संत तुकाराम महाराजांची गाथा – बहुजनांसाठी त्राता

94

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असे म्हणतात की, संत तुकाराम महाराजांची गाथा वगळता संपूर्ण ब्राह्मणी साहित्य जरी समुद्रात बुडवले तरी मला फारसं काही दुःख होणार नाही. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या ३१ जानेवारी १९२० रोजी सुरु केलेल्या मूकनायक या मुखपत्राच्या पहिल्या पानावर सर्वात वर तुकाराम महाराजांचा अभंग लिहून आपल्या मुखपत्राचे उद्दिष्ट काय आहे हे इथल्या मनुवादी, विषमतावादी, ब्राह्मणवादी व्यवस्थेला दर्शवण्याचा प्रयत्न केला.

काय करू आता ठेवूनिया भीडl
निशंक हे तोंड वाजविलेl
नव्हे जगी कोणी मुकीयाचा जानl
सार्थक लाजून नव्हे हितl

हजारो वर्षांपासून पिढ्यान्पिढ्या मुक्या असलेल्या बहुजन समाजाच्या व्यथा आणि वेदना संत तुकाराम महाराजांनी आपल्या पाच हजार अभंग गाथेच्या माध्यमातून जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. कारण भारतातील इतर धर्मग्रंथाने बहुजन समाजाचा बोलण्याचा, लिहिण्याचा, वाचण्याचा, एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे पाहण्याचाही अधिकार नाकारला होता.
संत तुकाराम महाराजांनी या प्रचलित धर्मग्रंथाचे प्रामाण्य स्वतःही नाकारले आणि इतरांनाही नाकारण्यास सांगितल त्यासंदर्भात ते म्हणतात

वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावाl
ऐरांनी वाहावा भारमाथाl

म्हणजेच ज्या ठिकाणी वेदांच्या संदर्भात बहुजन समाजाला कुठलाही अधिकार नसताना, संत तुकाराम महाराज त्यांचे अध्ययन करून त्यामध्ये कोणतेही जीवनोपयोगी तत्वज्ञान नसल्याचे जाहीर करतात.महाराज फक्त धर्म ग्रंथांवर भाष्यच करत नाहीत, तर बहुजन समाजाने जीवन जगत असताना जन्मापासून तर मरणापर्यंत (मरणोत्तर नव्हे) आदर्श जीवन कसे जगावे, माणसाने माणसाशी कसे वागावे, याचे मार्गदर्शन करतात. कारण की,

बुडता हे जन न देखवे डोळाl म्हणुनी कळवळा येत असेl

आजचा बहुजन समाज अंधश्रद्धा, भटी कर्मकांड, शकुन-अपशकुन, रुढी-परंपरा, उपास-तापास, व्रत-वैकल्य, यांच्या खूप आहारी गेला आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खूप खालावली आहे. महाराजांनी दारिद्र्याचे गोडवे कधीच गायीले नाही. ठेविले अनंते तैसेची रहावेl हा अभंग त्यांचा आहे की नाही हा संशोधनाचा विषय आहे. त्यासंदर्भात ते म्हणतात

जोडूनिया धन उत्तम व्यवहारेl
उदास विचारे वेचकरी]

प्रत्येकाने श्रीमंत असावे असे ते म्हणतात. परंतु कमावलेली संपत्ती ही योग्य मार्गाने जोडलेली असावी तसेच तिचा विनियोग सुद्धा योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणीच झाला पाहिजे. इतर धर्मग्रंथ मात्र सांगतात की, या जन्मी जर तुम्ही गरीब निर्धन दारिद्र्यात खितपत पडलेले असाल तर हे तुमचे पूर्वजन्मीचे पाप आहे. म्हणून या जन्मी पुण्य संपादन करावे लागेल. या जन्मी पुण्य संपादन केल्यावर पुढील जन्मी मात्र चांगलं जीवन जगायला मिळेल. पुण्य संपादन करण्यासाठी काय करावे तर देवाची भक्ती करावी, नवस बोलावे, भटजींना दान दक्षिणा द्यावी, तीर्थाटन करावे त्या संदर्भात सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात

जाऊनिया तीर्था काय तुवा केलेl
चर्म प्राक्षाळीले वरी वरीl
अंतरीचे शुद्ध कासयाने केलेl
भूषणत्वा आले आपणयाl
तुका म्हणे नाही शांति क्षमा दयाl
तोवरी कासया फुंदापरीl

तिर्थाला जाऊन पाप धूतल्या जात नाही आणि पुण्यही संपादन होत नाही. कोणत्याही पाण्याने अंघोळ केली तरी शरीराची चांबळीच शुद्ध होईल. जोपर्यंत अंतकरणात दया-क्षमा-शांती नाही तोपर्यंत जीवनात काहीच साध्य होणार नाही. त्यापेक्षा ते म्हणतात

जे का रंजले गांजलेl
त्यासी म्हणे जो आपुलेl
देव तेथेची जाणावाl
साधु तोची ओळखावाl

आजकाल समाजामध्ये मोठ्या प्रमाणात स्वयंघोषित साधु, संत, बुवा, बापू, बाप्या, अम्मा टम्माचे पेव फुटले आहे. त्यापैकी बरेच लोक तुरुंगाची हवा खात आहेत, तर काही त्या वाटेवर मार्गस्थ आहेत. संत तुकाराम महाराजांनी साधू आणि संतांना ओळखण्याची साधी आणि सोपी कसोटी सांगितली आहे. ती समजून घेण्याची गरज आहे. ज्यांच्याकडे मानवी मुल्य असतील, ज्यांना समाजाच्या प्रगतीची कळकळ असेल, ज्यांच्या कृतीमुळे व विचारांमुळे समाजाची धारणा होईल, समाजाने त्यांचा आदर करावा. त्यांनाच थारा द्यावा. आजकालच्या साधुसंतांना राहण्याची खाण्यापिण्याची अप्रतिम शाही व्यवस्था लागते. त्यांना एखादा प्रश्न विचारायचा असेल तर ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊन लाखो रुपये फी त्यांच्या खात्यामध्ये आधीच जमा करावी लागते. एवढे करूनही एखाद्या प्रश्नाचे उत्तर हे अतिशय हास्यास्पद, पहिल्या वर्गातल्या मुलासारखी दिले जाते. एखाद्या महिलेला सांगितलं जाते की, लाल रंगाची साडी घालत असाल तर हिरव्या रंगाची घालावी. तरच आपल्या समस्येचे समाधान होईल. एखाद्या पुरुषाला सांगितले जाते गोलकप्पे खाऊ नये किंवा खायचे असतील तर हिरव्या रंगाच्या चटणी वर्ज्य करावी. काही बाबा बुवा तर हवेत हात फिरवून सोन्याची चैन, अंगठी, लाडू, राख काढतात. परंतु सोन्याची चैन अंगठी ही श्रीमंतांना, आमदार, खासदार, मंत्री यांना देतात. तर गोरगरिबांच्या हातात राख ठेवून त्यांच्या जीवनाची राख व्हावी म्हणून आशीर्वाद देतात.

लअसे बाबा, बापू, स्वयंघोषित संत लोकांच्या भावनेला हात घालतात. म्हणून सर्वसामान्य जनता त्यांच्या बाह्य वर्तनाला बळी पडते. त्यापासून सावध राहण्यासाठी महाराज म्हणतात,

*भगवे तरी श्वान, सहज वेश त्याचाl*
*तेथे अनुभवाचा काय पंथl*
म्हणजेच वरवरच्या दिखाऊ व्यक्तिमत्वाला न भाळता त्यांचा अनुभव, त्यांचे आचरण, त्यांचे ज्ञान तपासले पाहिजे. महाराजांना निकोप समाजव्यवस्था अपेक्षित आहे कोणीही जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था, अस्पृश्यता, भेदाभेद पाळू नये. त्यासाठी ते म्हणतात

*अवघी एकाचीच वीणाल*
*तेथे कैचे भिन्नाभिन्नl*
निर्व्यसनी आणि बलशाली समाज निर्मितीसाठी सुद्धा ते म्हणतात की,

*ओढनिया तंबाखू काढला जो धूर*
*बुडेल ते घर ते घर तेने पापेl

मानवी समाज व्यवस्थेचा एकही पैलू संत तुकाराम महाराजांनी सोडला नाही, की ज्यावर त्यांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून मार्गदर्शन तथा प्रबोधन केले नाही. म्हणून सर्व बहुजन समाजाने आपापल्या घरी भटी कर्मकांड करण्यापेक्षा प्रत्येक मंगलप्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही अभंगांचे पठन करावे. महाराजांच्या गाथेचे सामूहिक पारायण करावे ते करण्यासाठी कोणीही जाणकार व्यक्ती चालतो. जेणेकरून आम्हाला जीवन जगण्याचे मार्गदर्शन होईल व ते सुसह्य वाटू लागेल. समाजामध्ये एकमेकांबद्दल जिव्हाळा, प्रेम, बंधुभाव, समता, निर्माण होऊन, जीवन खूपच सुंदर आहे, ते आनंदाने जगले पाहिजे हेही कळेल. कारण तुकाराम महाराज आणि त्यांची गाथा मानवी कल्याणासाठी आहे. मानवाच्या उत्थानासाठी आहे.
त्यांच्याच अभंगाच्या माध्यमातून सांगायचे झाल्यास

*अर्भकाच्या साठी पंते हाती धरली पाटीl*
*बालकाच्या चाली माता जाणुनी पाऊल घालीl*
*तैसे जगी संत क्रिया करूनी दावीl*
*तुका म्हणे नाव जनी उदकी ठावl*

✒️लेखक:-भिमराव परघरमोल(व्याख्याता तथा अभ्यासक
फुले-आंबेडकरी विचारधारा,तेल्हारा जि.अकोला)मो.९६०४०५६१०४