तोक्ते चक्रीवादळाचा मुकाबला करण्यास प्रशासन सज्ज

29

भारताच्या किनारपट्टी भागांना चक्रीवादळाचा तडाखा बसणे ही बाब नवी नाही. मागील १०० वर्षात देशात अनेक चक्रीवादळे येऊन गेली या चक्रीवादळाने मोठी वित्त व जीवितहानी झाली आहे. आताही देशातील किनारपट्टी भागाला चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. तोक्ते असे या चक्रीवादळाचे नाव आहे. म्यानमारने एका सरड्याचा नावावरुन हे नाव या चक्रीवादळाला दिले आहे. लक्षद्वीपजवळ अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला व त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले. या चक्रीवादळाचा लक्षद्वीप, केरळ, गोवा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. चक्रीवादळात देशातील किनारी भागांचे मोठे नुकसान होते. जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात होते. तोक्ते या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गोवा, सिंधुदुर्ग आणि कोकणच्या उत्तरेकडील भागांना हाय अलर्ट करण्यात आले आहे.

ताशी १५० ते १६० किलोमीटर वेगाने हे वादळ वाहण्याची शक्यता असून १७५ पर्यंत वेग वाढू शकतो. केवळ ६० ते ७० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे देखील मोठे नुकसान करू शकतात.१०० किलोमीटर वेगाच्या वर वाहणारे वारे भीषण नुकसान करतात तर १५० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे अतिभिषण नुकसान करणारे ठरतात. त्यामुळेच हे चक्रीवादळ अतिभिषण स्वरूपाचे ठरू शकते. या चक्रीवादळात किनारपट्टी भागाचे मोठे नुकसान होऊ शकते म्हणूनच या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. या चक्रीवादळाशी मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती दलाने ( नॅशनल डीजास्टर फोर्स ) ५३ पथके तयार केली आहे.

यातील २४ पथकांना यापूर्वीच सक्रिय करण्यात आले आहे. जेथे नुकसान होण्याची अधिक शक्यता आहे तिथे हे पथके तैनात केली आहे. चक्रीवादळ ही नैसर्गिक आपत्ती आहे, चक्रीवादळ रोखणे हे आपल्या हातात नाही पण योग्य नियोजन आणि तयारी करून त्याच्यापासून होणारे नुकसान मात्र आपण कमी करतो. प्रशासन तेच करत आहे. तोक्ते चक्रीवादळाशी मुकाबला करण्यास प्रशासन सज्ज आहे.

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड,जिल्हा पुणे)९९२२५४६२९५