन करतील, देशात विकासाचे भव्यदिव्य काम करतील असे तमाम भारतीयांना वाटत होते. लोकांना त्यांच्याकडून प्रचंड अपेक्षा होत्या पण तसे झाले नाही. मोदींनी देशाचा अपेक्षाभंग केलाच पण मनोभंगही केला आहे. मोदी सत्तेत येण्यापुर्वी ज्या वल्गना करायचे त्या सगळ्या बकवास निघाल्या. त्यांच्या सगळ्या घोषणा फुसक्या निघाल्या. स्वस्तातले पेट्रोल, डिझेल, महागाईला आळा, आदर्श सांसदग्राम अभियान, स्वच्छ गंगा, पंधरा लाख ते वर्षाला दोन कोटी रोजागारापर्यंतच्या सगळ्या बाता फुसक्या ठरल्या.

काळ्यापैशाचे काय झाले ते रामदेवबाबा आणि मोदींनाच ठाऊक. लोकपाल तर गर्भातच मेला. त्यांच्या विकासाच्या सगळ्या बाता थोतांड निघाल्या. यापुर्वीचे अनेक प्रधानमंत्री फारसे काम करू शकले नाहीत. त्यांना बहूमताअभावी असेल, काहींचा तेवढा वकूबही नसेल किंवा इतर काही अडचणीमुळे असेल पण त्यांना प्रभावी काम करता आले नाही. त्या प्रधानमंत्र्यांनी प्रभावी काम नसेल केले पण किमान देश तोडण्याचे पाप कधीच केले नाही. आज मोदींच्यासमोर काम करण्याची प्रचंड मोठी संधी आहे, तसे बहूमतही आहे. सर्व बाजू अनुकूल आहेत. सगळ्या बाजू जमेच्या आहेत तरीही मोदी देश उभा करण्याच्या ऐवजी देश तोडण्याचे काम करत आहेत. देश तोडण्याचे, देश फोडण्याचे पाप त्यांच्या व त्यांच्या पिलावळींच्या हातून होताना दिसत आहे.

सध्या देशात शेतक-यांचे आंदोलन पेटले आहे. अंबानी आणि अदानी या सगळ्यात मोठ्या भाडवलदारांच्या हितासाठी केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाबातला शेतकरी भडकला आहे. तो रस्त्यावर उतरला आहे. सरकारच्या विरोधात त्याने मोठे आंदोलन उभारले आहे. पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस तो दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून आहे. सरकारने त्यांच्यावर लाठी हल्ला केला, पाण्याचे फवारे मारले. शेतक-यांना जखमी केले, त्यांचे आंदोलन मोडूण काढण्यासाठी जंगजंग पछाडले. पण शेतकरी मागे हटले नाहीत. शेतकरी आंदोलन मोडता येत नसल्याचे पाहून सरकारने आणि त्यांच्या पिलावळींनी आंदोलनकर्ते शेतकरीच देशद्रोही आहेत, खलिस्तानवादी आहेत असा प्रचार सुरू केला आहे. सध्या अमित शहा कुलगुरू असलेल्या संघाच्या वाटसप विद्यापिठातल्या बेअक्कल पिलावळीही तेच बोलतायत. सरकारच्या विरोधात जो जो बोलतो त्याला देशद्रोही, नक्षलवादी आणि खलिस्तानी ठरवले जाते आहे.

गेली सहा वर्षे देशात हेच सुरू आहे. महाराष्ट्रात आदिवासी शेतक-यांनी आंदोलन सुरू केले तेव्हा त्यांचीही अशीच अवहेलना केली. राज्यातल्या फडणवीशी संघावळी हेच बोलत होत्या. संघाच्या पोतडीतले तमाम कारस्थानी कुलकर्णी, देशपांडे व जोशी सोशल मिडीयात बरळत होते, शेतक-यांना शिव्याशाप देत होते. शेतक-यांना फुकटे, आयतखाऊ असे हिनवत होते. भाजपाच्या विरोधात जे बोलतात त्यांना देशद्रोही, गद्दार आणि पाकधार्जिणे ठरवले जाते आहे. आता पंजाबातले शेतकरी मोदींच्या झुंडशाहीविरोधात उभे राहिले आहेत तर त्यांनाही खलिस्तानवादी ठरवले जाते आहे. मोदी आणि अमित शहाची ही हलकट संघप्रवृत्ती देश तोडणारी आहे. या देशात लोकशाही आहे. सरकारच्या चुकीला व चुकीच्या धोरणांना विरोध करण्याचा अधिकार लोकांना संविधानाने दिला आहे. या पुर्वीच्या सरकारांनाही विरोध झाला होता. भाजपाने तर सत्तेत नसताना नैतिकतेची सगळी पातळी सोडून विरोध केला. माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींच्यावर अत्यंत खालच्या आणि निच पातळीवर जावून टिका केली गेली.

देशात या पुर्वीच्या कुठल्याच विरोधकांनी असली पातळी गाठली नव्हती. जयप्रकाशजींनी इंदिरा गांंधींच्या विरोधात देशव्यापी आंदोलन उभा केले. त्यांना सत्तेतून खाली खेचले पण देश तोडणारी विषपेरणी कधीच केली नाही. अटलजींनी दोन खासदारांवरची भाजपा केंद्रात सत्तेत आणली. विरोधात असताना संसदेत संसदीय पध्दतीने काँग्रेसला मोठा विरोध उभा केला पण अटलजींनीही नैतिकतेची, सभ्यतेची मर्यादा कधीच सोडली नाही. सत्तेत आल्यावर विरोधकांना सोबत आणि विश्वासात घेवून ते अनेक संकटांशी झगडले. पण त्यांनीही विरोधकांना कधी गद्दार, देशद्रोही ठरवले नाही. त्यांच्यावर नैतिकता सोडून हल्ले केले नाहीत. भारतीयत्वाची चौकट त्यांनी कधीच मोडली नाही. आजवरच्या प्रत्येक सत्ताधा-यांनी हे जोपासले होते. शिख दंगलीनंतर गुप्तहेरांनी इंदिराजींना, “तुमच्या जीवाला धोका आहे, तुमचे शीख अंगरक्षक बदला !” असे सांगितले होते. पण त्यांनी ते बदलले नाहीत. अखेर त्यांना बलिदान द्यावे लागले. राजिव गांधीचीही लिट्टेच्या तामिळी दहशतवाद्यांनी हत्या केली.

पण त्यानंतर तामिळी लोकांना कुणी दहशतवादी ठरवले नाही. या लोकांनी जीवावरची संकटं पेलली, प्रसंगी बलिदान दिले पण देशातली व्यापकता जपली, देशातली सहिष्णूता जपली. इंदिराजींच्या हत्येनंतर दिल्लीत शिख दंगली झाल्या. ती उस्फुर्त प्रतिक्रीया होती. ती येणे साहजिक होते पण जाणिवपुर्वक ठरवून, कारस्थानं रचून, पाताळयंत्रीपणा करून आजवर विरोधकांना कधी देशद्रोही ठरवले गेले नाही. नेहमी भारताची व्यापकता जपली गेली. आज मोदी आणि शहा भारताच्या याच ओळखीला सुरूंग लावत सुटले आहेत. आपल्याच देशातल्या लोकांना गद्दार, नक्षलवादी आणि खलिस्तानी ठरवत त्यांचा विरोध मोडून काढू पहात आहेत. मोदी व शहाच्या या मांडणीची मोठी किमंत देशाला मोजावी लागणार आहे.

आज मोदी आणि शहा देशात जे पेरतायत ते लवकरच उगवून येईल. विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी ते देश तोडणारी मांडणी करत आहेत ती योग्य नाही. मोदी व शहांच्यात दम आहे तर त्यांनी खुप विकास कामे करावीत, दिलेली आश्वासने पुर्ण करावीत. तुम्ही लायकीचे आहात की विरोधक लायकीचे आहेत हे जनता निवडणूकीत ठरवेल. जनतेच्या न्यायालयात निवडणूकीच्या निमित्ताने निवाडे होतीलच. जर तुम्ही सत्यासोबत आहात तर देश तुमच्यासोबत उभा राहिल पण सत्तेसाठी आपल्याच लोकांना गद्दार, देशद्रोही, नक्षलवादी ठरवण्याचा करंटेपणा योग्य नाही. हे असेच चालू राहिले तर एक दिवस या देशात दुहीची बिजं पेरली जातील. मोदी व शहांचे हलकट राजकारण या भारताचीच फाळणी केल्याशिवाय राहणार नाही. एखाद्याला सतत चोर ठरवले तर तो चोरीच्या दिशेनेच जातो, चोर होतो. मोदींच्या हातात सत्ता आहे. त्यांनी खुषाल या खलिस्तानवाद्यांना अटक करावी, तुरूंगात टाकावे. आंदोलक जर खलिस्तानवादी आहेत तर सरकार त्यांच्यासोबत चर्चा का करतय ? देशद्रोह्यांच्या सोबत कुणी चर्चा करतं का ? मोदींच्या बुडात दम आहे तर त्यांनी आंदोलकांच्यावर देशद्रोहाचे खटले भरावेत, त्यांना अटक करावी पण तसे न करता लोकांची दिशाभूल करत विष पेरणी का करत आहेत ? सत्तेचा अमरपट्टा कुणालाच मिळत नाही.

ज्या इंग्रजी सत्तेवरचा सुर्य मावळत नव्हता ती इंग्रजी सत्ता लयाला गेली. तलवारीच्या जोरावर जग जिंकणारा सिंकदर काळाच्या पोटात गेला. भारतावर अधिराज्य गाजवणारे मोघल संपून गेले. पराकोटीची क्रुर सत्ता राबवणारा चंगेजखान संपला. मग मोदी आणि शहा किस झाड की पत्ती आहेत ? एकस दिवस यांचीही झुंडशाही मोडीत काढल्याशिवाय जनता राहणार नाही. सत्तेसाठी स्वत:च्याच घराला आग लावण्याची नमकहरामी भाजपवाल्यांनी करू नये. विचारसरणीतला टोकाचा फरक असूनही आजवर भारतीयांनी संघ स्विकारला, त्याला वाढू दिले. पण आज राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व प्रधानमंत्री आमचा आहे, आमची कोण काय वाकडी करणार ? या मस्तीत संघवाली बांडगुळं देश तोडणार असतील, देश तोडणारे विष पेरणार असतील तर हा देश तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी सत्तेच्या मस्तीत आणि घमेंडीत राहू नये. जिथे उदय असतो तिथे अस्त ठरलेला असतो याचे भान या बेट्यांनी ठेवावे इतकेच.