हे भास्करा…

  49

  ▪️सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्यावर लिहिलेली कविता नक्की वाचा आणि शेअर करा….

  नव्हता तुला कोणताही
  राजकीय वारसा की,
  नव्हती तुझ्याकडे कोणत्याही
  डिग्रीची कवचकुंडलं
  तरीही तुझ्या तेजोमय प्रकाशानं
  उजळून टाकल्यास
  गावच्या दाही दिशा
  हे भास्करा, कशी प्राशन केलीस तू विकासाची नशा?

  साखरपेरणी करून केलीस
  सगळ्यांची दिवाळी गोड
  उभ्या महाराष्ट्रात नाही
  तुझ्या कार्याला तोड
  नवनवीन कल्पना तुला
  सुचतातच कशा?
  हे भास्करा, कशी प्राशन केलीस तू विकासाची नशा?

  गार, गरम, शुद्ध पाणी
  घरपोच नेऊन दिलेस
  आया बहिणींच्या कामाचे
  तूच मोल केलेस
  इतके सगळे करूनही
  नम्र असते भाषा
  हे भास्करा,कशी प्राशन केलीस तू विकासाची नशा?

  थुंकू नका म्हणून तर
  सगळेच लोक सांगतात
  पण थुंकायचे कुठे
  हे सगळ्यांना दाखवून
  गावचा रस्ता आणि कचेरीच्या
  भिंती ठेवल्यास
  आरसा असतो तशा
  हे भास्करा, कशी प्राशन केलीस तू विकासाची नशा?

  स्मशान भूमी विकुन पुढारी
  भरत असतात पोटं
  जांभूळ वन उभारून तू
  स्मशान केलस मोठं
  आणखी किती करणार
  तुझ्याकडून आशा
  हे भास्करा, कशी प्राशन केलीस तू विकासाची नशा?

  पंचवीस वर्षे मेहनत घेऊन
  गावचे नाव कमावले
  गावातल्या लोकांनी ते
  चुटकीसरशी गमावले
  गावोगावी तुमच्या चर्चा
  रंगल्या आहेत अशा
  हे भास्करा, कशी प्राशन केलीस तू विकासाची नशा?

  लेक आहे म्हणून मताची
  भीक नाही मागितली
  भावनिक होवून विकासाची
  कामे नाही सांगीतली
  रणांगणावर सोडून तिला
  गेलास दूरदेशा
  हे भास्करा, कशी प्राशन केलीस तू विकासाची नशा?

  ✒️काव्यलेखन:-श्री रमेश चंद्रकांत मायंदे
  9527260039