मानवते तू विधवा झालीस..!

(जगदीश खेबुळकर स्मृती दिन ते जन्म दिन सप्ताह)

जगदीश खेबुडकर हे मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत गीतकार होते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना ११ वेळा सन्मानित करण्यात आले. त्यांचा जन्म दि.१० मे १९३२ रोजी कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावरील खेबवडे, हळदी या गावी झाला. वडिलांच्या शिक्षकाच्या नोकरीमुळे त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. वयाच्या १६व्या वर्षी ‘मानवते तू विधवा झालीस..!’ हे खेबुडकरांचे पहिले दीर्घकाव्य लिहिले गेले, असे मानले जाते. विघ्नसंतोषी व्यक्तीकडून जेव्हा त्यांचे घर जाळले गेले, तेव्हा त्या घराच्या राखेचा ढिगारा पाहून हे काव्य त्यांना सुचले. त्यानंतरच त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, पोवाडा, अभंग, ओवी अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. वडिलांप्रमाणे जगदीश खेबूडकर हेसुद्धा पेशाने शिक्षक होते.

त्यांनी आपल्या कारकीर्दीत तीन हजार पाचशे कविता आणि अडीच हजारांपेक्षा अधिक गीते लिहिली. सुधीर फडके, पं.भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर यांच्यापासून तर अलीकडच्या सोनू निगमपर्यंतच्या सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. संतश्रेष्ठ एकनाथांच्या रचनांचा त्यांच्यावर खुप प्रभाव होता. भा.रा.तांबे, कुसुमाग्रज, बा.भ.बोरकर, बा.सी.मर्ढेकर या थोर कवींवर्यांचा प्रभाव आपल्यावर असल्याचे ते मानत असत. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमयी शब्द हे त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य आहे. जेव्हा त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना आधार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते, त्यावेळी उपचार घेतानाही त्यांचे गीत-लेखनाचे कार्य सुरूच होते. त्यांचे पहिले गीत इ.स.१९५६ रोजी आकाशवाणीवर प्रसारित झाले तर इ.स.१९६० मध्ये त्यांचे पहिले चित्रगीत आणि पहिली लावणी ‘मला हो म्हणत्यात लवंगी मिरची’ प्रदर्शित झाली.

रंगल्या रात्री अशा या चित्रपटाची गीते लिहिण्याची ही संधी त्यांना प्रसिद्ध संगीतकार वसंत पवार यांनी दिली होती. साधी माणसं, आम्ही जातो आमच्या गावा, कुंकवाचा करंडा आदी चित्रपटांतील त्यांची गीते अतिशय गाजली. साडेतीन शक्तिपीठांचे वर्णन करणारे ‘दुर्गा आली घरा’ हे सर्वात मोठे १६ मिनिटे कालावधीचे गाणे त्यांनीच लिहिले आहे.
त्यांनी सुमारे ३२५ मराठी चित्रपट गीते लिहिली. २५ पटकथा व संवाद, ५० लघुकथा, ५ नाटके, ४ दूरदर्शन मालिका, ४ टेलिफिल्म, ५ मालिका गीते इतकी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली आहे. त्यांची सांगितिक कारकीर्द पाच दशकांइतकी मोठी होती. ग.दि.माडगुळकरांनंतर इतका मोठा गीतकार झालेला नव्हता. त्यांच्या कारकीर्दीत भालजी पेंढारकर ते यशवंत भालकर असे विविध ३६ दिग्दर्शक, वसंत पवार ते शशांक पोवार असे ४४ संगीतकार आणि सुधीर फडके ते अजित कडकडे अशा ३४ गायकांसमवेत त्यांनी काम केले.

इ.स.१९७४ साली त्यांनी स्वरमंडळ ही पहिली नाट्यसंस्था स्थापन केली. त्यानंतर इ.स.१९८०मध्ये रंगतरंग व इ.स.१९८२मध्ये रसिक कला केंद्राची स्थापना केली. रंगतरंग संस्थेद्वारे गावरान मेवा हा कार्यक्रम त्यांनी बसविला होता. त्याचे सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम झाले. इ.स.१९८६ मध्ये नाट्यकलेच्या सेवेसाठी नाट्यछंद आणि इ.स.१९८६मध्ये अभंग थिएटर्सची स्थापना केली. अशा या महान मराठी सुपुत्राचा महाराष्ट्र गौरव-जगदीश खेबुळकर यांचा मृत्यू दि.३ मे २०११ रोजी झाला.
!! त्यांच्या अविस्मरणीय अनेक समृतींना मानाचा दंडवत मुजरा !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.[संत व लोक साहित्याचे गाढे अभ्यासक.]मु. पो. ता. जि. गडचिरोली.व्हा.नं. ९४२३७१४८८३.

गडचिरोली, महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED