जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांनी केली कृषी उत्पन्न बाजार समिती, इतवारा बाजार व नागपुरी गेट येथील लसिकरण केंद्राची पाहणी

31

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

अमरावती(दि.25मे):- जिल्हाधिकारी शैलेश नवाल व मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी संयुक्तरित्या अमरावती शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती, इतवारा बाजार व नागपुरी गेट येथील लसिकरण केंद्राची पाहणी केली. कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली असता या ठिकाणच्या व्यापा-यांना सुचित करण्यात आले की, त्यांनी दुकानदार व हातगाडी धारकास भाजीपाला व फळांची विक्री करावी. नागरिकांना या ठिकाणी भाजीपाला व फळ घेण्यास मनाई करण्यात आली आहे. या ठिकाणी गर्दी होणार नाही याची संपुर्ण जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीने घ्यावी. प्रत्येक व्यापा-याने व येणा-या ग्राहकाने मास्क चा वापर करावा. सामाजिक अंतर या नियमाचे पालन करावे. सर्व व्यापारी वर्गांनी, दुकानदारांनी, कामगारांनी आर.पी.सी.आर. टेस्ट करुन घ्यावी.

इतवारा बाजार परिसरात पाहणी करतांना दुकानदारांना सुचित केले की, त्यांनी आपले साहित्य दुकानातच ठेवले पाहिजे. दुकानाच्या बाहेर कोणतेही साहित्य ठेवू नये. दिलेल्या वेळेतच दुकान उघडावे. गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. यावेळी नागरिकांनाही सुचित करण्यात आले की, त्यांनी घरापाशी असणा-या दुकानातूनच सामान घ्यावे. हातगाडी धारकांना सुचित करण्यात आले की, त्यांनी एका जागी उभे न राहता ग्राहकांच्या घराजवळ जावून भाजीपाला व फळांची विक्री करावी. सर्व दुकानदारांनाही संदेश देण्यात आला की, नागरिकांना त्यांच्या घरीच सामान पोहचवून देण्याची व्यवस्था करावी.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी नागपुरी गेट येथील लसीकरण केंद्राला भेट दिली. केंद्रावर त्रिसूत्रीच्या पालनासह गर्दी टाळण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांनी लसीकरण झाल्यानंतरही मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले. लसीकरणास सुरूवात झाल्यानंतर लगेच ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉर्बिड व्यक्तींना लस दिली जात आहे. याचे महत्व लक्षात घेऊन मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सतत हात धुणे ही कोरोना प्रतिबंधाची त्रिसूत्री करण्याची गरज असल्याचे सांगितले.

यावेळी तहसिलदार संतोष काकडे, सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त योगेश पिठे, डॉ.विशाल काळे, डॉ.फिरोज खान, डॉ.पोर्णिमा उघाडे, बाजार व परवाना अधिक्षक उदय चव्हाण उपस्थित होते.