छोटी धरणे व बंधाऱ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे

25

पाण्याची अधिकाधिक बचत व्हावी, त्या पाण्याचा पिण्यासाठी तसेच शेती व उद्योगांसाठी वापर व्हावा याकरिता नदी, तलाव यावर धरणे, बंधारे बांधली जातात.भारतात अशी शेकडो छोटी धरणे आहेत तसेच बंधारे आहेत. महाराष्ट्रात तर प्रत्येक गावात कोल्हापूर टाईप बंधारे बांधून नदीचे पाणी अडवले जाते. ही छोटी धरणे तसेच बंधारे लोकांसाठी वरदान ठरली आहेत. पण यातील बहुतांश धरणे आणि बंधारे आता पन्नासहुन अधिक वर्षांची झाली आहेत. याबाबत एजिंग वाटर इन्फ्रास्ट्रक्चर : एन इमर्जींग ग्लोबल रिस्क नावाच्या अहवालातून कॅनडातील संयुक्त राष्ट्राच्या विद्यापीठातील जल, पर्यावरण आणि आरोग्य संस्थांनी केलेल्या अभ्यासातून एक धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. या अहवालानुसार भारतातील बहुतांश बंधारे व छोटी धरणे ही १९३० ते १९७० च्या दरम्यान बांधली आहेत.

ही धरणे आणि बंधारे १०० वर्ष सुरक्षित राहतील या दृष्टीने बांधण्यात आली आहेत पण ही सर्व धरणे आणि बंधारे काँक्रीटची आहेत. साधारणपणे काँक्रीट करून बांधलेली बंधारे ५० वर्षानंतर जुनी झाली असे समजण्यात येते त्यामुळेच ही बंधारे आता धोकादायक स्थितीत पोहचण्यास सुरवात झाली आहे त्यामुळे या बंधारे आणि धरणांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने या अहवालाचे गांभीर्य समजून घेऊन देशातील जी छोटी धरणे व बंधारे बांधून ५० हुन अधिक वर्ष उलटली आहेत अशा धरण व बंधाऱ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यायला हवे. ज्या धरणे आणि बंधाऱ्यांना किरकोळ किंवा मोठ्या दुरुस्तीची गरज आहे अशा धरणांची आणि बंधाऱ्यांची त्वरित दुरुस्ती करुन घ्यायला हवी. धरणे, बंधारे फुटण्याचा अनुभव याआधी आपण घेतला आहे. महाराष्ट्रात चिपळूण जवळ धरण फुटून २३ जण बुडाले होते.

त्यात मोठी वित्तहानी झाली होती. त्यानंतर अनेक धरणांचे ऑडिटिंगही झाले होते. त्यात ज्या धरणांना धोका आहे असे निष्पन्न झाले त्या धरणांची दुरुस्तीही झाली पण आता नव्याने आलेल्या या अहवालाने अनेकांची झोप उडाली आहे. संयुक्त राष्ट्राच्या संस्थेने अभ्यासासह आपल्याला हा इशारा दिला आहे. तोच इशारा समजून सरकारने धरणे व बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यायला हवे. नाहीतर फार उशीर झाला असेल. दुर्घटना घडून गेल्यावर धावाधाव करण्यापेक्षा दुर्घटना घडूच नये यासाठी प्रयत्न करायला हवे.

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड,जिल्हा पुणे)