आरमोरीतील युवकांकडून कोरोना लसीकरण जनजागृतीपर लघूपटाची निर्मिती

30

🔸“सेव लाईफ” हा लघुपट जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते प्रकाशित

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.24मे):- गडचिरोली जिल्हयातील आरमोरी येथील युवकांनी कोरोना लसीकरणाबाबत जनजागृतीपर “सेव लाईफ” या लघुपटाची निर्मिती केली आहे. या लघुपटाचे प्रकाशन आज जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी सदर लघुपट लसीकरण जनजागृती मोहिमेत संपुर्ण जिल्हयात दाखवणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रकल्प अधिकारी राहूल गुप्ता, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, लघुपटाचे लेखक निर्माते दिग्दर्शक गणेश रामचंद्र बैरवार, छायाचित्रकार बालू मने उपसिथत होते. या लघुपटाबरोबर कोरोनावर आधारीत दुसऱ्या लघुपटाचेही प्रकाशन करण्यात आले.

हे दोन्ही लघूपट कोरोना जनजागृतीशी निगडीत असून यामधून लोकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. विशेष म्हणजे या लघुपटांची निर्मिती करताना त्यांनी स्थानिक भाषेचा वापर करून स्थानिक कलाकारांचा वापर केला आहे. या लघूपटात कलाकार म्हणून नागसेन गोडसे, मुकुल खेवले, ज्योती खेवले, सपना ठवकर, प्रेमीला निखारे, श्रुती रामटेके, नेहा रामटेके, श्वेता रामटेके, सुरज वनस्कर, सुनिल राऊत आहेत. संपुर्ण छायाचित्रण आरमोरी येथे करण्यात आले आहे.

कोरोना सारख्या विषाणूच्या महामारीने भंयकर थैमान घातले असून या संकटाचा मुकाबला करण्यासाठी व लोकांमधील गैरसमज व अफवा यांना दुर करण्यासाठी आरमोरी येथील दिग्दर्शक गणेश रामचंद्र बैरवार यांनी सेव लाईफ लसीकरणातून … जिवनाकडे आणि सेफ लाईफ आरोग्यातून …सुरक्षित जिवनाकडे असे दोन लघुपटाची निर्मिती केली आहे. कोरोनाच्या पसरलेल्या साथीमुळे मोठया प्रमाणात जिवितहानी होत आहे.

ही साथ रोखण्यासाठी शासनाने लसीकरणाची मोहीम मोठया प्रमाणात राबविली असून ग्रामीण भागात 45 वर्षावरील अनेक नागरिकामध्ये भितीदायक अफवा, काही अज्ञानी व देशविघात मंडळीकडुन पसरवली जात आहे. त्यामुळे सदर लसीकरणाकडे ग्रामीण भागातील जणता ही दुर जात असून लस घ्यायला घाबरत आहे. परंतु सेव्ह लाईफ या लघुपटाद्वारे जनतेमध्ये असलेली भिती दुर करुन त्यांना सकारात्मक व सुरक्षित वातावरणात लसीकरणासाठी प्रोत्साहीत करुन स्वत:हून लसीकरण करायला तयार होतील असे मत लघुपटाचे लेखक निर्माते दिग्दर्शक गणेश रामचंद्र बैरवार यांनी व्यक्त केले.