बदलाशी एकरूपता : बुद्धिजीवींचे आद्यकर्तव्य

30

जग दिवसेंदिवस पुढे धावत आहे. आपण शिक्षकवृंद व विद्यार्थीगण त्याच वेगाने पुढे सरसावलो पाहिजे, असे आपल्याला वाटते. म्हणून वर्तमानातील घरकुल शिक्षणपद्धतीने मला खुप वेडावून सोडले आहे. पुढे काय? पुढे काय? अशी उत्सुकता कायम घर करू लागल्यामुळे ती आवडूही लागली आहेच. जगाबरोबर चालणारा सुज्ञ आणि मागे खितपत पडलेला व्यक्ती किंवा घटक अज्ञ-अडाणी समजण्यात येत असतो. म्हणून होत जाणाऱ्या बदलाशी समरूपच नाही तर एकरूप होणे हे बुद्धिजीवी समजल्या जाणाऱ्या सामाजिक घटकांचे आद्यकर्तव्यच बनते.

वर्तमानातील शैक्षणिक परंपरेचा जर विचार केला तर सर्वप्रथम अर्वाचीन कुलगुरू शिक्षणपद्धतीनंतर सुरू झालेली पारंपरिक घरकुल शिक्षणपद्धती होय. त्यात वर्ग, फळा, खडू, विद्यार्थी व पुस्तके आदी दिसून येतात. ज्ञान हे फार प्राचीन काळापासून अखंडरित्या अविरतपणे विविध पद्धतीने व माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवले जात आहे. कालांतराने शिक्षण पद्धतीत सुद्धा आमुलाग्र बदल होत गेले. नंतर शिल्पकला, हस्तकला, ताम्रपट, चर्मपत्रे आणि शिला लेखानंतर याची जागा कागदाने घेतली. त्या कागदाद्वारे विविध भाषांच्या माध्यमातून प्रकिया सुरू झाली. त्या प्रक्रियेतून शिक्षणाचे संस्करण होऊन हे शिक्षण विद्यार्थ्यांना सहज घेता येऊ लागले. बदलत्या काळानुसार परिवर्तन होणारच! हा नियम जणू या व्यवस्थेला बांधलेला आहे, हे सत्य. आपण २१व्या शतकाकडे झपाट्याने जात आहोत.

विज्ञान व तंत्रज्ञानाबरोबर शोध, संशोधन, शिक्षण, प्रसार माध्यमे, शिक्षक, विद्यार्थी आणि समाज हे काळाच्या प्रवाहाबरोबर चालताना दिसतात. २१वे शतक हे वैज्ञानिक, भौगोलिक आणि प्रायोगिक तत्वांवर चालणारे असेल हे निश्चितच आहे. या शाश्वत तत्वांवर बदलणारी ही शिक्षणव्यवस्था व माध्यमे काळाच्या वेगानुसार बदलत आहेत. म्हणूनच या काळात अशा व्यवस्थेचा शोध जो एका लिंक वर व बटण दाबल्यावर लागतो. ही व्यवस्था म्हणजे ई-लर्निंग म्हणजेच आधुनिक शिक्षण प्रणाली अर्थात वर्तमानातील घरकुल शिक्षणपद्धती होय. ई-लर्निंग म्हणजे फक्त संगणक किंवा इंटरनेट याचाच वापर करणे नसून वेगवेगळी तंत्रे एकत्रित उपयोगात आणून शिक्षण घेणे होय. जसे एज्युकेशन सीडी, डीव्हीडी, व्हिडिओ सीडी, पेन ड्राईव्ह, एलसीडी प्रोजेक्टर, टीव्ही, लॅन केबल वायर, वायरलेस, ई-फायलीज, वेब पोर्टल अशा विविध इलेक्ट्रॉनिक घटकांचा उपयोग करून शैक्षणिक उद्दिष्टांची पूर्तता करणे होय. अर्थात शिक्षण हे फक्त पुस्तकांपुरते मर्यादित न राहता त्यास प्रयोगशील बनवण्यास तयार करते, ते ई-लर्निंग होय.

कालपर्यंत ही शिक्षण प्रणाली मोठ्या शहरामध्ये व मुक्त विद्यापीठामध्येच दिसत होती, परंतु ती आता संपूर्ण जगात कार्यरत होताना दिसत आहे. यामध्ये ग्रामीण भागसुद्धा मागे राहिलेला नाही. कारण प्रत्येकाकडे स्मार्टफोन आल्यामुळे विद्यार्थ्यांना व लोकांना ते सहज शक्य होत आहे, हे महत्वाचे!
२१वे शतक हे आधुनिक व वैज्ञानिक युग समजले जाते. विज्ञानाच्या जोरावर मानवाने केलेली प्रगती ही विकासात्मक परिवर्तनीय म्हटली जाते. बदलत्या काळानुसार प्रत्येकाने बदलले पाहिजे. त्याप्रमाणे हा बदल आपल्याला संगणक आल्यापासून दिसून येतो. हळू हळू शिकण्याची आणि शिकवण्याची पद्धत तसेच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या भूमिकेत सुद्धा परिवर्तन होत गेले. परिवर्तन ही काळाची गरज आहे, हे समजून संपूर्ण शिक्षण प्रक्रियेत हवे तेव्हा शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे. या अनुषंगाने विविध माध्यमाद्वारे शिक्षणाची सुरुवात सन १९९०ला मुक्त विद्यापीठापासून तर ती व्यक्तीगत शिक्षण घेण्यापर्यंत झालेली दिसून येते.

खरे तर कोरोना या महामारीमुळे ऑनलाइन अर्थात ई-लर्निंग इलेक्ट्रॉनिक लिंकद्वारे शिक्षणाला खुप मोठी चालना मिळाली. म्हणून गूगल मीट, झूम मीटिंग, यू-ट्यूब आणि गूगल क्लासरूम हे मोठे पर्याय उभे ठाकले. आजच्या संशोधन पेपरमध्ये ई-लर्निंग या आधुनिक शिक्षण प्रणालीवर थोडक्यात प्रकाश टाकण्यात आलेला आहे.

ई-लर्निंगमध्ये तीन महत्वाचे घटक येतात – १) स्वरूप, २) माध्यमे, ३) विद्यार्थी किंवा उपभोक्ता – वापर करणारा. ई-लर्निंग प्रणालीत स्वरूप आणि माध्यमे ही साधने जर उपलब्ध आणि सहज शक्य होत असतील तर प्राप्त करणाऱ्याला अर्थात शिकणाऱ्याला ई-लर्निंग शिक्षण आत्मसात करणे कठीण जात नाही. म्हणून स्वरूप आणि माध्यमे हे घटक वापर करणाऱ्यांसाठी महत्वाची असतात. ई-लर्निंग प्रामुख्याने शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी जो नियमित अभ्यासक्रमापासून किंवा इतर शैक्षणिक गरजापासून वंचित असेल, अशा विद्यार्थ्यांना ही प्रणाली उपयुक्त ठरते. तो घर बसल्या अथवा कोठेही असला तरी एका क्लिकवर त्याला संपूर्ण माहिती उपलब्ध होते. यासाठी इंटरनेट असणे आवश्यक असते. ते सांप्रतकाळी ४जी वा ५जीच्या काळात खुप सोपे आहे. शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी केंद्रबिंदू समजून कार्ये केले पाहिजे. त्यांच्या शिक्षणाच्या गरजा ओळखून वागता आले पाहिजे. तेव्हाच त्यांना दिलेल्या अॅप्लिकेशनचा वापर करून ई-लर्निंग साधता येऊ शकेल.

ही ई-प्रणाली म्हणजे एनपीटीएल, स्वयम, बीजू, इग्नू, एनआयआयटी, इझी क्लास, ई-क्लास रूम, झूम एपीपी, ओपन युनिव्हर्सिटी लिंक, ई-बुक्स, ई-जर्नल्स, ई-मॅगझिन, ई-पेपर्स आणि विविध प्रकारचे ई-वेब पोर्टल आपल्याला उपलब्ध होतात. ई-लर्निंग प्रणालीत दोन प्रकारच्या पद्धती असतात – १) ऑनलाइन शिक्षण आणि २) ऑफलाइन शिक्षण. ऑनलाइन म्हणजे इंटरनेट चालू असताना आणि ऑफलाइन म्हणजेच इंटरनेट बंद असताना घेण्यात येणारे शिक्षण.वर्तमानातील घरकुल शिक्षण पद्धतीमधील आधुनिक शिक्षण प्रणालीत ई-लर्निंगचे महत्व व गरज लक्षात घ्यावी लागते. आजच्या २१व्या शतकात वैज्ञानिक युगात याचे स्थान खूप मौलिक आहे. कालांतराने येणार्‍या भविष्य काळात ई-लर्निंगमध्ये अजून स्मार्ट ई-लर्निंग येऊ शकते. तिचा पुरेपूर वापर करणारे स्मार्ट असतील आणि तिचा वापरसुद्धा वेगात असेल. म्हणून शिक्षक, विद्यार्थी व समाज हे घटक सर्वात मोठे व तत्पर राहणार आहेत. त्यामुळे या संपूर्ण शैक्षणिक समाज व्यवस्थेतील ई-लर्निंग हा सर्वात मोठा दुवा राहणार आहे, यात काही शंकाच असू नये.

✒️लेखक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.[दै.रयतेचा वाली – जिल्हा प्रतिनिधी व हिंदी-मराठी साहित्यिक.]मु. रामनगर वॉर्ड क्र.२०, गडचिरोली. जि. गडचिरोली, मोबा.७७७५०४१०८६.
ई-मेल – Krishnadas.nirankari@gmail.com