पवित्र आर्य वंश ‘, ‘आर्यांचं आक्रमण-शूद्रांची निर्मिती ‘ ई. मिथकं अन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मतं

31

वानरप्रजाती पासून* मानव उत्क्रांतीच्या प्रक्रियेत जवळपास *साठ लाख* वर्षांपूर्वी एका माकडीणीच्या पोटी जन्माला आलेल्या दोन माकडीनिंपैकी एक मानव प्राण्यांची माता ठरली. तर दुसरी चिंपांझीची. उत्क्रांतीच्या या प्रक्रियेत आजपासून *पंचवीस लाख* वर्षांपूर्वी *पूर्व आफ्रिकेत* मानव प्रजातीतील *पहिला प्राणी* उत्क्रांत झाला. या प्रजातीला _*’होमो’*_ म्हटलं जातं.

*सुमारे वीस लाख* वर्षांपूर्वी _’होमो’_ या प्राचीन मानव प्रजातीतील काही नर व मादा पूर्व आफ्रिकेतून युरोप, एशिया व उत्तर आफ्रिकेच्या विस्तृत भूभागात स्थलांतरित होवू लागले. युरोपातील अतिथंड बर्फाळ जंगलं तर काही ठिकाणच्या अतिउष्ण जंगलांत टीकाव धरण्याच्या प्रक्रियेत _’होमो’_ या मानव प्रजातीत अनेक *मानव जाती उत्क्रांत* होवू लागल्या.

*जवळपास पाच लाख* वर्षांपूर्वी *युरोप* अन *मध्य पूर्व खंडात* (आजच्या इजिप्त ते इराण भागात) _*’नियंडरथल’*_ ही मानवप्राणी जात उत्क्रांत झाली तर *दोन लाख* वर्षांपूर्वी *पूर्व-आफ्रिकेत* आपण ज्याचं वंशज आहोत ते _*होमो-सेपीयंस*_ उत्क्रांत पावले.

*सत्तर हजार* वर्षांपूर्वी _सेपीयंस_ हे आफ्रिकेच्या बाहेर पडले व पूर्व-मध्य, युरोप, एशिया असे स्थाईक होत शेवटी *पंचेचाळीस हजार* वर्षांपूर्वी *ऑस्ट्रेलियात* तर *सोळा हजार* वर्षांपूर्वी ते *अमेरिकेत पोहोचले*.

_*’होमो’*_ या मानवप्रजातीतून _होमो- *नियंडरथल*, होमो- *सेपीयंस*, होमो- *इरेक्टस*, होमो- *रूडोल्फेंसीस*, होमो- *सोलॉएनसीस*, होमो- *फ्लोरेसीएण्सीस* , होमो- *डेनीसोवा* , होमो- *एर्गस्टर*_ ई. ई मानव प्राणीजाती उत्क्रांत झाल्या.

या वेगवेगळ्या मानवजातीतील *किमान सहा जाती* या सुमारे *एक लाख* वर्षांपूर्वी *एकाचवेळी* पृथ्वीतलावर राहत होत्या, वावरत होत्या. आज त्यांतील फक्त आपण उरलोय, _*होमो-सेपीयंस*_. बाकी सर्वच्या सर्व मानवजाती नष्ट झाल्यात, लुप्त पावल्यात.

जीवशास्त्रीय उत्क्रांतीवादाचा वरील *प्राथमिक अभ्यास* देखील माणसांच्या पवित्र वंशवादाच्या संकल्पना किती तकलादू आहेत हे सिद्ध करण्यास पुरसा आहे. मात्र, वंशवादी श्रेष्ठत्वाच्या *फालतू अहंकाराने* बधिर झालेल्यांच्या डोक्यात या साध्या गोष्टीही शिरत नाहीत याची बोलकी उदाहरणं:
*पहिलं ब्राह्मणी वंशश्रेष्ठत्वाचं* _’दी हिंदु सोशियल ऑर्डर’ मध्ये बाबासाहेब लिहितात की, ब्राह्मणाच्या हातून खून जरी झाला तरी त्याला ‘फाशी’ देण्यात येवू नये हे ब्राह्मणाला लाभलेलं संरक्षण इंग्रज सरकारच्या काळात ही १८३७ पर्यंत अबाधित होतं. तर, त्रावणकोरच्या ब्राह्मण दिवानानी ब्राह्मणाला फाशी देण्याची पाळी येवू नये म्हणून ही शिक्षाच रद्द केली._
*दुसरं उदाहरण श्वेतवर्णीय वंशश्रेष्ठत्वाचं* – ज्या पुस्तकातून मी वरील मानव उत्क्रांतीचे संदर्भ घेतलेत त्या ‘सेपियन्स’ या पुस्तकात युवाल हरारी आणखीन एक महत्वाची माहिती देतात की _१९५८ साली क्लेन्नन किंग या काळ्या विध्यार्थ्याला फक्त एव्हढ्यासाठी वेडय़ांच्या इस्पितळात जबरदस्तीनं टाकण्यात आलं कारण त्यानं मिसिसिपी विध्यापिठात शिकण्यासाठी अर्ज केला.

न्यायधीशाचं म्हणणं पडलं की काळ्या व्यक्तीने आपल्याला मिसिसिपी सारख्या विध्यापिठात प्रवेश मिळू शकेल हे समजणं हे हमखासपणे वेडाचं लक्षण आहे._अमेरिकेतील श्वेतवंशीय श्रेष्ठत्व व भारतातील ब्राह्मणांचे जातवंशीय श्रेष्ठत्व हे आजही अनेक स्वरुपात दिसून येतं.*तिसरं उदाहरण भारतातील मूलनिवासी वंशश्रेष्ठत्वाच*- मानवप्राण्याची मुळं ही आफ्रिका खंडातील वानरजातीची आहेत हे निर्विवादपणे सिध्द झालं असतानाही अन भारतात कुठल्याही मानवजातीची उत्क्रांती झाली नसतानाही केवळ ब्राह्मण जातींचा द्वेष म्हणून, _’आम्ही ब्राह्मणेत्तर जातीचे लोक भारतातील मूलनिवासी वंशाचे तर ब्राह्मण हे बाहेरील परकीय वंशाचे’_ असं बिनबुडाचे तत्व ठासून मांडणारे मूलव्याधीग्रस्त _’ब्राह्मणग्रस्त-दलित’_ यांचं.

*सुमारे तेरा हजार* वर्षांपूर्वी ‘होमो-फ्लोरेसीएण्सीस’ ही मानवजात नष्ट झाल्यावर या पृथ्वीतलावर आधिपत्य गाजविण्यासाठी फक्त आपण _’होमो-सेपीयंस’_ उरलो. बारा हजार वर्षांपूर्वी शेतीव्यवसायात क्रांती झाली व माणसं शेतीनिमित्त एकाठिकाणी कायमस्वरूपी स्थाईक होवू लागली. चमत्कारिक ईश्वराची संकल्पना, लिपी व पैश्यांचा वापर, नाण्यांची निर्मिती, अनेक ईश्वरवादा पासून एकेश्वरवाद, पर्शियन साम्राज्य, बौद्ध धर्म, चिनी साम्राज्य, रोमन साम्राज्य, ख्रिस्ती धर्म, इस्लाम धर्म ई. ई. करत आपण वैज्ञानिक क्रांती पर्यंत पोहोचलो. रोजच्या जीवनात आगीचा वापर हा तीन लाख वर्षांपूर्वी सुरु झाला होता तर आपले काल्पनिक विचार इत्तरांपर्यंत पोहीचविण्याची क्षमता सत्तर हजार वर्षांपूर्वी (जेंव्हा काही सेपीयंस आफ्रिके बाहेर पसरले) निर्माण झाली होती.

*सुमारे पाचशे वर्षांपूर्वी* वैज्ञानिक क्रांती घडली. अनेक नवनवीन शोध लागले, डार्विनचा प्राणी उत्क्रांतीवादाच्या शोधाने तर ख्रिस्ती धर्मासमोर मोठं आव्हान उभं केलं. आपल्याला सर्वकाही ज्ञात नाही, बऱ्याच गोष्टी अजून आकलनाच्या पलीकडच्या आहेत हे स्पष्टपणे मान्य करत मानव विज्ञानाच्या साह्याने गूढ वाटणाऱ्या गोष्टींचा उलगडा करु लागले. यांच दरम्यान दुर्दम्य साहस, मेहनत व महत्वकांक्षी स्वभाव याच्या जोरावर युरोपियन लोकांनी नवनवीन देश/खंड (खरंतर जमीनी) शोधण्याचा सपाटा लावला. *कुठलीही साधन सामुग्री नसताना हजारों/लाखों वर्षांपूर्वी नैसर्गिकरित्या ज्या जमिनींवरून आदिमानवांनी स्थलांतर करत युरोप गाठलं होतं त्याच आदिमानवाचे युरोपियन वंशज आता आधुनिक जहाजे व साधन सामुग्री घेवून आधीच पादाक्रांत झालेले जुने खंड नव्यानं शोधू लागले.* फरक एव्हढाच होता की आदिमानव हे जिज्ञासेपोटी अगदी नैसर्गिकरित्या नवनवीन जमिनीवर पोहोचले होते. हा त्यांचा प्रवास कित्येक लाखों वर्षांचा होता ज्यात त्या आदिमानवाच्या जाती उत्क्रांत पावल्या तर आता हे आदिमानवाचे वंशज जमिनी शोधत होते आपल्या मालकीहक्काच्या वसाहती बसवायला.

स्थलांतरादरम्यान जिवंत राहण्यासाठी आदिमानवांच्या हातून निश्चितच निसर्गाची, आधीच्या प्राण्यांची अमर्यादित हानी झाली. मात्र, पंधराव्या ते अठराव्या शतकातील या युरोपियन लोकांनी छळ-कपटाने आधीची साम्राज्य उध्वस्त करत जमिनी बळकावल्या. उदाहरणार्थ, युरोपीयन ख्रिस्तोफर कोलंबस ने अमेरिकेचा शोध *१२ ऑक्टोबर १४९२* रोजी म्हणजेच, आजपासून *पाचशे सत्तावीस* वर्षांपूर्वी लावला असलातरी _सेपीयंस_ हे आदिमानव *सोळा हजार* वर्षांपूर्वीच अमेरिकेत पोहोचले होते. सोळा हजार वर्षांपूर्वी अमेरिकात पोहोचलेल्या आदिमानव _सेपीयंसच्या_ हातून त्या खंडात आधीपासून असलेले वन्यजीव व निसर्गाची हानी झालीय मात्र आता अमेरिकेत नव्यानं दाखल झालेल्या युरोपियन्सनी तेथील _रेड इंडियन्सच्या_ अक्षरशः कत्तली केल्या. तीच गत ऑस्ट्रेलियाची. *पंचेचाळीस हजार* वर्षांपूर्वीच _सेपियंस_ ऑस्ट्रेलियात स्थाईक झाले. आता, नव्यानं युरोपियन्स ऑस्ट्रेलियात पोहोचले व जवळपास तेथील *सहाशे आदिवासी जमाती नष्ट केल्या.* आदिमानव _सेपियंसच्या_ हातून झालेली हानी ही *जगण्याच्या गरजेपोटी* नकळतपणे झालीय तर युरोपियन्स या आधुनिक, सुसंस्कृत मानवांनी आदिवासी जमातींच्या जमाती नष्ट केल्यात फक्त अन फक्त *जमिनी बळकावण्याच्या हव्यासापोटी*. असो, विस्मृतीत गेलेले हे खंड युरोपियन लोकांनी नव्याने शोधले व तिथे आपल्या वसाहती बनविल्या. तसं पहायला गेलं तर फक्त युरोपीयनच नव्हे तर चिनी लोकांनीही _*(ख्रिस्तोफर कोलंबसची जहाजे मच्छर वाटावीत एव्हढ्या महाकाय जहाजांचा ताफा घेवून चिनी मींग राजघराण्यातील अड्मिरल झेंग हा आफ्रिका, इंडोनेशिया, भारत, श्रीलंका पर्यंत पोहोचला होता )*_ नवनवीन जमिनी शोधल्या मात्र त्यावर वसाहती बनविण्याचा विचार त्यांच्या मनाला कधी शिवला नाही.

*अन इथेच युरोपीयन्स ची सरशी झाली .* दूरवरच्या अज्ञात नवनवीन जमिनी शोधून त्यावर आपल्या राजाचा मालकीहक्क जाहीर करण्याचा जणू तापच त्यांच्या अंगी संचारला होता. अशारितीने, एशियन ताकदीसमोर कमकुवत असलेल्या युरोपियन लोकांनी उत्तर व दक्षिण अमेरिका सारखे मोठे खंड जिंकले व साल *१५०० ते १७५०* अशे तब्बल अडीचशे वर्ष समुद्रावर आपलं प्रभुत्व गाजवलं कारण बलाढय़ एशियन ताकदीनी तिकडे दुर्लक्ष केलं होतं.

युरोप मध्ये प्रचलित असलेल्या ख्रिस्ती धर्माच्या जुन्या अंधविश्वासी संकल्पना मोडीत काढुन विज्ञानाच्या प्रगतीने समाजात *’प्रबोधनाचे युग’* आणले. एकीकडं हे प्रबोधनाचे युग मानव कल्याणाच्या नवनवीन शोधांना जन्म देत असतानाच, ‘निळसर डोळे, लांब-सरळ नाक, भुरकट केस, श्वेतवर्णीय अंगकांती अन उंचपुरी शरीरयष्टी’ यांची प्रचंड *घमेंड* व जगभर समुद्रस्वारी करुन वसाहती वसवल्याने जग जिंकल्याची *मग्रुरी* असलेल्या काही युरोपियन लोकांनी डार्विनच्या _*’उत्क्रांतीच्या प्रक्रियेत सक्षम असणाराच टिकाव धरतो’*_ या सिद्धांताचा नेमका चुकीचा अर्थ लावत स्वतःला इत्तरांपेक्षा *अव्वल* व पर्यायानं यूरोपेत्तर देशांतील लोकांना आपल्यापेक्षा दुय्यम, हीन लेखण्यास सुरुवात केली.

अशारितीने जोपासलेला सर्वश्रेष्ठपणाचा *अहंभाव* त्यांत ज्यू लोकांचा तिटकारा असल्यामुळे *ज्यूईश येशू ख्रिस्ताचा* ख्रिश्चन धर्म डोईवर वाहण्याचं _’फुकाचं ओझं ‘_ नाकारण्याची मनोभूमिका यांतून जन्माला आलं ते _*’पवित्र आर्य वंशाचे’*_ मिथक.

*तब्बल दोन शतकं* या आर्य वंशाच्या मिथकांने जगावर सत्ता गाजवली. ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्गानं कलकत्त्यात पोहोचलेले युरोपीयन हे मिथक भारतात घेवून आले. कलकत्यात न्यायधीश असलेले व अठ्ठावीस भाषांत निपुण असलेले *सर विलियम जोन्स* यांनी १७८८ साली आर्यांच्या पवित्र वंशाची महत्ती मांडतांना, संस्कृत भाषेचं ग्रीक व इत्तर युरोपीयन भाषांसोबत असलेलं साधर्म्य दाखवून दिलं. यामुळं, भारतातील संस्कृत भाषेचे जाणकार *_’ब्राह्मण’_* यांचा संबंध थेट युरोपातील आर्यांच्या सोबत जोडला गेला. भारतातील ब्रह्मवृंद यावर चेकाळले नसतेतर नवलच. त्यांनी राज्यकर्ते इंग्रजांचं भारतात येणं हे, आर्यन या नात्यानं, आपल्या हरवलेल्या भाऊबंदांच पुनर्मिलन मानलं. सुरुवातीच्या काळात इंग्रजांना याचा थोडाबहुत फायदा झाला ही म्हणा.

याच दरम्यान ब्रिटिश, जर्मन व फ्रेंच विद्वानांनी वेदकालीन आर्यांचा *तथाकथित सुवर्णमय इतिहास* रचला ज्यामुळे युरोपीयन्स पेक्षा आम्ही सरस अशी *गुर्मी* ब्राह्मणांत आली. भाषेतील साधर्म्य हे अकारण वंशीय साधर्म्य मानण्याची *घोडचूक* केली गेली. भाषेला वंश समजलं गेलं अन भारतात संस्कृत बोलणारा *_’आर्यन वंश’_* तर द्रविडी भाषा बोलणारा *_’द्राविडीयन वंश’_* अशी वांशिक फाळणी झाली. पुढे चालून या वांशिकतेला ‘गोऱ्या-काळ्या’ रंगाशी व नाकाच्या ‘रुंदी-लांबीशी’ जोडलं गेलं.

_*’गोरेपान, नाकशार, साहसी, हुश्शार अशा पवित्र आर्यवंशीयांनी भारतावर आक्रमण करुन भारतातील एतद्देशीय काळ्या, पसरट नाकाच्या रानटी जमातींना पराभूत केलं. आपल्या वंशाचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी, म्हणजेच एतद्देशीय काळ्या लोकांशी संकर होवू नये म्हणून आर्यांना वर्णाश्रमाची निर्मिती करावी लागली. पराभूत काळ्या लोकांना ‘दास्य’ , ‘दस्यू’ वा ‘शूद्र’ संबोधून गुलाम बनवलं गेलं. यांतून मग जातिव्यवस्था उदयाला आली.’*_ असं परिशिष्ट मुळ पवित्र आर्यवंशाच्या युरोपियन मिथकाला भारताच्या संदर्भात जोडलं गेलं व आपला वंश अपवित्र होवू नये म्हणून आर्यांनी जातिव्यवस्था निर्माण केली असा सिद्धांत मांडुन जातिव्यवस्थेला *व्यवहार्य स्वरूप* दिलं गेलं.

पवित्र आर्यवंशाचे मिथक व जगातील सर्वश्रेष्ठ अशा वंशाचे पावित्र्य जपण्यासाठी जातिव्यवस्था निर्माण झालीय या थोतांडाला *भारतातील हिंदुधर्म सुधारकांनीही उचलून धरलं*. राजा राममोहन रॉय, महर्षी दयानंद सरस्वती, न्या. रानडे या सर्वांनी सोनेरी आर्यवंशाचे मिथक व वेदशास्त्र यांची भलामण करणारे विचार मांडले तर विदेशात विश्वबंधुत्वाच्या *बाता मारणाऱ्या* स्वामी विवेकानंद यांनी आर्यवंशाच्या समर्थनार्थ संस्कृत, वेदशास्त्र ई. चा उदोउदो करत भारतातील जातिव्यवस्थेचं खुलं समर्थन केलं.

१८९० साली अकरा वर्षांच्या फुलमणीबाई या बालविवाहितेचे थोराड नवऱ्याने जबरदस्ती केली म्हणून निधन झाले व बालविवाहाचा प्रश्न चव्हाट्यावर आला. तिच्या नवऱ्याला शिक्षा करुन इंग्रज बालविवाहाच्या विरोधात कायदा आणणार तोच सनातनी बाळ गंगाधर टिळकानी याला हिंदु धर्मशास्त्रांत ढवळाढवळ ठरवत तिव्र विरोध केला. टिळकाचे सर्व डावपेच संस्कृतपंडित भांडारकरांनी धुळीस मिळविले व इंग्रजांनी बालविवाह विरोधी कायदा आणला. हा पराभव टिळकाच्या जिव्हारी लागला अन *सनातन्यांमध्ये आपली गेलेली पत* पुन्हा मिळविण्यासाठी १९०३ साली वेदिक काळातील आर्यवंशाच्या *पवित्र राहणीमानावर* लिखाण ( _’दि आर्क्टिक होम ऑफ दि वेदास’_) करुन *उत्तर ध्रुवावरील आर्क्टिक परिसरात* आर्यांचे जन्मस्थान होतं व तेथून ते भारतात स्थलांतरीत झाल्याचा शोध लावला. कुठल्याही शास्त्रीय संशोधनाचा आधार नसलेलं हे टिळकांच *टाकावू लिखाण* तरीही गाजलं कारण भारतातील आर्य-ब्राह्मण हे पाश्चिमात्य युरोपियन आर्यांचे पूर्वज असल्यामुळे इंग्रजावर त्यांनी का अवलंबून रहावं अशा आशयाच्या राष्ट्रभक्तीला त्यातनं चालना मिळाली. १९३९ साली आपल्या _’वी ऑर अवर नेशनहुड डिफाइंड’_ या तशाच टाकावू पुस्तकांत गोळवलकर यानं टिळकाचा इतिहास बरोबर तर भूगोल चुकीचा ठरवत _*’आर्य उत्तर ध्रुवावरून भारतात स्थलांतरीत झाले नाहीत तर उत्तर ध्रुवच पूर्वी भारतात (बिहार येथे) होतं व हळूहळू सरकत सरकत ते आताच्या ठिकाणी पोचलंय’*_ असं अत्यंत हास्यास्पद विधान केलं.

टिळकाच्या आधी, _’ब्राह्मणी आर्यवंश, भारतावरील त्यांचं आक्रमण व त्यातून शूद्रांची उत्पती’_ या मिथकांनी जम बसविला असताना क्रांतीबा जोतीराव फुले यांनी यांच *मिथकांना उलटं फिरवलं*. बळी राजा सारखी *प्रतिमिथके*’ निर्माण करुन पवित्र आर्यवंशाची बतावणी करणाऱ्या ब्रह्मवृंदाना जोतीराव यांनी त्यांच्याच अंगणात चित केलं.
बाहेरुन आलेल्या *लबाड* _आर्य-भटांनी_ प्रामाणिक, *सुसंस्कृत* एतद्देशीयांना फसवून त्यांचं राज्य लुबाडले व त्यांना गुलाम बनविले अशी मांडणी करत जोतीरावांनी बदमाश, लुटारू ब्राह्मणांच्या विरोधात शूद्र-अतिशुद्रांची मोट बांधली खरी मात्र, आपआपल्या जाती शाबूत ठेवून ब्राह्मणांविरोधात एकत्र आलेले ब्राह्मणेत्तर जोतिरावांच्या निधनानंतर एकत्र राहू शकले नाहीत, जातींच्या नावावर फुटले. दलितांना या चळवळीतून दूर केलं गेलं.

शूद्र-अतिशुद्रांना धार्मिक, सामाजिक व आर्थिक गुलामीतून मुक्त करण्याचा *जोतीरावांचा समृध्द वारसा* बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या डोई घेतला. त्यांनी जोतिरावांना आपले गुरु जरुर मानलं मात्र जोतीरावांनी केलेली विदेशी आर्यांची मांडणी *धुडकावली*.

वेदशास्त्र, महाभारत आदी ग्रंथांचा संदर्भ देवून जुगारी, दारुड्या अन व्यभिचारी आर्यांचे तथाकथित _’पावित्र्य’_ व _’सुवर्णमयी’_ इतिहास यांचा भंडाफोड बाबासाहेबांनी आपल्या लिखाणातून सविस्तरपणे केला.

*’कास्ट ईन इंडिया’ (१९१६)* या निबंधाची सुरुवात करताना बाबासाहेब म्हणतात, _”प्रख्यात मानववंशशास्त्रज्ञांच्या मते भारतीय हे आर्यन, द्रविडीयन, मंगोलियन व स्क्यीथीयन लोकांचं मिश्रण आहे. शेकडोंवर्षं आधी आदिम जमातींच्या अवस्थेत असताना ही सर्व मंडळी वेगवेगळ्या दिशेकडून वेगवेगळी संस्कृती घेवून भारतात शिरली. आपल्या आधी भारतात असलेल्या जमातींबरोबर भांडून-भांडून थकल्यावर ते शांतिपूर्णरित्या सख्य-शेजारी म्हणून स्थाईक झाले. सततचा संबंध व परस्परांतील व्यवहारांमुळे त्यांच्या आपआपल्या संस्कृती मधिल भिन्नता लोप पावून त्यांच्यात एक समान संस्कृती निर्माण झाली….”_

*’अनिहीलेशन ऑफ कास्ट’ (१९३६)* या आपल्या भाषणात बाबासाहेब, _”पंजाब मधिल ब्राह्मण व मद्रास मधिल ब्राह्मणांत कोणतं वांशिक साम्य आहे ?…पंजाब मधिल ब्राह्मण व पंजाब मधिल अस्पृश्य यांच्यात काय वांशिक भेद आहे ?”_ असे खोचक प्रश्न विचारून हे मांडतात की, _”जातींमधील फरक हा वंशामधिल फरक समजून भिन्नभिन्न जाती या भिन्नभिन्न वंश मानणं म्हणजे सत्याचा धडधडीत अपलाप होय.”_
याचं भाषणात बाबासाहेब, _”विदेशी रक्ताची भेसळ फक्त राजपूत व मराठा या क्षत्रिय वर्गातच नव्हे तर आपल्यात कांहीच विदेशी नाही या भ्रमात असणाऱ्या ब्राह्मणांत देखील अशी भेसळ झालीय”_. हे भांडारकर यांचं म्हणणं ही उद्धृत करतात.

*’पाकिस्तान वा भारताची फाळणी’ (१९४०)* या ग्रंथांत बाबासाहेब, राष्ट्र म्हणजे ‘वंश व भाषा’ यांची एकता हे समीकरण चूक आहे हे सांगतांना प्रसिध्द विचारवंत रेनन यांचं निरीक्षण मांडतात, _”वंशाला राष्ट्रासोबत जोडणं गैर आहे. सत्य हे आहे की पवित्र वंश असं काहीच नाही…मानवाचा इतिहास हा प्राणिशास्त्रा पेक्षा निश्चितच वेगळा आहे…उंदीर अन मांजरा मध्ये जसं वंश हा सर्वकाही आहे तसं मानवांत नाही…”_

*’हु वर दी शूद्राज’ (१९४६)* यांत बाबासाहेब, ‘ *शूद्र हे आर्यांपेक्षा वेगळे नव्हे तर आर्य समाजातीलच होते…ब्राह्मणासोबत सतत होणाऱ्या भांडणात शूद्र राजांनी ब्राह्मणांचा केलेला अपमान व जुलमांने व्यथित होवून ब्राह्मणांनी त्यांचा उपनयन विधी थांबविला ज्यामुळे क्षत्रिय असलेले शूद्र हे सामाजिक दृष्ट्या अधोगतीस गेले व वैश्य वर्णाच्या खाली चौथा वर्ण निर्माण झाला.’* या निष्कर्षाप्रत पोहोचलेत.

*’दी अनटचेबल्स'(१९४८)* या अस्पृश्यांच्या निर्मितीचा इतिहास मांडणाऱ्या संशोधनात बाबासाहेबांनी *’हिंदू आणि अस्पृश्य यांच्यात वंशभेद नाही. दोघे एकाच वंशाचे आहेत’* असं ठामपणे मांडलंय.

‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या पुस्तकाच्या प्रस्थावनेत ( *६ एप्रिल १९५६*) बाबासाहेब म्हणतात धम्म व्यवस्थितरित्या समजून घेण्यासाठी या पुस्तकासोबत आणखीन दोन पुस्तकं ते लिहीत आहेत. त्यावेळेस ज्या दोन पुस्तकांचं लेखन बाबासाहेब करत होते त्यातील ‘प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रति-क्रांती’ या प्रस्तावित पुस्तकातील एक प्रकरण *’शूद्र आणि प्रति-क्रांती’* याची जी टंकलिखित मुळ प्रत उपलब्ध झालीय त्यांत बाबासाहेब मांडतात,
_”…शूद्र हे आर्य नव्हते हे दुर्दैवानं फार लवकर सर्वसामान्यांच्या पचनी पडतं. मात्र, नि:संशयपणे प्राचीन आर्यांच्या साहित्यात असा पुसटसाही उल्लेख नाही…”_
_”आर्य हे सरळ नाक असणारे गौरवर्णीय वंशाचे, आपल्या रंगाबद्दल कमालीचा अभिमान बाळगणारे हा समज, दस्यु म्हणजेच शूद्र असं ठासून मांडणं, शूद्र हे काळ्या रंगाचे व पसरट नाकाचे होते. ते भारतातील मूळनिवासी (aboriginals) होते व आर्यांनी आक्रमण करुन त्यांना पराजित केलं व गुलाम बनविले. गुलामीची ओळख म्हणून त्यांना दस्यु म्हणजेच दास संबोधलं गेलं.. *अशा एकूणएक समजुती या बिनबुडाच्या आहेत*”_
_”आर्यन हा काही *वंश नव्हता*. आर्यन नावाची संस्कृती जपण्याच्या हितसंबंधांनी एकत्र आलेल्या लोकांचा तो समूह मात्र होता. *जे कोणी आर्यन संस्कृतीचा स्विकार करायचे ते सर्व आर्य होय* . आर्य हा वेगळा वंश नसल्यामुळे ठराविक रंग व ठराविक शारीरिक बांधणी म्हणजे आर्यन असं नव्हे…रंगाबद्दल पूर्वग्रह हे आर्यन व दस्यु मधिल भेदभाव शत्रुत्वाचं कारण असा जो डोलारा उभा केलाय तो दस्यु बाबत वापरले जाणाऱ्या ‘वर्ण’ व ‘अनस’ या दोन शब्दांचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे झालाय. ‘वर्ण’ म्हणजे ‘रंग’ समजला गेलाय तर ‘अनस’ म्हणजे ‘नाक नसलेला’…खरंतर, ‘वर्ण’ म्हणजे एक समुहगट तर ‘अनस’ म्हणजे चांगले वळण नसलेलं बोलणं…आर्यांमध्ये कुठल्याच रंगाला प्राधान्य नव्हतं…”_

_” *दस्यु हे वंशांने आर्य नव्हते असं म्हणणं चुकीचं आहे* …दस्यु हे आर्य समाजातील ती लोकं होती ज्यांना आर्यन ही उपाधी गमवावी लागली कारण त्यांनी आर्यन संस्कृतीचा महत्वाचा भाग असलेल्या उपासना पद्धतीला विरोध केला…”_
_” *बाहेरुन चाल करुन आलेल्या आर्यांनी शूद्रांचा पराभव केला असं मानणं चुकीचं आहे. पहिली बाब म्हणजे आर्य हे भारताबाहेरून आले व त्यांनी एतद्देशीयांवर आक्रमण करून त्यांना पराजित केलं या कहाणीला आधारभूत ठरणारा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. भारत हेच आर्यांच घर होतं याबाबत खूप पुरावे उपलब्ध आहेत. दुसरं म्हणजे आर्यन व दस्यु मध्ये कुठल्याही प्रकारचं युध्द झाल्याचा कसलाच पुरावा उपलब्ध नाही. तिसरी बाब म्हणजे आर्यन हे मुबलक सैन्यबळ असलेले शक्तिशाली लोक होते हे मानणं अवघड आहे…अन शेवटचं म्हणजे शूद्रांना पराजित करण्याची कुठलीच गरज नव्हती. ते आर्यन संस्कृती उचलून धरणारे या अर्थी आर्यच होते*. शूद्रांबाबत दोन गोष्टीं अगदी सुस्पष्ट आहेत. ते काळे व पसरट नाकाचे होते असा युक्तिवाद (दावा) कोणीच केलेला नाही. त्यांना पराजित करुन गुलाम बनविले असा दावाही कोणीच केलेला नाही. दस्यु व शूद्रांना एकच समजणं चूक आहे..सांस्कृतिकरित्या त्यांच्यात फरक होता. *आर्यन संस्कृती विरोधात बंड केल्यामुळं दस्युना अनार्य ठरविले गेलं. तर दुसरीकडे, शूद्र हे आर्यांच्या जीवनपद्धतीला मानणारे म्हणून आर्यच होते* “._

अशारितीने प्राचीन भारतातील (मनूच्या आधी) परिस्थितीचा अभ्यास करुन बाबासाहेबांनी ‘पवित्र आर्यवंश’, आर्यांचं आक्रमण व शूद्रांची निर्मिती’ ही *मिथकं सपशेलपणे खोडून काढलीत*.

थोर गणितज्ञ, अर्वाचीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक *डी.डी.कोसंबी* यांनीही मानववंशशास्त्राच्या आधारे आर्य वंशाचे मिथक खोटं ठरवलंय. त्यांच्या मते अंगकांती, डोळे, नाकाची ठेवण ई. वरून कोण एतद्देशीय व कोण बाहेरचे हे ठरवणं म्हणजे निव्वळ मूर्खपणाचं. वेगवेगळ्या वातावरणात वाढल्यामुळे हा फरक झाला असल्यामुळं भारतातील आर्य वा मूळनिवासी यांच्या उगमाचे मुळ हे *वंश आहे असं मानणं अर्थहीन* आहे. या विषयांवर कोसंबी यांचं भरपूर लिखाण उपलब्ध आहे.

आर्यन संस्कृतीवर मोलाचा अभ्यास केलेल्या इतिहासतज्ञ *रोमीला थापर* यांनीही मांडलय की उत्खननशास्त्र, भाषाशास्त्र ई. च्या आधारे जे निश्चित पुरावे उपलब्ध आहेत ते *आर्यन वंशाच्या सिद्धांताला काहीच आधार देत नाहीत* . उत्खननशास्त्रात असा एकही पुरावा समोर आला नाही जो आर्यांचं भारतावर आक्रमण याला दुजोरा देईल.
*जर्मनीत _’फासीज्म’_ येण्याला देखील आर्य वंशाचं मिथक एक कारण होतं* हे ही त्या हिरिरीनं मांडतात.

पाश्चिमात्य लोकांना वेदांची ओळख करुन देणारा, आर्य वंशाबद्दल भरभरून लिहिणारा, व आर्यांना आपल्या वंशाचे खरे पूर्वज मानणारा जर्मन विचारवंत *मॅक्स म्युलर* च्या लक्ष्यात आपली चूक येताच त्यानं खुलासा केला, _”मी वारंवार जाहीर केलंय की जेंव्हा मी ‘आर्य ‘ म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ रक्त वा हडकं वा डोक्यावरचे केस नव्हे तर त्याचा अर्थ फक्त आर्यन ‘भाषा’ बोलणारी लोकं एव्हढंच…रक्तात आर्यन वंश असं कांहीच नसतं…विज्ञानाच्या भाषेत *आर्यन असं काही वंशाला लागू होत नाही. आर्यन याचा अर्थ फक्त अन फक्त भाषा*…”_ (१८८८ साली हा खुलासा मॅक्स म्युलरने केला खरा परंतु तोपर्यंत आर्यवंशच्या मिथकांने चांगलंच बाळसं धरलं होतं).

*२०१०* साली मात्र DNA संदर्भात संशोधन करणाऱ्यांना एक वेगळाच शोध लागला. *पन्नास हजार* वर्षांपूर्वी *लुप्त झालेल्या* _’होमो-डेनिसोवा’_ या *सायबीरियन* मानवजातीच्या DNA चा *अल्पांश*(6%) हा *ऑस्ट्रेलियातील* आजच्या माणसांच्या DNA बरोबर मेळ खात आहे तर *तीस हजार* वर्षांपूर्वी *लुप्त* झालेल्या _’नियंडरथल’_ या *युरोप-पश्चिम एशिया* मधिल मानवजातीच्या DNA तील काही *अल्पांश* (4%) हा *मध्यपूर्वेतील* लोकांच्या DNA शी मेळ खात आहे. शास्त्रज्ञांना या शोधाने बुचकळ्यात टाकलं तर वंशश्रेष्ठत्व मानणाऱ्या मूलतत्ववाद्यांना आनंदात.

_’होमो-सेपीयंस’_ व _’होमो-डेनीसोवा’_ वा _’नियंडरथल’_ या मानवप्राण्याच्या वेगवेगळ्या जाती असल्यामुळे त्यांच्यात संकर झाला तरी त्यामधून प्रजोत्पादन करु शकेल अशी संतती जन्माला येणं शक्य नाही (उदा. घोडा व गाढव या एकाच प्रजातीत उत्क्रांत पावलेल्या भिन्न जातीत शक्य नाही तसं). अधिक अभ्यासाअंती शास्त्रज्ञांनी याचा अर्थ असा लावला की लाखों वर्षं आधी _’होमो’_ प्रजातीत _’सेपीयंस’_ वा _’नियंडरथल’_ वा _’डेनीसोवा’_ या भिन्नभिन्न जाती उत्क्रांत पावत असताना त्यांच्या DNAत घोडा व गाढव यांच्यात असलेल्या फरकाएव्हढा फरक येण्याच्या नेमकं आधी (जवळपास *पन्नास हजार* वर्षांपूर्वी) झालेल्या संकरदरम्यान त्यांच्यातील DNA मधिल काही अंश _’सेपीयंस’_ मध्ये शिरलं असावं.

DNA मधिल वरील नवीन संशोधन जीवशास्त्रज्ञांनी *आव्हान* म्हणून स्वीकारलं तर मूलतत्ववाद्यांनी यांत आपलं राजकारण लाटण्याची *नामी संधी* शोधली. त्यांनी इतिहासाची चक्र उलटी फिरवून वंशश्रेष्ठत्वाचा वाद पुन्हा उफाळून काढला.

वेगवेगळ्या माणसांमधिल जैविक फरक हा अगदीच किरकोळ स्वरूपाचा आहे असं जीवशास्त्रज्ञ मांडतात तर त्या किरकोळ फरकांचा *बाऊ* करुन मूलतत्ववादी मोठा डाव उभा करतात.

*DNA* म्हणजे नक्की *काय रसायन* आहे…प्राण्यांच्या उत्पत्तीत ते कसं काम करतं याची पुसटशी कल्पनाही नसताना भारतातील काही *’मूलव्याधीग्रस्त’* दलितांनी DNA आधारे ब्राह्मणांना _’विदेशी युरेशियन’_ तर ब्राह्मण सोडून इत्तर सर्वांना _’मूलनिवासी’_ जाहीर करुन टाकलंय. ही मूलव्याधीग्रस्तता त्यांच्या मेंदूत एव्हढी भिनलीय की त्यांनी CAA2019, NRC व NPR विरोधातील मोठ्या लढाईतही DNA तपासून _’कोण नागरिक आहे अन कोण नाही’_ हे ठरवा अशी अगदीच *अतार्किक* अन *टोटल माठपणाची* मागणी केली. *गंमत* म्हणजे भारतीय उपखंडात कुठलीच मानवजात उत्क्रांत झालेली नसताना मूलनिवासी तत्वाचा अजब दावा केला जातोय अन *कहर* म्हणजे आपल्या स्वार्थी राजकीय अजेंडापोटी हा दावा करणारे स्वतःला आंबेडकरवादी म्हणतात. *बाबासाहेबांच्या विचारांचा* याहून मोठा *अपमान* तो कोणता.

आपण आपल्या जातीला _’होमो सेपीयंस’_ म्हणतो. ज्याचा अर्थ *’शहाणा मानव’* असा आहे. सध्या सर्व _सेपीयंस_ ला एका *’अतिसूक्ष्म निर्जीव रोगाणू’* ने *’घर-कैद’* करुन त्याचा सर्व शहाणपणा *चव्हाट्यावर* आणलायंच म्हणा.

वंशश्रेष्ठत्वाच्या अशाच शहाणपणामुळे *हिटलर* नावाच्या एका _सेपीयन_ ने *साठ लाख* ज्यू धर्माच्या _सेपीयंसला_ मारून टाकलं… *युरोपीयन* _सेपीयंसने_ *अमेरिकन रेड-इंडियन* नावांच्या व *ऑस्ट्रेलियातील आदिवासी जमातींच्या* _सेपीयंसच्या_ कत्तली केल्या… *भारतातील ब्राह्मण* नावाच्या जातीयवादी _सेपीयंसनी_ आपल्यातीलच काही _सेपीयंसला_ *दलित ठरवून* त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. स्वातंत्रोत्तर काळात जातीयवादी ब्राह्मण _सेपीयंसची_ जागा ब्राह्मण्यग्रस्त *शूद्र नावाच्या* _सेपीयंसनी_ घेतलीय.

आजपर्यंत आपल्याला _’होमो’_ या आपल्या प्रजातीच्या आठ जातींची माहिती आहे. कदाचित येणाऱ्या काळात आणखीन जातींचे अवशेष सापडू शकतात. विज्ञानांची प्रगती सध्या आपल्याला आहे त्याहून अधिक धक्कादायक माहिती समोर आणू शकते. मुद्दा हा आहे की नवनवीन माहिती आपण *सर्वप्राणिमात्राच्या कल्याणासाठी* वापरतो की *स्वतःच्या विध्वंसासाठी.*

✒️लेखक:-मिलिंद भवार(पँथर्स)मो:-9833830029