बर्डमॅन ऑफ इंडिया : डॉ.सलीम अली !

35

(पक्षिशास्त्रज्ञ डॉ.सलीम अली स्मृती दिवस)

डॉ.सलीम अली हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय आद्य पक्षितज्ञ व पर्यावरणवादी होते. भारतीय उपखंडातील पक्ष्यांच्या निरिक्षणासाठी आखलेल्या विविध अभ्यास अभियान, दुर्मिळ पक्ष्यांचे लावलेले शोध तसेच पक्ष्यांसंबंधी लिहिलेले अनेक ग्रंथ यांकरिता डॉ.सलीम अली प्रसिद्ध आहेत. त्यांचे कार्य पक्षी विज्ञानाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा समजला जातो. त्यांनी ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतातील पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी, पक्ष्यांच्या विविध जाती आणि जातींमधील वैविध्य यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या या कार्यामुळेच भारतात हौशी पक्षिनिरीक्षक बनण्याची परंपरा चालू झाली. भारतातील पक्षिनिरीक्षक मंडळी त्यांना आद्य गुरू मानतात. त्यांना ‘बर्डमॅन ऑफ इंडिया’ असेही संबोधले जाते.डॉ.सलीम अली साहेबांचा जन्म दि.१२ नोव्हेंबर १८९६ रोजी मुंबईतील खेतवाडी येथे एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव डॉ.सलीम मोइनुद्दीन अब्दुल अली असे होते.

ते एक वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे व त्यानंतर दोन वर्षांनी आईचे निधन झाले. त्यांचे मामा अमीरूद्दीन तय्यबजी यांनी त्यांचा सांभाळ केला. ते नऊ भावंडांत सर्वांत धाकटे होते. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी एका चिमणीची शिकार केली. त्या शिकारीने त्यांच्यात पक्ष्यांबद्दल आकर्षण निर्माण झाले. आपण पक्षी निरीक्षणाकडे कसे वळलो? याचे वर्णन त्यांनी आपल्या आत्मचरित्रात केले आहे. लहानपणी भेटवस्तू म्हणून दिलेल्या छर्ऱ्याच्या बंदुकीने लहान पक्षी टिपणे हा त्यांचा छंद होता. एके दिवशी टिपलेल्या चिमण्यांमध्ये त्यांना वेगळी चिमणी मिळाली. हिच्या गळ्यापाशी पिवळा ठिपका होता. नेहेमीपेक्षा हा पक्षी वेगळा दिसल्याने त्यांची उत्सुकता अधिकच वाढली व त्यांनी त्यांच्या मामांकडे हा पक्षी कोणता? याची विचारणा केली. मामा त्याला थेट बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या संचालकांकडे घेऊन गेले. तेथे संचालकांनी छोट्या अलींना हा पक्षी कोणता हे सविस्तर सांगितले. त्याबरोबरच भुसा भरलेल्या पक्ष्यांचा संग्रह दाखवला. भारावललेल्या अली साहेबांना पक्ष्यांची जी भुरळ पडली ती कायमचीच. यानंतर त्यांना पक्षी निरीक्षणाचा भारीच छंद जडला.

त्यानंतरच्या काळात त्यांचा पक्षिछंद त्यांना टिपणे व नोंदी करणे यांपुरता मर्यादित राहिला. शालेय शिक्षणानंतर त्यांना प्राणीशास्त्रात पदवी घ्यायची होती. परंतु शास्त्रातील अनेक अवघड विषयांमुळे माघार घ्यावी लागली. दरम्यान ते आपल्या भावांच्या धंद्याला मदत म्हणून ब्रह्मदेशातील रंगूनला गेले. तेथे धंद्यात मदतीसोबत त्यांनी तेथील जंगले फिरून पक्ष्यांना टिपून त्यांच्या नोंदी ठेवायचा छंद चालू ठेवला. सन १९१८मध्ये त्यांचा तेहमिना यांच्याशी विवाह झाला. ‘एका यशस्वी पुरुषामागे पत्नीचा हात असतो,’ ही म्हण सलीम अलींच्या बाबतीत तंतोतंत लागू पडली. सन १९२४मध्ये रंगूनमधील धंद्यात अपयश आल्यानंतर ते भारतात परत आले. दरम्यान त्यांच्या पत्नीने त्यांचा पक्ष्यांबद्दलचा कल जाणून घेतला होता. ज्यात त्यांचा छंद जोपासला जाईल, अशी नोकरी करण्यास त्यांना प्रोत्साहन दिले. परंतु डॉ.अली साहेबांचे शिक्षण हे अशी नोकरी मिळवण्यास एकदम जुजबी होते. जवळच्या ओळखीने त्यांना बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीमध्ये गाईड लेक्चररची नोकरी मिळाली.

परंतु त्यांना ते पुरेसे नव्हते. त्यावेळेस भारतात पक्षिशास्त्र हा विषय अस्तित्वातच नव्हता. यासाठी त्यांनी जर्मनीमध्ये जाऊन त्याचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी काही काळ इंग्लंडमध्ये काम केले.
भारतात आल्यानंतर या विषयात नोकरी मिळणे कठीण काम होते. डॉ.सलीम अली अजूनही हौशी पक्षी निरीक्षकांसारखेच गणले जात. आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्यांनी आपल्या पत्नीच्या मदतीने अलिबागजवळ किहीमजवळ आपला मुक्काम हलविला. या मुक्कामात त्यांनी सुगरण पक्ष्याच्या वर्तनावर अतिशय बारकाईने अभ्यास केला व त्यावर बीएनएचएसच्या जर्नलमध्ये त्यांनी प्रदीर्घ शोधनिबंध लिहिला. हा निंबध त्यांना पक्षीशास्त्रज्ञ म्हणून नावलौकिक मिळवून देण्यास कामी आला. त्यांनी केवळ पक्ष्यांना टिपून त्यात भुसा भरून संग्रहालयात ठेवण्यासाठी पक्षिशास्त्र नाही, हे जगाला दाखवून दिले. एकूणच पक्षिशास्त्रालाच वेगळी दिशा मिळवून दिली.

यानंतर सन १९३०च्या सुरुवातीला डॉ.सलीम अलींना ब्रिटिश सरकारपुरस्कृत तसेच संस्थानेपुरस्कृत पक्षी मोहिमांवर बोलवणे येऊ लागली. त्यांनी या मोहिमांवर आपण नोंदी तसेच पक्ष्यांचा जीवनशैलींवर अभ्यास करणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र पक्षी टिपून नोंदी ठेवण्यात आपल्याला रस नाही. ते काम कोणीही स्थानिक कामगार करू शकेल, असे स्पष्ट केले. आता डॉ.सलीम अली हे सर्वमान्य पक्षिशास्त्रज्ञ झाल्यामुळे तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली व त्यांचे पक्ष्यांचे खरेखुरे काम सुरू झाले. या नंतरच्या काळात भारताच्या मोठ्या भूभागावर त्यांनी पक्षी निरीक्षण मोहिमा आखल्या. देशाच्या वायव्य सरहद्दीपासून केरळच्या जंगलांपर्यंत तसेच कच्छच्या दलदलीपासून पूर्वेकडे सिक्कीम व अरुणाचलपर्यंत जाऊन त्यांनी पक्ष्यांच्या नोंदी केल्या. पक्ष्यांचे वर्तन, त्याच्यांत हवामानानुसार होणारे बदल, स्थलांतराच्या सवयी, विणीचे हंगाम यावर मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा केली. सुरुवातीला या कामी त्यांची पत्नी तेहमिनाने खूप मदत केली. त्याच डॉ. अलींच्या मोहिमांचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट बघत.

सन १९३९मध्ये त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर ते खूपच व्यथित झाले. त्यांच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली. परंतु त्यातून सावरून पुन्हा लग्न न करता त्यांनी आपले आयुष्य पूर्णपणे पक्ष्यांना वाहून घेण्याचे ठरवले. आपला मुक्काम मुंबईला बहिणीच्या घरी हलवला व तेथूनच आपले उर्वरित आयुष्य घालवून भारतीय पक्षिशास्त्रासाठी अजरामर ठेवा निर्माण केला.
अशा या महान पक्षितज्ञ डॉ.सलीम अली साहेबांचा वयाच्या ९१व्या वर्षी दि.२० जून १९८७ रोजी मुंबईतच मृत्यू झाला. आज त्यांच्या स्मृती दिनी त्यांना पुरोगामी संदेश परिवारातर्फे विनम्र अभिवादन!

✒️संकलन व लेखन:-कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.(संत-लोक साहित्य व इतिहास अभ्यासक.)मु. पिसेवडधा, पो. देलनवाडी.ता. आरमोरी, जि. गडचिरोली मधुभाष-९४२३७१४८८३.