फातिमा बेगम यांना विनम्र अभिवादन

आज २४.एप्रील… पहिल्या मुस्लिम शिक्षिका *फातिमा बी शेख* यांचा स्मृतिदिन…*क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले* यांच्या सोबत काम करणाऱ्या पहिल्या सहकारी शिक्षिका…
आज *फातिमा बी शेख* यांचा स्मृतिदिनाच्या निमित्ताने शिक्षणाच्या पवित्र कार्यात *सावित्रीमाईंना* अखंड आणि अनमोल साथ देणाऱ्या या *माउलीला* विनम्र अभिवादन

केशव भटाच्या सांगण्यावरुन जोतिबा फुले तात्या आणि सावित्रीमाईंना घरातून बाहेर पडावे लागल्यानंतर फारुख उस्मान बेग या पुरोगामी विचारसरणीच्या मुस्लिम मित्रांने प्रथम आपल्याकडे त्यांची राहण्याची व्यवस्था केली.तात्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यास मुस्लीम समाजातील या फारुख उस्मान बेग यांनी मनापासून मदत केली. तात्यांच्या या महान शैक्षणिक आणि समाजकार्यात ज्ञानज्योती सावित्रीमाईं या जशा खांद्याला खांदा लावून सावलीसारख्या उभे राहिल्या अगदी तशाच ज्ञानज्योती सावित्रीमाईंच्या शैक्षणिक कार्यात फारुख उस्मान बेग यांच्या भगिनी फातिमा बेगम या देखील त्यांच्या सोबत राहिल्या.

तात्या आणि माईंनी तमाम बहुजनांसाठी जे अनमोल कार्य केले आहे त्यात फारुख उस्मान बेग आणि फातिमा बेगम यांचा सिंहाचा वाटा आहे.म्हणून खरे तर तमाम बहुजनांनी गौरवाने मॉं जिजाऊ,सावित्रीमाई,माता रमाई, लक्ष्मीबाई यांच्यासह मॉं फातिमा बेगम यांचेही ऋण म्हणून स्मरण करणे गरजेचे आहे.मुस्लीम भारत भूमीतील मूलनिवासी आहेत.गर्वाने कुणी काहीही नारे देत असले तरी,तसे नारे देणा-यांच्या भ्रामक भूलथापांना बळी न पडता सर्व बहुजनांनी मुसलमान आणि सर्व मुसलमानांनी बहुजन हे आपले बांधव आहेत हे सदैव ध्यानी ठेवून राष्ट्रनिर्मितीसाठी गुण्यागोविंदाने एकत्र राहिले पाहिजे.
आजच्या स्मृतिदिनी मॉं फातिमा बेगम यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन !

✒️लेखिका:-हेमलता वठारे(सोलापूर)

महाराष्ट्र, लेख, शैक्षणिक, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED