कोकणातील एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व – बाळकृष्ण जाधव

24

माणसाला माणूस म्हणून पाणी पिण्यासाठी संघर्षाची सुरवात केलेल्या कोकणातील आंबेडकरी चळवळ आज ही मानवाच्या मुक्तीचा संघर्ष करीत आहे.श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून सन २०१९ मध्ये बाळकृष्ण जाधव यांना उमेदवारी दिली. सामाजिक,राजकीय पातळीवर कोणतीही बांधणी नसतांना, राजकारणाबद्दल अनास्था अन् प्रस्थापित राजकीय पक्षांचे वर्चस्व असतांनाही त्यांनी उमेदवारी स्विकारली. विजय निश्चित असल्यावर डरपोक माणसे सुध्दा निवडणूक लढतात.पण,खरा योध्दा तोचं असतो जो पराजय होणार हे माहित असतांनाही प्रामाणिकपणे लढतो. एड. बाळासाहेब आंबेडकर रुपी वादळी नेतृत्व उभे राहिले अन् तळकोकणात राजकारणात नामधारी असलेल्या निखाऱ्यावर स्वाभिमानाची फुंकर मारण्याचा प्रयत्न केला.

वास्तवात ह्या वादळांने त्या निखाऱ्याचे वणव्यात रुपांतर होणे गरजेचे होते पण तसे झाले नाही. निखारा पेटला अन् आग निर्माण झाली पण, त्याचा वणवा झाला नाही. कारण, त्या आगीचा वणवा होण्यासाठी ज्या पुरक गोष्टी, उत्तेजीत समुदाय तसेच जे वातावरण पाहिजे होते तसे त्यावेळी मिळाले नाही.
एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन प्रतिकुल,संघर्षमय परिस्थितीवर मात करुन, सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृतीशील, प्रेरणादायी होतकरु ठरलेलं व्यक्तीमत्व म्हणजे बाळकृष्ण जाधव.ज्यांना आदरांने, प्रेमाने सर्व लोक बाळासाहेबही संबोधतात. सिंधुदुर्ग जिल्हा बौद्ध सेवा संघाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकात्मतेचे दर्शन घडविणारे कुशल संघटक अन् सामाजिक, धार्मिक कार्यात, चळवळीत स्वतःला झोकून देणारे निष्ठावंत, झुंजार,प्रेरणादायी व्यक्तीमत्व, सिंपन प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सरचिटणीस, वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे सरचिटणीस बाळकृष्ण जाधव यांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सन २०१९ मध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देऊन त्यांच्या कर्तृत्वाचाचं सन्मान केला.

पायाखाली जमीन कोणतीही असो, डोक्यावर आकाश कोणतेही असो,प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन मोठ्या आत्मविश्वासाने संघर्षमय परिस्थितीत यश संपादन करणे हाचं त्यांचा निस्वार्थी,सर्वसमावेशक,व्यापक दृष्टिकोन असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबईत कार्यरत असणाऱ्या सर्व सामाजिक,धार्मिक संघटनांना एकत्र करण्याचे ही त्यांनी महत्वपुर्ण काम केले.
वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे गांवी ७ जून १९५७ रोजी बाळकृष्ण जाधव यांचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला. लहानपणापासूनचं ते मनमिळावू, अभ्यासू अन् हुशार होते. माधवराव पवार विद्यालय कोकिसरे येथे जुनी ११ वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी मुंबईला प्रयाण केले. व्हि. टी. रेल्वे स्टेशनवरील ए. एच. व्हिलर कंपनीच्या स्टॉलवरुन त्यांच्या जीवनाला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. ए. एच. व्हिलर कंपनीच्या स्टॉलवर नोकरी करुन, सिद्धार्थ कॉलेजला सकाळच्या छत्रात शिक्षण सुरु केले. पण, भावकी अन् सामाजिक कार्यामुळे त्यांना T.Y. B. A. पर्यंतचं शिक्षण घेता आले. पण, काही वर्षातचं त्यांनी उर्वरित शिक्षणही पुर्ण केले.

कोकिसरे बौद्ध विकास मंडळाच्या चिटणीस पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर त्यांनी १९८५ ते १९८९ या काळात अनेक विकासात्मक, विधायक, प्रबोधनात्मक उपक्रम राबविले. सामाजिक चळवळीचा कोणताही वारसा नसतांना, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणा घेऊन ते कोकिसरे बौद्ध विकास मंडळाच्या माध्यमातून चळवळीत ओढले गेले. त्यांच्यातील सामाजिक अविष्कार अन् आंतरीक तळमळीमुळे वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाच्या निर्मीतीस मोठी चालना मिळाली. स्मारकाच्या जागेचा ४० वर्षाचा वाद त्यांच्यातील समंजसामुळे ८ दिवसात संपुष्टात आला. अन्याय, अत्याचार, विषमतेच्या विरोधात त्यांनी आवाज उठवून अनेकांना न्याय मिळवून दिला. एवढेचं नव्हे तर, वैभववाडी येथे कोकणकन्या एक्सप्रेसला थांबा मिळावा, कोकण रेल्वे प्रकल्पामध्ये भूमीहीनांना कोकण रेल्वेच्या सेवेत सामावून घेणे, खारेपाटण रोड चिंचवली प्रलंबित रेल्वे स्टेशनसाठी तत्कालीन केंद्रिय रेल्वे मंत्र्यांना डॉ.प्रा.भालचंद्र मुणगेकर सरांच्या माध्यमातून सन २०१२ मध्ये पत्रव्यवहार केला.

चिंचवली मधलीवाडी शाळेच्या संरक्षण भिंत व गेटसाठी डॉ. भालचंद्र मुणगेकर सरांकडून खासदार विकास निधी मंजूर करुन घेतला, खारेपाटण रोड चिंचवली रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म संदर्भात केंद्रिय रेल्वे मंत्री अन् रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार करुन सकारात्मकता मिळविली, कोकिसरे रेल्वे स्टेशन नजिक सबवे रस्त्याला मंजूरी, बेरोजगारांना नोकरीत प्राधान्य, अन्याय अत्याचार अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी यशस्वी लढे दिले. सन १९९६ ला जगप्रसिद्ध बौद्ध धम्म गुरु दलाई लामा यांचे कणकवली येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना दर्शन व्हावे म्हणून मुंबरकरांच्या समवेत अडीज दिवसात आठ तालुक्याचा त्यांनी खडतर पण यशस्वी दौरा केला. मा. खा. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचा खासदार निधी जिल्ह्यातील अनेक गावांना मिळवून दिला तसेच अनेक विकासात्मक कामे ही केलीत. वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाच्या ऐतिहासिक वास्तुच्या उभारणीत त्यांचा महत्वपूर्ण अन् सिंहाचा वाटा आहे. आमचे बंधू रविंद्र साळिस्तेकर यांच्या माध्यमातून त्यांनी संपर्क करुन, बौध्दजन सेवा संघ (रजि.) खारेपाटण विभागाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थान मिळवून दिले.

कोकणात १९८७ च्या दरम्यान जुन्या काळातील अनेक दिग्गजांच्या माध्यमातून सामुदायिक नेतृत्व निर्माण झाले असले तरी, त्यानंतर प्रा.रमाकांत यादव सरांना वेगवेगळ्या पध्दतीने विरोध केल्यांने, त्यांचे नेतृत्व कोकणाला लाभले नाही. त्यानंतरही काही नेतृत्व उदयास आले नाही. कारण काहींनी जातीयवादी पक्षांशी सलोखा निर्माण करुन, स्वतःचे अस्तित्व जपण्याचा प्रयत्न केल्यांने, समाजात त्यांची विश्वासाहर्ता कमी झाली, त्यामुळे लोकांनी त्यांना नाकारले. कोकणात राजकीय नेतृत्व निर्माण झाले नाही याचे शल्य सर्वांनाच आहे. पण, अजूनही वेळ गेली नाही. वंचित बहुजन आघाडीच्या प्रभावाखाली असलेल्या प्रत्येक शिलेदारांनी आता वैयक्तिक पातळीवर न लढता, फक्त वैयक्तिक पातळीवर काम न करता जिल्ह्यातील वेगवेगळ्या संघटना, संस्था, मंडळे अन् समूहांना एकत्र घेऊन काम केले पाहिजे. तर ह्या ठिणगीचे सर्व वंचितांच्या जीवनात एक अभिनव संकल्पनेचे प्रकाशपर्व नक्कीचं निर्माण होऊन, भविष्यात कोकणात नक्कीचं दमदार नेतृत्व निर्माण होईल अन् ते आंबेडकरी चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावेल असे वाटतेय.

बाळकृष्ण जाधव यांच्या स्वभावातील गोडीने अन् जिभेवरील माधुर्याने, प्रामाणिकपणा, सौजन्यशीलपणा, अडचणीत धावून जाण्याच्या वृतीमुळे त्यांनी अनेक माणसे जोडली. सर्वांना सोबत घेऊन जातांना आपल्या बरोबर असणार्‍या व्यक्तीला त्यांनी कधी लहान असल्याची जाणीव होऊ दिली नाही. त्यांनी नेहमीचं सर्वांना सन्मानाची, आदराची वागणूक दिली, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा नेहमीचं प्रयत्न केला. म्हणूनचं, आद. बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्यावर वंचित बहुजन आघाडीची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विधानसभा मतदार संघाची उमेदवारी सोपविली होती. अशा प्रेरणादायी व्यक्तीमत्वास, उपेक्षितांच्या आधारस्तंभास ६४ व्या जन्म दिवसानिमीत्त पुढील यशस्वी, उज्ज्वल दमदार वाटचालीस अन् सुरक्षित, निरोगी दिर्घायुष्यासाठी मंगलमय सदिच्छा !

✒️लेखक:-मिलिंद कांबळे चिंचवलकर ९८९२४८५३४९,मुंबई.