भारतीय स्त्रियात सावित्रीबाईचे गुण उतरल्यास नव्या समाजव्यवस्थेची पायाभरणी होईल

32

महात्मा फुले यांचे आद्यचरित्र लेखक व थोर व्यासंगी पंढरीनाथ पाटील म्हणतात की, सावित्रीबाईच्या भारतीय स्त्रियांच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याशी तुलना करता येणारे एकही उदाहरण १९ व्या शतकात सापडत नाही. यांच्या व्यक्तिमत्वास अलौकिक हेच विशेषन देता येईल. कृतीनिष्ठ सुधारणा रथाचे चक्र महात्मा फुले तर दुसरे चक्र सावित्रीबाई होत्या. या दाम्पत्याच्या कार्याचा इतिहास रोमांचकारी आहे. ज्योतीरावानी त्यांना संपूर्ण आयुष्यभर जवळपास पन्नास वर्ष सहकार्य केले. मग काव्यफुले हा त्यांचा पहिला कवितासंग्रह असेल, केशवपण बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे असो, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे, अनाथांना आश्रय मिळावा यासाठी धडपड, “स्त्रियांनी शिकावे” या ब्रीदवाक्य घेऊन पुण्यात एकूण १८ शाळा काढल्या. तसेच सत्यशोधक समाजाच्या तत्वप्रसारात अविश्रांत कार्य केले. या सर्वांच्या मागे ज्योतिबा आणि सावित्रीबाईच्या सम्यक विचाराचा, कल्पकतेचा परिपाक होता.

सावित्रीबाईनी महाराष्ट्रातच नव्हे तर अख्या भारताला क्रांतिकारी विचार दिला. त्या पहिल्या शिक्षिका, स्त्रीमुक्ती चळवळीच्या पहिल्या नेत्या होत्या. पददलिताच्या कैवारीच नव्हे तर भारतातल्या विशेषतः महाराष्ट्रातील प्रोढ शिक्षणाच्या पुरस्कर्त्या होत्या. सार्वजनिक कार्यासाठी बाहेर पडलेली भारतीय पहिली स्त्री होती. १८५४ साली सुरु झालेला अनाथाश्रम हा भारतातील पहिला प्रयोग होता. जो ज्योतिबा आणि सावित्रीबाईनी या व्यक्तीद्वारे सुरु केला. तसेच अवेळेची गर्भधारणा रोखण्यासाठी, बालहत्या थांबविण्यासाठी बालहत्या प्रतिबंधकगृह अभिनव प्रयोग भारतातील प्रथमच होता. नेटिव्ह लायब्ररी सुरु करण्याचे श्रेय या पतीपत्नीला जाते. तसेच सन १८९६ मधील सावित्रीबाईचे प्लेग रोगामधील एका स्त्रीचे कार्य आजही सर्व समाजाला आदर्शवत आहे, कोरोना संक्रमणकाळात समाजाला लाजविणारे आहे.

सावित्रीबाईनी लोकउद्धारासाठी कार्य केले. १९३१ ते १८९७ म्हणजे उणीपुरी ६८ वर्ष सावित्रीबाईना मिळाली होती. त्यांनी आत्मविश्वासाने आलेल्या प्रत्येक प्रसंगाचा सामना केला. आळस आणि व्यसनाचा त्यांना तिरस्कार होता. त्यांच्या लिखाणात त्यांचे प्रतिबिंब दिसते. त्या लिहितात की, उद्योग हा ज्ञानस्वरूप आहे तर आळस दारिद्राचे लक्षण आहे. व्यसनामुळे माणुसकी नष्ट होते. स्त्रियांसाठी “गृहिणी” नावाचे मासिक सावित्रीबाईच्या मार्गदर्शनाखाली निघत असे, त्यात स्त्रियांनी उद्योग, कला, संस्कृतीमध्ये सर्वोच्च असले पाहिजे.

सावित्रीबाई फुलेनी भारतीय भगनीला ज्ञानामृत पाजले. सावित्रीबाईनी क्रांतिकारी विचारधन सामान्य जनतेपर्यंत विशेषतः स्त्रियापर्यंत पोहचविले. स्त्रीयासाठी ज्ञानदानाचे व्रत घेऊन त्या ज्ञानयोगिनी झाल्या. पण तरीही त्यांचे कार्य आजपर्यंत काळाच्या पडद्याआड राहिले. त्याची त्यांच्या काळात नेहमी उपेक्षाच झाली. आजही तेच होत आहे. त्यांच्या समकालीन मामा परमानंद लिहतात की, उच्च वर्णीयात शिक्षण घेतलेल्या स्त्रियात सावित्रीबाईसारखी त्यागी स्त्री आढळणे कठीण आहे. आज वर्तमानकाळाच्या कसोटीवर हे वाक्य तपासले तर जवळपास अर्ध्या अधिक सुशिक्षित स्त्रियात सावित्रीबाई सापडणे कठीण आहे. सावित्रीबाईचे चरित्र संपन्न व करारी जीवन हे आजच्या स्त्रीयासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. ताराबाई शिंदे आणि मुक्ता साळवे या सावित्रीबाईच्या विद्यार्थिनीने तत्कालीन सामाजिक व्यवस्थेस प्रश्न विचारले तसे प्रश्न आजच्या भारतीय स्त्रियांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. भारतीय स्त्रियात सावित्रीबाईचे गुण उतरल्यास नव्या समाज व्यवस्थेची पायाभरणी होईल. तरच ख-या अर्थाने आपण अभिवादन करू तो सुदिन ठरेल.

✒️लेखक:-प्रा. प्रफुल एम. राजुरवाडे(मु. पो. ता. चिमूर जि. चंद्रपूर ४४२९०३)मो:-९६८९९५२८७३