चंद्रपूर नगरीची शिल्पकार – राणी हिराई

159

🔸प्रस्तावना:-इतिहास हा घडणा-या व्यक्तीच्या जीवनकार्यातून त्यांच्या कर्तुत्वातून साकार होतो. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात अनेक कर्तुत्ववान स्त्रिया होऊन गेल्या. त्यात राजमाता जिजाबाई, पराक्रमी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, रजिया सुलताना, अहमदनगरची चाँदबिबी, जहाँआरा बेगम अशा अनेक गुणवैशिष्ट्यासह त्यांनी केलेल्या कार्याची दखल इतिहासाने घेतली आहे. अशीच कर्तुत्ववान स्त्री चंद्रपूर जिल्ह्यात होऊन गेली राणी हिराई. चंद्रपूरच्या पाचशे वर्षाच्या इतिहासात राणी हिराईचे कर्तुत्व व पराक्रम झळकते.

गोंडराज्यात एकूण २३ जाने होऊन गेले. त्यात राणी हिराईला सर्वोच्च स्थान आहे. ऐतिहासिक कर्तबगार स्त्रियांच्या वाट्याला येणारी प्रतिकूल परिस्थिती, त्यावर मात करणारी विजयीवृत्ती, मुत्सदीपणा, बाणेदारपणा तिच्या ठायी होता. पती राजा बिरसिंग यांच्या मृत्यूनंतर, हत्येनंतर गादीवर दत्तकपूत्र रामशहा यास बसवून करारीपणे राज्य चालविले. रामसिंग (रामशहा) सज्ञान होताच राज्यकारभारातून मुक्त झाली. तिने आपल्या कार्यकाळात मंदिराच्या जिर्णोद्धारापासून तर अनेक वास्तू बांधकामांच्या उत्कृष्ट निर्मितीपर्यंत राणी हिराई प्रसिद्ध आहे.

🔹चंद्रपूर जिल्ह्याची ऐतिहासिकता:-गोंड राजा खांडक्या बल्लाळशाह याने १३ व्या शतकात चंद्रपूर शहराची स्थापना केली. चंद्रपूरास चांदागढ किंवा चांदा असे म्हणत. गोंड राजा बहुतांश मोगलांचे मांडलीक होते. खांडक्या बल्लारशहा नंतर हिरासिंह महाप्रतापी राजा बनला. त्यानेच आपली राजधानी बल्लारपूरहून चंद्रपूर येथे नेली. हिरसिंह नंतर भूमासिंह, लोमासिंह, कोण्ड्यासिंह, करणसिंह, बाबाजी बल्लारसिंह या राज्यांनी इ.स. १५९७ पर्यंत राज्य केले. राजा रामसिंह (१६६७-१६८४) गादीवर असतांना औरंगजेबाच्या मांडलीकविरूद्ध बंड मोडून काढण्यासाठी पाठविले. या युद्धात किसनसिंह मारल्या गेला. रामासिंहाला वारस नव्हता. राजा किसनसिंह यांचा मुलगा बिरसिंह होय व त्याची सून म्हणजे राणी हिराई होय.

राणी हिराईचे माहेर मदनापूर, होशगांबाद होते. येथील मोगल सेनापती दिल्लनसिंह मडांवी यांची ती मुलगी होय. राणी हिराई सुंदर कुशाग्र बुद्धीची शस्त्रविद्यामध्ये पारंगत होती. विवाहाच्या वेळी बिरसिंग ८ वर्षाचा तर हिराई ६ वर्षाची होती. हिराई व बिरसिंग यांचे परंपरागत शिक्षण व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने राजाने विद्वानाची नियुक्ती केली होती.

🔸राणी हिराई – प्रसिद्ध विरांगणा:-मोगल बादशहा औरंगजेबाच्या काळात चंद्रपूरवर स्वारी करण्यासाठी नेमकखान यास पाठविले. यावेळी राणी हिराईने मराठा सरदार मालोजी शिंदे यांची मदत घेतली. चंद्रपूरजवळच्या रणसंग्रामात राणी हिराई व मालोजीने नेकनाम खानास पराभूत केले. पराभूत खानास अटकेत ठेवले. राणी हिराईने बादशहाचा सरदार नेकनाम खानास पराभूत केल्यामुळे त्याने रावमानसिंह बाबासाहेब जाधव यास चंद्रपूरला पाठविले. त्याने माणिकडचा किल्ला जिंकला. परंतु थोड्या अवधीतच हा किल्ला हिराईने परत मिळविला.

इ.स. १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रात छत्रपती शाहू स्वराज्यात राजगादीवर बसले. याचकाळात चंद्रपूरवर स्वारी करण्यास कान्होजी भोसले यास पाठविले. कान्होजी भोसले यांना वारसाने व-हाड गोंडवन प्रांतातील चैथाई व सरदेशमुखीची सनद मिळाली होती. चंद्रपूरच्या लढाईसाठी सोबत सरलष्कर हैबतराव निंबाळकर होते. गोंड व पठाण सैन्याचे नेतृत्व राणी हिराईने स्वतः केले. हे युद्ध चंद्रपूरजवळ झाले. या युद्धात हैबतराव निंबाळकर ठार झाले. सोबतच कान्होजीचा पराभाव झाला. ही लढाई १७१०-११ मध्ये झाली.

परंतु हा पराभव जिव्हारी लागल्यामुळे हैबतरावचा मुलगा सुलतानजी निंबाळकर याने राणीचा पराभव केला. या पराभवाला कारणीभूत ठरली होती. चंद्रपूरची आर्थिक परिस्थिती कारण सततच्या लढाईमुळे चंद्रपूरला फटका बसला होता. युद्धाची तयारी करणे कठीण गेले होते. पुढे चंद्रपूर राज्याची लष्करी व आर्थिक परिस्थिती कमकुवत झाल्याने कान्होजी भोसल्यानी लढाई केली. त्यात राणी हिराईचा पराभव झाला. पुढे तह झाला. तहात अर्धे राज्य देणे भाग पडले. पुढे कान्होजीने मिळविलेले राज्य परत मिळविण्यासाठी राणी हिराईने छत्रपती शाहू महाराजांशी वाटाघाटी केल्या. राणीने एक लाख रूपये खंडणी व वार्षिक दहा हजार रूपये सरदेशमुखी द्यावी असे ठरले व राज्य पुन्हा परत मिळाले.

🔹उत्कृष्ट प्रशासक:-राणी हिराईने धडाडी आणि बुद्धीचार्तुयाने चंद्रपूरचा राज्यकारभार यशस्वीपणे सांभाळला. त्यांची कारकिर्द भरीव आणि महिलांना अभिमान वाटावी अशीच आहे. राजा बिरशहा व त्यांचे पूर्वज मोगलांचे मांडलिक होते. मांडलिकात खंडणी दरवर्षी विनाविलंब (खंडणीची) रक्कम भरावी लागत असे. खंडणी भरण्यास बिरशहा दरवर्षी उशिर करीत असे. परिणामी औरंगजेबाने बिरशहास कैदत टाकले. परंतु हिराईच्या चार्तुयामुळे बिरशहांची सहीसलामत सुटका झाली. औरंगजेबाच्या कैदेतून सुटका होणे यासारखे दिव्य त्या काळात दुसरे नव्हते.

कान्होजी भोसले यांचा पराभव केल्यानंतर लढाईच्या ठिकाणी जवळपास लहान-मोठे १५० लहान वीरगळे तयार केलीत. त्यावर मराठा व गोंड यांच्या प्रतिक मूर्त्या अंकित केलेल्या आहेत. त्यांचे रणागणांवर कडवा संघर्ष व वाटाघाटीमधील कूटनिती या दोन्ही आघाड्यावर प्रभूत्व होते. प्रजेचे हित जोपासत उत्कृष्ट बांधकाम, शिक्षण याकडे विशेष लक्ष दिले. राज्याचा सर्वांगीण विकास केला. राज्यावर औरंगजेबाचा अमल असला तरीही राणीने राज्यात गोहत्या बंदी केली. तिने आपल्या बुद्धिमता, कौशल्यांनी राज्यात उद्धभवलेल्या बंडखोरांचा अंत केला. शत्रूवर विजय मिळवू शकतो; पण घराजवळच्या, घरातल्या शत्रूशी चार हात करण्याचे त्यांचे कौशल्य होते.

🔸गोंडराणी हिराईची विकासदृष्टी:-राणी हिराईने चंद्रपूरात महाकालीचे भव्य व सुंदर मंदिर बांधले. सोबतच महाकाली यात्रा सुरू केली. ती यात्रा आजतागायत सुरू आहे. चंद्रपूरची महाकाली आणि माहूरची रेणुका माता ही दोन तीर्थस्थळे विदर्भ आणि मराठवाड्याला परंपरेने जोडतात. विदर्भातील आठ शक्तीपीठापैकी एक मानल्या जाते. महाकाली मंदिर चंद्रपूरातील गोंडकालीन इतिहासाची साक्ष देते. अंजिठा-वेरूळ लेण्यासारखी चित्रकारीता विदर्भात याच ठिकाणी आहे. रामायण, महाभारतातले प्रसंग चित्रण केले आहे. हे गुफा मंदिर आहे. या मंदिर उभारणीचा काळ इ.स. १७०७ ते १७०९ हा होता. महाकाली मंदिरासोबतच अंचलेश्वर, एकवीरा, खाटीचा गणपती मंदिर, वैरागड येथील भवानी मंदिर, मार्कंडादेव येथील मार्कंडामंदिर दुरस्त केले. काही इतिहासकारांच्या मते महाकालीचे मंदिर सातवहान काळातील असावे. या मंदिराची स्थापत्यरचना गोंड-भोसले शैलीची आहे. गोंडकालीन इतिहास आणि अध्यात्माची परंपरा असा दुहेरी संदर्भ असलेले हे महाकाली मंदिर विदर्भाचीच नव्हे तर मध्य प्रांताची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश या भागातून हजारोंच्या संख्येत भावीक यात्रेत सहभागी होतात. या जथ्यात महार, मांग, गारोडी, कैकाडी, कुणबी असे अनेक जातीचे लोक येतात.

🔹राजा बिरशहाच्या समाधीचे बांधकाम:-चंद्रपूर येथील गोंडराजे राजा बिरशहा यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणीखातीर राणी हिराईने राजा बिरशहाची समाधी बांधली. त्यांच्या प्रती असलेले प्रेम अजरामर केले. त्यास विदर्भातील दुर्लक्षित ताजमहाल असे म्हणतात. राणीने चंद्रपूर शहराच्या जवळ अकरा पराकोट बांधले आहेत. चंद्रपूर मोगल सम्राटाशी सबंधीत असल्यामुळे त्या शैलीचे प्रतिबिंब दिसते. नक्षीकामात गोंड संस्कृती दिसते. मधील मोठा घुमट व चार लहान घुमट मोगल वास्तुकलेची छाप दर्शवितात. बांधकामात वास्तूची भव्यता आढळते. राणी हिराईच्या व्यक्तीमत्वात युद्धप्रसंगी संघर्षाचा आवेश व शांततेच्या काळात धार्मिक अंर्तमुखता आढळून येतो

🔸निष्कर्ष:-इतिहास हा अनंत असल्यामुळे काही पानावरच प्रकाश पडतो. अज्ञाताचा काळोख झुगारून काही प्रमाणात मानाचे सोनेरी पान हिराईचे आहे. मध्ययुगात अनेक धाडसी, स्वाभीमानी स्त्रियांनी आपल्या कर्तुत्वातून संघर्षमय लढा दिला. विरागंणा राणी हिराईनी सुद्धा मानवी मूल्यांच्या संघर्षासाठी प्रचंड लढा दिला. राणी अशिक्षित असूनसुद्धा बांधकामाची उत्तम जाण होती. राणी हिराईची कारकिर्द फक्त १५ वर्षाची होती. राणी हिराईने केलेल्या लोककल्याणकारी कार्याची दखल इतिहासाने घेतली आहे. परंतु त्यांच्या कार्याचा उचित गौरव झाला नाही. चंद्रपूरचा नावलौकीक देशभर पसरविला होता. त्यांच्या कारकिर्दीत पक्के रस्ते, आरोग्याकडे लक्ष देऊन पाण्याची सोय, औषधोपचारासाठी राजवैद्याची नेमणूक केली होती. अहिल्याबाई होळकर आणि राणी हिराईमध्ये बरीच साम्यस्थळे होती. परंतु त्यांचा इतिहास अजूनही उपेक्षित राहिला.

🔹संदर्भ ग्रंथ:-

(१) राजूरकर अ.ज., ‘चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास’, महाकाली प्रकाशन, चंद्रपूर
(२) हिराई स्मरणीका (संपा.), राणी हिराई-दत्ताजी तन्नीरवार यांचा लेख, २०१२, पृ. २३
(३) आत्राम उषाकिरण, ‘गोंडवाना कीमहान विरांगणा’, नागपूर, २०१५
(४) लोकमत न्युज नेटवर्क APR-06, 2018 गोंडराणी हिराईची विकासदृष्टी
(५) लोकसत्ता (APR-19,2013 चंद्रपूर प्रतिनिधी)

(६) http//wikimapia.org – महाकाली मंदिर चंद्रपूर

(७) चंद्रपूर सप्तरंग -विदर्भातील प्रमुख शक्तीपीठ, चंद्रपूरचे महाकाली मंदिर, आॅक्टोबर

 

✒️लेखक:-प्रा. प्रफुल एम. राजुरवाडे(इतिहास विभाग प्रमुख रा.तु. महाविद्यालय, चिमूर, जि. चंद्रपूर)Mob.No. ९६८९९५२८७३
Email ID– rajurwadep९@gmail.com