माझी मराठी-माझा अभिमान – पंकज वानखेडे

24

🔸मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भंडारा येथे प्रतिपादन

✒️भंडारा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

भंडारा(दि.1मार्च):-डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.” अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी भाषा हा अभिमान मिळविण्यासाठी ‘मी मराठी ,माझी मराठी!’असा बाणा जपायला हवा.कवि कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांनी आपल्या लेखणीतुन समाजजागृती केली. त्यासाठी मराठीत विचार करण्याची,मराठीत बोलण्याची आणि व्यक्त होण्याची गरज आहे.

दैनंदिन व्यवहार हा मराठी भाषेतच व्हायला हवा.मराठी भाषा आमची आन-बाण-शान आहे,असे प्रतिपादन पंकज वानखेडे यांनी केले.ते मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य शाखा भंडारा येथे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. शेखर बोरकर विदर्भ सरचिटणीस हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, जिल्हाध्यक्ष भंडारा देवानंद नंदागवळी , जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सूरज गोंडाने, पत्रकार प्रवीण भोंदे उपस्थित होते.

पकज वानखेडे पुढे म्हणाले की,मराठीतील लेखन-वाचनाच्या नवनव्या प्रयोगांचा स्वीकार करायला हवा,मुलांमध्ये, तरुण पिढी मध्ये मराठीची ओढ वाढावी,तिची गोडी लागावी यासाठी कलाविष्कार, मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमातून होणाऱ्या प्रयत्नांचे स्वागत करायला हवे.नवं तंत्रज्ञान, नवं माध्यमात,समाज माध्यमातही मराठीचा आवर्जून वापर व्हायला हवा.इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आपल्या पाल्याना शिक्षण देण्याऐवजी मराठी माध्यमाच्या शाळेतूनच शिक्षण दयावे ,तरच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज व संत रोहिदास यांना खऱ्या अर्थाने अभिवादन केल्याचा मनस्वी आनंद होईल.असे प्रांजळ मत यावेळी व्यक्त केले.

राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, जिल्हाध्यक्ष भंडारा देवानंद नंदागवळी , जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सूरज गोंडाने, पत्रकार प्रवीण भोंदे , पत्रकार सैनपाल वासनिक,यांनी ही विचार व्यक्त केले . प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य चे अधिकृत सर्व पत्रकार बंधू भगिनी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन पवनी तालुका अध्यक्ष पत्रकार प्रशांत शहारे यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार साकोली तालुका अध्यक्ष पत्रकार रामलाल शहारे यांनी केले