अवयवदानाला प्रोत्साहन मिळावे

27

गेल्या काही वर्षात रक्तदानाची चळवळ उभी राहिली आहे. सामाजिक व शासकीय चळवळींच्या प्रबोधनानंतर अनेक लोक रक्तदान करू लागले आहे. त्यामुळे असंख्य रुग्णांचे प्राण वाचले आहेत. रक्तदानाप्रमाणेच अवयवदानाची चळवळ उभी न राहिल्याने आजही लोक अवयवदानाबाबत उदासीन आहेत. अनेक लोकांना अवयवदान करता येतात हे देखील माहीत नाही. याबाबत योग्य ते प्रबोधन न झाल्याने लोक अवयवदानासाठी पुढे येत नाही. आज राज्यात मूत्रपिंड विकाराने त्रस्त बारा हजाराहून अधिक रुग्ण दात्याच्या प्रतीक्षेत असून यकृताची गरज असलेले सहा हजारांहून अधिक रुग्ण आजमितीस नोंदवले गेले आहेत. डोळे, त्वचा, मूत्रपिंड, यकृत, हृदय अशा अनेक अवयवांचे दान करता येते. मात्र अवयवदानाबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत.

त्यातला सर्वात मोठा गैरसमज म्हणजे या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था अवयवांचा काळा बाजार किंवा मनमानी कारभार करीत असणार म्हणून अनेकदा मृताचे नातेवाईक आपल्या प्रियजनाचे अवयव दान करण्याचे टाळून त्या मृत व्यक्तीची इच्छा नजरेआड करतात. पण इथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था अवयवदानासंबंधीच्या कायद्याअंतर्गत असलेल्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वानुसारच काम करतात. अवयवदानाबाबत आणखी एक गैरसमज म्हणजे मृतदेहाची विटंबना केली जातो. अवयवदानाबाबत असणारे हे गैरसमज दूर करून लोकांना अवयवदानाचे महत्व पटवून देण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न झाले पाहिजेत. जिवंतपणी तसेच मृत्युनंतर लगेच आपल्याला अवयवदान करता येते मृत्यूनंतर अवयवदान करायचे असेल तर जिवंतपणी त्या व्यक्तीने तसे संमतीपत्र देणे आवश्यक आहे. अवयवदानाने एखाद्याला नवीन आयुष्य मिळू शकते थांबलेले जगणं सुरु होऊ शकते त्यामुळे अवयवदानाची मोहीम आता चळवळ बनायला हवी. अवयवदानाबाबत लोकांमध्ये प्रबोधन करण्याबरोबरच त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९२२५४६२९५