महापुरुषांचा लढा हा सामाजिक विचार परिवर्तनाचा होता – अॅड. प्रज्ञेश सोनावणे

33

✒️ठाणे प्रतिनिधी(आशा रणखांबे)

ठाणे(दि.23मे):-राज्यावर, देशावर रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी सर्व बलुतेदार आणि अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून त्यांना मावळा ही पदवी बहाल करून स्वराज्य निर्माण केले. शेतकऱ्यांचा राजा बहुजनांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा लढा धार्मिक नव्हता तर तो राजकीय लढा होता. महात्मा फुले यांनी भारतामध्ये स्त्रियांसाठी शिक्षण निर्माण करून देशातील स्त्रियांना स्वावलंबी बनविले आणि स्त्रिया शिक्षित झाल्या. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यात सर्वप्रथम आरक्षणाची तरतूद करून बहुजन समाजाला ५० टक्के आरक्षण देऊन सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे बहुजनवर्गाला पुढे येता आले. आणि त्यांचाच वारसा पुढे घेऊन बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशात खऱ्या अर्थाने सामाजिक विचार परिवर्तनाची क्रांति घडवून आणली.

भारतीय संविधान निर्माण केले आणि त्यात प्रत्येक भारतीयांना न्याय मिळवून दिले. प्रत्येक धर्माच्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळवून दिला.

भारतीय विद्यार्थी संघटना ठाणे शहराच्या वतीने दिनांक २३ मे २०२१ रोजी रविवार सकाळी ११ : ०० वाजता, छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर ह्या महापुरुषांचा संयुक्त जयंती उत्सव ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महापुरुषांच्या विचारांचे भाष्यकार सामाजिक कार्यकर्ते, वक्ते अॅड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे यांनी आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या पिढीने महापुरुषांचा विचार स्वीकारणे आणि त्यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करणे आवश्यक आहे. देशात आज परिस्थिती विचित्र निर्माण झालेली आहे आणि या परिस्थिती विरुद्ध आपल्याला लढायचे असेल तर छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांशिवाय पर्याय नाही.

सोशल मीडियाचा तरुणांनी चांगला वापर केला पाहिजे, विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे आणि विशेष करून हिंसेचे समर्थन करू नये. तथा प्रत्येक भारतीय नागरिकांकडे भारतीय संविधानाची प्रत घरात असलीच पाहिजे प्रत्येकाला आपले हक्क अधिकार आणि कर्तव्य माहिती असले पाहिजे. कार्यक्रमाला शुभम कांबळे यांनी प्रास्ताविक सादर केले तर वेदांत मोरे यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रा. प्रशांत साळवी, सायली कांबळे, श्रवण सादरे, यश साबळे, भूषण आंबिकर, श्रेयस काताळे, साईल आंबेकर, करण तेकाळे इत्यादींना सक्रिय सहभाग घेतला.