महाराष्ट्रातील पहिले ज्ञात सुधारक; श्री चक्रधर स्वामी

32

७ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रातील पहिले ज्ञात सुधारक म्हणून ओळखले जाणारे संत श्री चक्रधर स्वामी यांचा स्मृतिदिन आहे. ७ फेब्रुवारी १२७४ रोजी श्री चक्रधर स्वामी यांचे महानिर्वाण झाले. श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील एक महान तत्वज्ञ व समाजसुधारक होते. श्री चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथाची स्थापना केली. महानुभाव पंथाच्या श्रध्येनुसार त्यांना ईश्वराच्या पंचावतरापैकी पाचवे अवतार मानले जाते. लीळाचरित्र या मराठीतील पहिल्या चरित्र ग्रंथाचे ते नायक म्हणून त्यांना इतिहासात महत्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारून सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे श्री चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात समाज सुधारक होत.

श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म सन ११९४ मध्ये गुजरात मधील भडोच येथे भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला झाला. त्यांचे वडील विशाळदेव हे भडोचच्या राजाचे प्रधान होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळईसा होते. त्यांचे पाळण्यातील नाव हरपाळदेव असे होते. विवाहानंतर त्यांना आजारी लोकांची सेवा करण्याचा छंद जडला. या छंदातूनच त्यांचे प्रपंचातील मन उडाले. त्यांमुळे त्यांनी संसार, सुख, राजविलासाचा त्याग केला आणि ते भ्रमंती करू लागले. भ्रमंती करताना त्यांना विरक्त अवस्थेतील गोविंदप्रभु दिसले. गोविंदप्रभूंनी त्यांना चक्रधर हे नाव दिले. त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आणि आंध्रप्रदेशमध्ये भटकंती केली. भ्रमण करीत असताना त्यांनी लोकजीवन प्रत्यक्ष पाहिले. त्याकाळातील सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीचे त्यांनी अवलोकन केले.

त्याकाळातील सामाजिक विषमता, जातीपातीचा भेदभाव, धार्मिक हिंसा, महिलांवर होणारे अत्याचार यामुळे त्यांचे मन विषण्ण झाले. आपण सर्व एकाच आईचे लेकरे असताना हा भेदभाव का? असा त्यांना प्रश्न पडला. त्यांनी हा भेदभाव संपवण्यासाठी भाविकांना समतेचा उपदेश केला. त्यांना स्त्री पुरुष, जातीपातीचा भेदभाव मान्य नव्हता. त्यांनी त्यावर कडाडून प्रहार केला त्यामुळे त्यांना सर्व जातीधर्माचे स्त्री पुरुष अनुयायी मिळाले. त्यांनी लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिला. लीळाचरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ आहे. त्यांच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त आणि अनुयायांकडून प्राप्त झाले, त्यामुळे मराठी साहित्यपरंपरेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. श्री चक्रधर स्वामींना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९२२५४६२९५