शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाच्या हक्कांची पूर्तता करा – जिल्हाधिकारी

76

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.8मार्च):-शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने १ ते १० मार्च या कालावधीत विशेष
मोहीम हाती घेतली आहे. यात ६ ते १४ वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण केले जाणार असून 100 टक्के बालकांना शाळेच्या प्रवाहात दाखल करून त्यांच्या शिक्षणाच्या हक्कांची पूर्तता करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

जिल्ह्यातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करणेसाठी विशेष शोध मोहिम राबविणे याकरिता जिल्हाधिकारी गुल्हाने यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरिय समितीची बैठक नुकतीच वीस कलमी सभागृहात झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

शासन निर्णय दिनांक 23 फेब्रुवारी 2021 अन्वये निर्देशित केलेल्या सुचनांनुसार शाळाबाह्य मोहिमेसाठी शालेय शिक्षण विभागासोबत न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास, एकात्मिक बालविकास योजना, कामगार विभाग, आदिवासी विकास, अल्पसंख्यांक विकास आणि सार्वजनिक आरोग्य व गृह विभाग या विभागातील अधिकाऱ्यांचा सहभाग असणार आहे. त्यासोबतच सरकारी, खासगी शाळातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडीसेविका यांचीसुद्धा मदत घेतली जाणार आहे. या शाळाबाह्य मोहिमेसाठी नोडल अधिकारी नेमण्यात आले असल्याचे शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी कळविले आहे.